'या' लग्नासाठी बनवले आठ लाखांचे दागिने

    दिनांक :01-Aug-2019
पौराणिक मालिकांमधली पात्रं, त्यांची वेशभूषा, दागदागिने यांची चर्चा नेहमी होत असते. ‘श्री लक्ष्मीनारायण’ या मालिकेत लवकरच लक्ष्मी-नारायण यांचा विवाह सोहळा रंगणार असून, त्यासाठी आठ लाखांचे दागिने तयार करून घेण्यात आले आहेत. अभिनेते आणि अभिनेत्रींसाठी वेगवेगळे आकर्षक दागिने खास चेन्नईहून मागवण्यात आले आहेत.

मालिकेमध्ये दिसणाऱ्या विवाह सोहळ्याची जोरदार तयारी सुरू झाली आहे. स्त्री प्रेक्षकांना मालिकांमध्ये दिसणाऱ्या दागिन्यांविषयी विशेष आकर्षण असतं. सोहळ्यासाठी लक्ष्मीचं मंगळसूत्र खास तयार करून घेण्यात आलं आहे. विष्णूला आकर्षित करणाऱ्या शंखांचा वापर या मंगळसूत्रामध्ये करण्यात आला असून, त्याला सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे. लग्नसोहळ्यासाठी फुलांचा आणि दागिन्यांचा आंतरपाट तयार करून घेण्यात आलाय. लग्नासाठी आवश्यक असलेल्या मुंडावळ्या सोनेरी असतील. त्याचबरोबर चेन्नई सिल्कचाही वापर करण्यात आला आहे. विष्णूसाठी वेगळे दागिने, तर विवाहानंतर लक्ष्मी फुलांचे दागिने परिधान करेल. पायातल्या जोडव्यांपासून, नथ आणि केसांमध्ये घालण्यासाठी आकर्षक दागिने मागवण्यात आले आहेत.