पाकड्यांचा अनाठायी थयथयाट!

    दिनांक :10-Aug-2019
चौफेर
सुनील कुहीकर
परवाचा तो प्रसंग आठवतो? लोकसभेत 370 कलम रद्दबातल ठरवण्याचा प्रस्ताव मांडला गेला होता. सभागृहात त्यावर चर्चा सुरू होती अन्‌ काश्मीरचे स्वयंघोषित नेते फारुख अब्दुल्ला तिकडे घरात बसून बोंबा मारत होते. त्यांना अटकही करण्यात आलेली नाही अन्‌ ताब्यातही घेण्यात आलेले नाही. त्यांना कुणी अडवून तर मुळीच धरलेले नाही, उलट ते स्वत:च्या मर्जीने घरात बसले आहेत, अशी अधिकृत घोषणा गृहमंत्र्यांनी सार्‍या देशाच्या साक्षीने केली. पण, चरफडत राहण्यापलीकडे अब्दुल्लांना करता काहीच येत नव्हतं. मग त्यांनी चार आसवं ढाळण्याची नौटंकी केली. आपल्याला घरात बंदिस्त करून ठेवले असल्याचा कांगावा केला. ज्यांना घराच्या गॅलरीत येऊन माध्यमांसमोर बोलायला कुणी अडवलं नाही, त्यांना संसदेत उपस्थित राहण्यास मनाई केली जाण्याची शक्यता सुतराम नव्हती. पण करता काय? सभागृहात भूमिका मांडली तरी निर्णय बदलण्याची ताकद नाही. रस्त्यावर उतरून आंदोलन करावं म्हटलं, तर खुद्द काश्मिरी जनता गर्दी करील याची शाश्वती नाही. म्हणजे शेवटी इभ्रतीचे वाभाडेच! सरकारी बंगला सरकारलाच भाड्याने देण्याच्या किमयेपासून तर बीसीसीआयच्या आर्थिक गैरव्यवहाराचे रंगतदार किस्से नावावर असताना, बाहेर तैनात जवानांच्या उपस्थितीत मोर्चेबिर्चे काढू शकण्याची जराही शक्यता नसताना, घरात राहून, मूठ झाकून ठेवून ती सवा लाखाची असल्याचे भासवणे सोपे होते. आरडाओरड करून सरकारवर आगपाखड करणे तर त्याहून सहज. अब्दुल्लांंनी तेच अन्‌ तेवढेच केले.
 
 
 
 
सध्या पाकिस्तानही तेच अन्‌ तेवढेच करीत आहे. एखाद्या मोठ्या उद्योगसमूहातील कामगार संघटनेच्या नेत्यांची भूमिका नजरेसमोर आणून बघा. म्हणजे पाकिस्तानच्या वर्तनामागील कारणांची कल्पना येईल. कामगार नेत्याला कामगारांच्या भावनांची, मानसिकतेची पुरेपूर कल्पना असते. त्यांच्यासमोर काय बोलायचे, हेही त्याला व्यवस्थितपणे ठाऊक असते. म्हणूनच कामगारसभेत बोलताना तो नेता कंपनीच्या मालकाला वाट्‌टेल तेवढ्या शिव्याशाप देतो. कामगारांची बाजू ठासून मांडतो. त्यांच्या सर्वच मागण्या मान्य होणार नाहीत हे माहीत असतानाही त्या मान्य करण्याचा आग्रह धरतो. कारण तसे करणे हे त्याच्या स्वत:च्या आणि संघटनेच्याही अस्तित्वासाठी आवश्यक असते...
 
