कशी करावी पूजा?

    दिनांक :10-Aug-2019
प्रत्येक धार्मिक व्यक्तीच्या घरात देवघर असतं. घरात पूजाप्रार्थनाही केली जाते. पण कळत-नकळत होणार्‍या काही चुकांमुळे आपल्याला इच्छित लाभ मिळत नाहीत. पूजा अर्चनेचं योग्य फळ मिळण्यासाठी नेमकं काय करायला हवं याविषयी... 

 
  • देवघरातल्या मूर्तींचा आकार फार मोठा असू नये. देवघरातलं शिवलिंग हाताच्या अंगठ्यापेक्षा मोठं असू नयेे. शिवलिंगाचं पूजन करताना अनेक नियमांचं पालन करावं लागतं. त्यामुळे छोटं शिवलिंग योग्य ठरतं. तसंच इतर देवांच्या मूर्तीही छोट्या असायला हव्यात.
  • पूजा करणार्‍याचं तोंड पश्चिमेला असेल तर अधिक लाभ मिळतात. यासाठी देवघराचं तोंड पूर्वेकडे असायला हवं. पूजा करणार्‍या व्यक्तीचं तोंड पूर्वेकडे असलं तरी चांगले लाभ मिळू शकतील.
  • देवघर असलेल्या ठिकाणी भरपूर प्रकाश असला पाहिजे. दिवसातला काही काळ तरी सूर्यकिरणं या ठिकाणी पोहोचली पाहिजेत. हवाही खेळती असायला हवी. सूर्याच्या ऊर्जेमुळे वातावरणातली नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वाढते.
  • घरात देवघर असेल तर सकाळ संध्याकाळ पूजा करायला हवी. देवपूजा करताना घंटा वाजवा. घरभर घंटेचा आवाज निनादू द्या. घंटेच्या आवाजामुळे घरातली नकारात्मकता दूर होऊन सकारात्मक ऊर्जेचा वास राहतो.
  • देवाला ताजी फूलं अर्पण करा. तसंच पूजनासाठी भरलेलं पाणीही ताजं हवं. तुळशीची पानं आणि गंगाजल कधीही शिळं होत नाही. त्यामुळे त्याचा वापर कधीही करता येतो. वास घेतलेलं किंवा खराब फूल देवाला अर्पण करू नये.
  • देवघराच्या ठिकाणी चामड्याच्या वस्तू, पादत्राणं नेऊ नये तसंच देवघरात पूर्वजांचे तसंच मृत व्यक्तीचे फोटो असू नयेत. घरात दक्षिणेकडच्या भिंतीवर मृत व्यक्तींचे फोटो लावता येतील.
  • देवघराच्या आसपास शौचालय असू नये.
  • दररोज रात्री देवघर पडद्याने झाकून टाका. यामुळे देवाच्या विश्रांतीत बाधा येत नाही.