'साहो'मध्ये झळकणार महेश मांजरेकर

    दिनांक :10-Aug-2019
 बाहुबलीच्या प्रचंड यशानंतर अभिनेता प्रभास आता 'साहो' चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सध्या चित्रपटसृष्टीत या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटात एक मराठी अभिनेताही वेगळी भूमिका साकारत आहे. त्या अभिनेत्याचे नाव आहे महेश मांजरेकर.
बिग बजेट असलेल्या या चित्रपटात अनेक बॉलिवूडमधील चेहरे दिसणार आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर 'प्रिन्स' ही भूमिका साकारत आहेत. साहो चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च होण्यापूर्वी निर्मात्यांनी महेश मांजरेकर यांचे एक पोस्टर प्रसिद्ध केले आहे. या पोस्टरमध्ये महेश मांजरेकरांचा हटके लूक दिसत आहे. गळ्यात चांदीच्या मोठ्या चेन, कानात बाली, प्रिंटेड सूट असलेल्या पेहरावातील महेश मांजरेकर यांचे पोस्टर लक्षवेधी ठरत आहे.

बहुप्रतिक्षित साहो चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून श्रद्धा कपूर, नील नितीन मुकेश, जॅकी श्रॉफ, मंदिरा बेदी, महेश मांजरेकर, चंकी पांडे, अरुण विजय आणि मुरली शर्मा, अशी तगडी स्टारकास्ट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रद्धा कपूर आणि प्रभास यांच्या प्रमुख भूमिका असलेला साहो चित्रपट ३० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.