काँग्रेससमोरील अध्यक्षपदाचा पेचप्रसंग...

    दिनांक :01-Aug-2019
दिल्ली वार्तापत्र
शामकांत जहागीरदार
काँग्रेस पक्षाला आपला नवा अध्यक्ष निवडायचा मुहूर्त अद्याप सापडलेला दिसत नाही. विशेष म्हणजे पक्षाचा नवा अध्यक्ष तातडीने निवडला पाहिजे, याची कोणतीही निकड पक्षालाही आतापर्यंत जाणवली नाही. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन जवळपास सवादोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. नव्या अध्यक्षाची निवड होईस्तोवर कार्यकारी अध्यक्षाची नियुक्ती होईल, असे वाटत होते. यासाठी ज्येष्ठ नेते मोतीलाल वोरा यांच्या नावाचीही चर्चा होती, पण त्यांचीही कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली नाही. काँग्रेस पक्षात अनेक ज्येष्ठ नेते असले, तरी अध्यक्ष नसल्यामुळे काँग्रेस पक्ष पूर्णपणे बेवारस झाला आहे, याची मोठी किंमतही पक्षाला चुकवावी लागली आहे, पण याबाबतची कोणतीच खंत काँग्रेसचे आतापर्यंत नेतृत्व करणार्‍यांना वाटत नाही, याचे आश्चर्य वाटते.
 
नेतृत्वविहिन असल्यामुळे काँग्रेस पक्षातील डझनभरापेक्षा जास्त आमदारांनी पक्षाचे राजीनामे दिले, परिणामी कर्नाटकातील काँग्रेस-जनता दल धर्मनिरपेक्ष आघाडीचे सरकार पडले. गोव्यात तर काँग्रेसच्या दोनतृतीयांश आमदारांनी पक्षाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला, पण या दोन्ही घटनांची काँग्रेसच्या नेतृृत्वात कोणतीही प्रतिक्रिया उमटली नाही वा याचा यत्किंचितही विषाद कोणाला वाटला नाही. पक्षाला अध्यक्ष नसल्यामुळे हा सारा प्रकार घडला, त्यामुळे नवा अध्यक्ष तातडीने निवडला पाहिजे, असे कोणालाच वाटले नाही. या दोन्ही घटनांवर पक्षातील सगळ्या ज्येष्ठ नेत्यांची प्रतिक्रिया, मला काय त्याचे, यापासून या घटनाक्रमाशी आपला दूरदूरपर्यंतचा संबंध नसल्यासारखी होती. कर्नाटकातील काँग्रेसचे अर्धे सरकार कोसळत असताना राहुल गांधी परदेशात मजा मारत होते. विशेष म्हणजे याच वेळी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या श्रीमती शीला दीक्षित यांचे निधन झाले. शीला दीक्षित यांच्या अंत्यदर्शनासाठी तसेच अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी राहुल गांधी यांनी आपला परदेश दौरा अर्धवट सोडून मायदेशी परतायला पाहिजे होते. पण, राहुल गांधींना तेवढे भानही राहिले नाही.

 
 
आपण अध्यक्षपदाचा राजीनामा दिला म्हणजे पक्षाच्या सगळ्या जबाबदारीतून मुक्त झालो, असा समज त्यांनी करून घेतल्याचे दिसत होते. राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला, तरी काँग्रेस पक्षाचा राजीनामा अद्याप दिला नाही. त्यामुळे पक्षात पेचप्रसंगाची स्थिती उद्भवली असताना, रोम जळत असताना बासरी वाजवणार्‍या राजासारखी भूमिका राहुल गांधी यांनी बजावली होती. रणांगणात सेनापती धरातीर्थी पडल्यावर वा त्याने पराभवाच्या वा स्वत:च्या जिवाच्या भीतीने पळ काढल्यावर उर्वरित सैन्य जसे सैरावैरा पळत सुटते, तशी सध्या काँग्रेस पक्षाची अवस्था झाली आहे. अनेक राज्यांतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजीनामा देत आहेत. काँग्रेसच्या या नेत्यांनी राजीनामा देणे स्वाभाविक आहे, ज्या पक्षालाच भवितव्य नाही, त्या पक्षात असलेल्यांचे तरी भवितव्य कसे राहणार? काँग्रेसचे राज्यसभा सदस्य तसेच अमेठी राजघराण्यातील संजयिंसह यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा तसेच काँग्रेसचाही राजीनामा देत भाजपात प्रवेश केला आहे. संजयिंसह हे एकटे नाही, देशभरात असे हजारो संजयिंसह आहेत, जे काँग्रेस पक्षाला आणि त्यांच्या नेतृत्वाला कंटाळले आहेत. नेतृत्व नसल्यामुळे काँग्रेस पक्षात गटबाजी फोफावली आहे. महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक आमदारांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला आहे. आणखी अनेक जण त्या रांंगेत आहेत.
 
दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष शीला दीक्षित यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले, पण दिल्लीत शीला दीक्षित आणि प्रदेश काँग्रेसप्रभारी पी. सी. चाको यांच्यात छत्तीसचा आकडा होता. दिल्ली प्रदेश काँग्रेसचे प्रभारी असतानाही चाको, शीला दीक्षित यांच्या अंत्यदर्शनासाठी आले नाहीत, अंत्ययात्रेतही सहभागी झाले नाहीत. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरिंसग आणि आता राजीनामा दिलेले त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री नवज्योतिंसग सिद्धू यांच्यातील भांडण तर जगजाहीर आहे. पण, यातील कोणत्याच घटनेची दखल घ्यावी असे काँग्रेसच्या नेतृत्वाला वाटले नाही. राहुल गांधींमध्ये काँग्रेसचे नेतृत्व करण्याची क्षमताच नव्हती. मात्र, घराणेशाहीतून काँग्रेसचे नेतृत्व त्यांच्यावर लादले गेले. अभ्यास न झाल्यामुळे एखादा विद्यार्थी परीक्षा केंद्रांवर न जाताच जसा पळ काढतो, तसा पळ राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत काढला आहे.
 
मुळात राहुल गांधीची स्थिती कॉंग्रेससाठी असून अडचण आणि नसून खोळंबा यासारखी आहे. विशेष म्हणजे या सार्‍या पेचप्रसंगात श्रीमती सोनिया गांधी आणि श्रीमती प्रियांका गांधी-वढेरा सोयिस्कर मौन बाळगून आहेत. राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून श्रीमती सोनिया गांधींची कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नाही. त्यांनी या सार्‍या घटनाक्रमावर चिंता व्यक्त केली वा यातून पक्षाला सावरण्याचा प्रयत्न केला, असेही जाणवले नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष गांधी घराण्यावर नाराज आहे की गांधी घराणे काँग्रेस पक्षावर, हे कळायला मार्ग नाही. मात्र, सध्या दोघेही एकमेकांवर नाराज असल्यासारखे दिसते आहे. यात नुकसान गांधी आणि काँग्रेस या दोघांचेही होत आहे. यात काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्याचे राजकीय नुकसान झाले तर त्याचे कोणाला वाईट वाटणार नाही, पण, या दोघांच्या भांडणाची किंमत देशाला चुकवावी लागली तर ते कोणीही खपवून घेणार नाही.
  
सध्याच्या स्थितीत काँग्रेस पक्षासमोर तीन पर्याय आहेत. पहिला पर्याय म्हणजे राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेऊन पक्षाची जबाबदारी पुन्हा सांभाळणे. दुसरा म्हणजे कार्य समितीने राहुल गांधी यांचा राजीनामा मान्य करत त्यांच्या जागी दुसरा अध्यक्ष निवडणे. तिसरा पर्याय म्हणजे या पेचप्रसंगाच्या स्थितीत श्रीमती सोनिया गांधी यांनी पक्षाची सूत्रे पुन्हा हाती घेणे. दुसरा अध्यक्ष निवडायचा असेल तर तो गांधी घराण्यातील निवडायचा की गांधी घराण्याबाहेरचा? गांधी घराण्यातील विद्यमान तीन सदस्यांपैकी दोघांनी म्हणजे श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले आहे. त्यामुळे आता राहिल्या श्रीमती प्रियांका गांधी-वढेरा. गांधी घराण्यातील व्यक्तीला अध्यक्ष करायचे असेल, तर श्रीमती प्रियांका गांधी-वढेरा यांना अध्यक्ष करावे लागेल. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर तसेच पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी प्रियांका गांधी-वढेरा यांना अध्यक्ष करण्याची मागणी केली आहे. श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची अनुमती असेल, तरच प्रियांका गांधी-वढेरा कॉंग्रेसच्या अध्यक्ष होतील.
 
खरा मुद्दा गांधी घराण्याच्या बाहेरच्या व्यक्तीला अध्यक्ष करण्याचा आहे. यात पुन्हा दोन बाजू आहेत, काँग्रेसचा नवा अध्यक्ष ज्येष्ठ नेत्यांमधून निवडावा की तरुणांमधून? ज्येष्ठ नेत्यांमधून अध्यक्ष निवडायचा असेल तर मल्लिकार्जुन खडगे, सुशीलकुमार शिंदे यांच्या नावांची चर्चा आहे. तरुणांमधून निवडायचा असेल तर ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, मिलिंद देवरा यांच्यासह आणखी काही नावे आहेत.
 
काँग्रेसचा नवा अध्यक्ष ज्येष्ठ नेत्यांमधून निवडला, तर त्याला तरुणांचा विरोध राहील आणि तरुणांमधून निवडला तर त्याला ज्येष्ठ नेत्यांचे सहकार्य मिळणार नाही. कारण काँग्रेस पक्षात आजच ज्येष्ठ नेते विरुद्ध तरुण नेतृत्व अशी उभी फूट पडली आहे. त्यामुळे यापैकी कोणाचीही निवड झाली तरी नुकसान काँग्रेस पक्षाचेच होणार आहे. यामुळेच नवा अध्यक्ष निवडण्यासाठी काँग्रेस कार्य समितीची बैठक लांबणीवर टाकली जात आहे.
 
गांधी घराण्याच्या बाहेरची कोणाचीही काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून निवड केली तरी त्याला श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी आणि श्रीमती प्रियांका गांधी अशा तीन बॉसचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे त्याला फारकाही करता येईल, असे वाटत नाही. त्यामुळे काँग्रेस कार्य समिती याबाबत कोणता निर्णय घेते, याकडे सगळ्यांचे लक्ष राहणार आहे.
 
9881717817