माझे माहेर पंढरी...

    दिनांक :10-Aug-2019
प्रज्ञा जयंत बापट
सगळ्या संतांचं, वारकर्‍यांचं प्रेमाचं गाव म्हणजे पंढरपूर! तिथल्या बापरखुमादेवीवराला संतांची मांदियाळी विठूमाउली म्हणते. जनसामान्यांच्या मनात पिढ्यान्‌पिढ्या रुजलेलं ‘विठोबा रखुमाई’चं अद्वैत 28 युगांपासून सगळ्यांचं माहेरपण करत आहे. कटीवर हात ठेवून समचरण असलेला पांडुरंग अठरापगड जातीच्या, बारा बलुतेदारांच्या पुरुषसूक्ताचं मूर्तरूप वाटतो. त्या विठ्ठलाची उभी राहण्याची पद्धतच सांगते- ‘स भूमीं विश्वतो वृत्वाऽत्य तिष्ठत्‌ दशांगुलम्‌.’ 
 
 
माणसाची बौद्धिक, मानसिक उत्क्रांती झाली आणि मनुष्याच्या टोळ्यांचा समाज झाला. भौतिक सुखाची साधनं वाढू लागली. मानवी समाजाला समाजशीलतेची सवय झाली आणि एक सुस्थिर, ठामपणे पाय रोवून उभा असलेला ‘समाजपुरुष’ उभा ठाकला. हे सगळं एकाएकी नाही झालं, फार मोठा काळ जावा लागला. ‘वसन्तो अस्थासीदाज्यं ग्रीष्म इघ्म: शरद् हवि:’ जणूकाही हा एक ‘यज्ञ’ झाला. त्या यज्ञकुंडात वसंत ऋतू तूप, ग्रीष्म ऋतू समिधा आणि शरद् ऋतू जणू हवन द्रव्य झाला. असे अनेक ऋतू त्या कालयज्ञात समाप्त झाले. नंतर समाजपुरुष प्रगट झाला. पुरुषसूक्तात ‘अबघ्नन्‌’ म्हणजे बांधला, असा अर्थपूर्ण शब्द योजला आहे. हा समाजपुरुष उभा करण्यासाठी त्या काळच्या माणसांनी केलेले प्रयत्नही किती आणि कसे- ‘सप्तास्थान्‌ परिधय:, त्रिसप्त: समिध: कृत:’
 
सप्तास्थान्‌ परिधय : म्हणजे सात परिधी. काम करण्याच्या सात पद्धती- 1) स्थूल शरीराने म्हणजे करायचे आहे म्हणून दिलेले काम करणे. 2) इच्छाशरीराने- स्वेच्छेने काम करणे. 3) बहिर्मानस शरीराने- मन लावून काम करणे. 4) अंतर्मानस शरीराने- मनच पूर्णपणे त्या कामाच्या विचाराने व्यापून जाणे. 5) बुद्धी- बुद्धी वापरून अचूकपणे काम करणे. 6) पराबुद्धी- कल्पकतेने, बुद्धीचा दर्जा वाढवून ते काम करणे आणि 7) जीव- म्हणजे जीव ओतून काम करणे.
 
त्रिसप्त समिध: कृत:- म्हणजे शरीराच्या एकवीस ‘समिधां’ची आहुती दिली. 7 ज्ञानेन्द्रिये, 7 कर्मेन्द्रिये, 5 प्राण (प्राण, उदान, व्यान, अपान, समान) आणि चैतन्य आणि अहंकार. म्हणजे काया-वाचा-मने आपल्या श्रेष्ठ, बुद्धिमान पूर्वजांनी, आपल्या आयुष्याच्या समिधांचा हजारो वर्षे ‘यज्ञ’ करून समाजपुरुष उभा केला.
 
स्वत:तल्या दुर्गुणांशी, संशयांशी, पूर्वग्रहांशी झुंजत, झगडत, त्रुटी, वैगुण्य नाहीसं करत, समन्वय साधत, सहिष्णुता शिकत, एकमेकांचा सन्मान करत हा एकसंध समाज उभा ठाकला.
 
अनेक ‘पूजा’ सांगताना पुरोहित पुरुषसूक्तातील श्लोक म्हणत असतात. पुरुषसूक्त हे उत्क्रांतीचे इतिहासकथन आहे. सामान्य स्त्रियांनाही त्याचं ज्ञान असावं, म्हणूनच पूजेशी काहीही संबंध नसताना स्त्रियांना पुरुषसूक्त ऐकवण्याचा रिवाज सुरू झाला. आपल्या पूर्वजांच्या परिश्रमांचं, बुद्धिमत्तेचं, पिढ्यान्‌पिढ्यांच्या प्रयत्नांचं प्रतीक असलेला समाजपुरुष ‘विठोबा!’ त्याच्या दर्शनाला सगळा समाज पंढरपूरला लोटतो. पांडुरंग, पंढरपूर, चंद्रभागेचं वाळवंट आणि लेकुरवाळ्या विठूच्या बालगोपाळांच्या संबंधित कहाण्यांनी मराठी भावविश्व रंगून गेलं आहे.
 
अवघ्या महाराष्ट्रातलं आणि महाराष्ट्राबाहेरचं मराठीपण आषाढी एकादशीला पंढरपुरात लोटतं. जगण्यासाठी करावी लागणारी आवश्यक कामंसुद्धा बाजूला टाकून आषाढी एकादशीला पंढरपूरला येण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून श्रद्धेने आणि आनंदाने सुरू ठेवणारे लाखो वारकरी असतात. अठरापगड जाती, बारा बलुतेदार, श्रीमंत, गरीब, सुशिक्षित, अशिक्षित, सज्जन आणि दुर्जनही... कारण विठोबा सगळ्या समाजाचा देव आहे. तो समाजपुरुष आहे. सामाजिक प्रवाहात, प्रवासात सामील हेऊन प्रत्येकाची समन्वयशीलता वाढते. सहकार्य करण्यात किती मोठा आनंद असतो हे कळतं. रोजच्या भाकरीसाठी धडपडणार्‍या अगदी सामान्य माणसालाही भाकरीपलीकडे काही असल्याचा साक्षात्कार होऊन जातो.
 
‘विठोबा रखुमाई’चा स्वर, ताल, सूर, लय, ठेका सगळं सगळं अंतरंगातून यायला लागतं आणि लाखो वारकर्‍यांमध्ये विठ्ठलच प्रगटतो...
 
‘सहस्रशीर्षा पुरुष: सहस्राक्ष: सहस्रपाद्’... वारीच्या वाटेवरच्या वारकर्‍यांच्या कहाण्यासुद्धा परंपरागत आलेल्या. एका पिढीने श्रद्धेने दिल्या, दुसर्‍या पिढीने श्रद्धेने स्वीकारल्या. या कहाण्यांमध्ये- म्हातारीच्या पायात मोडलेला काटा काढणारा, धो धो पावसात शेकोटी पेटवून देणारा, अंगावर घोंगडी पांघरून देणारा, ज्वराने तापलेल्या लेकरांच्या अंगावर आपलं उपरणं टाकून ज्वर उतरवणारा, रस्ता चुकल्यावर पखवाज वाजवून योग्य रस्त्यावर नेणारा, गलितगात्र म्हातार्‍या वारकर्‍याला स्वत:च्या खांद्यावर बसवून पंढरपूरच्या वेशीपर्यंत नेणारा विठ्ठल आहे; तर कजाग सासूच्या तडाख्यातून सुटून, वारीला आलेल्या सुनेला मायच्या मायेनं, अन्नपूर्णेच्या हातानं जेवू घालणारी रुख्मिणीमाय आहे. शिधा अपुरा पडायला नको म्हणून ज्वारीचं पोतं स्वत: पाठीवर घेऊन येणारा विठ्ठल आणि लेकी-सुनांच्या दागिन्यांवर नजर ठेवणार्‍या चोरट्यांना हातातल्या टाळानीच दणकून मार देणारी रुख्मिणीमाय कुणाकुणाच्या रूपात येतात- नंतर दिसतही नाहीत.
 
चंद्रभागेत भक्तीचे तरंग उमटतात आणि भक्ताच्या रिंगणात भजन, भारुडांची, विरहिणी, अभंगांची, हरिपाठाची आवर्तनं होत असतात आणि अंतरंगात या अनेक कहाण्यांची पारायणं!