370 कलम रद्द ठरविण्याचा निर्णय भारतीय संसदेत मंजूर झाला. तो भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. त्याच्याशी पाकिस्तानला काय घेणेदेणे, असा स्वाभविक सवाल भारतासह जगातील इतर देशांच्या नागरिकांच्या मनात उपस्थित झाला असला, सौदी अरेबियासारख्या मुस्लिम देशाच्या राजकुमारालाही पाकिस्तानी पंतप्रधानांच्या विधानाचे आश्चर्य असले, तरी पाकिस्तानच्या आजवरच्या राजकीय वाटचालीचा अभ्यास असलेल्यांना, भारताशी राजकीय व व्यापारिक संबंध तोडण्याच्या त्याच्या विधानाचे फारसे अप्रूप असणार नाही. गेली सत्तर वर्षे जो देश केवळ काश्मीरच्या मुद्यावर राजकारण करीत राहिला, त्याच्यासमोरचा राजकारणाचा मुद्दाच हिरावला गेलाय्‌ म्हटल्यावर त्याचे अस्वस्थ होणे स्वाभाविकच. सारा थयथयाट त्या अस्वस्थतेपोटी आहे. पाकिस्तानचे अख्खे राजकारण भारतद्वेषावर टिकून आहे आणि त्या द्वेषाची बीजं काश्मीरच्या मुद्यात रुजली आहेत. त्यामुळे, भारताच्या या निर्णयावर आपला रोष जाहीरपणे व्यक्त केला नाही, तर आपल्याच देशातले लोक आपले जगणे मुश्कील करतील, हे त्यांना ठाऊक आहे. भारताशी युद्ध करणे सोपे नाही, परवडणारे तर मुळीच नाही, याची कल्पना त्या देशातील धुरीणांना आहे. पाकिस्तानच कशाला, जगातील अमेरिका, रशिया, चीनसारखे बलाढ्य देशही अलीकडे युद्धाचा मार्ग स्वीकारेनासे झाले आहेत. ज्यांना लोक युद्धखोर समजत होते, ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील राष्ट्राध्यक्षपदाच्या त्यांच्या कारकीर्दीत युद्धाची पावलं कधी उचलली नाहीत. व्हिएतनामविरुद्ध कठोर पावलं उचलण्याची मर्यादा त्यांनी निश्चित करून टाकली आहे. तालिबानसंदर्भातील त्यांची भूमिकाही तीच आहे. शहाणपणाचे हेच धोरण चीनने अनुसरले आहे. चीनचे वर्चस्व मान्य करूनही स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व राखून असलेल्या हॉंगकॉंगपासून तर मकाऊ, तायवानपर्यंतच्या देशांबाबत युद्धेतर पर्याय निवडण्याचीच भूमिका चीनने स्वीकारली आहे. ताकदीने कितीही बलाढ्य असला तरी चीन भारताशी युद्ध कधीच करणार नाही. कारण, रणांगणावर एकमेकांविरुद्ध उभे ठाकण्याचे दिवस आणि तर्‍हा कधीच मागे पडली आहे. आता एकमेकांच्या बाजारपेठा काबीज करण्याचे दिवस आहेत. युद्धाच्या मार्गाने जाऊन भारतासारखी मोठी बाजारपेठ घालवण्याचा मूर्खपणा चीन कसा करू धजेल? जे चीन करू धजत नाही ते करण्याचे धाडस पाकिस्तान तरी कसा करेल? मुळात, त्याला युद्धाच्या मार्गाने जायचे नाहीय्‌. ते त्याला परवडणारही नाही. त्यामुळे खुद्द इम्रान खानच, युद्धाचा पुरस्कार करून कुणाचे भले होणार आहे, असा सवाल उपस्थित करीत आहेत. ऊरी असो वा पुलवामा, भारतानं दिलेली त्याची प्रत्युत्तरं पाकिस्तानी सैनिकांनी अनुभवली आहेत. पण आपण युद्धाला घाबरत नाही, हे दाखवण्याची राजकीय मुत्सिद्देगिरी त्यांना जगापुढे सिद्धही करायची आहे. अशा स्थितीत पाकिस्तानी मिलिटरीची भूमिका तिथल्या पंतप्रधानांच्या बरळण्यातून व्यक्त होते आहे- युद्ध न करताही मुजोरी कायम राखण्याची...!
 
परवा समझौता एक्स्प्रेस वाघा बॉर्डरवर थांबवण्याचा निर्णय असो, की मग भारताशी व्यापारिक संबंध तोडण्याचा, आपण खूप रागावलो असल्याचा, आपला संताप आता अनावर झाला असल्याचा देखावा करण्याचे हे राजकारण आहे. तिथली मिलिटरी असो की मग इम्रान खान, असली नाटकं करणे ही त्यांची अपरिहार्यता आहे. ज्या काश्मीरच्या भरवशावर आजवर राजकारण केले, तो मुद्दाच आता उरला नाहीय्‌ म्हटल्यावर मनस्ताप तर होणारच! म्हणूनच हे उथळ वागणे सुरू झाले आहे. संबंध तोडण्याची भाषा बोलण्यापूर्वी त्यांनी एकदा वस्तुस्थिती तरी तपासून बघायला हवी होती. शेजारी देश असूनही, भारताने मोदींच्या शपथविधीला त्याच्या पंतप्रधानांना बोलावले नाही, ज्या देशाला ‘मोस्ट फेवर्ड नेशन्स’च्या यादीतून भारताने केव्हाच बाद केले, त्या देशाने भारताशी संबंधविच्छेदाची भाषा बोलणे किती हास्यास्पद आहे? पाकिस्तानलाही कळतेय्‌, आपण जे करतोय्‌ त्याने विश्वापुढे आपले हसे होत आहे हे. पण, तसे न केले तर अजून फजिती होणार असल्याच्या कल्पनेतून या पोकळ डरकाळ्या फोडल्या जाताहेत. बरं, बोलावलाच त्यांनी त्यांचा राजनयिक अधिकारी भारतातून परत अन्‌ भारतानेही आपला उच्चाधिकारी काढून घेतला इस्लामाबादेतून, तर काय बिघडणार आहे? गेल्या आर्थिक वर्षात भारताने पाकिस्तानला एकूण 2,06,000 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा माल पुरवला. त्या तुलनेत त्या देशाकडून 495 दशलक्ष डॉलर्सचा माल आयात केला. यंदाच्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या त्रैमासिकात भारताने पाकिस्तानला केलेली निर्यात 452.5 दशलक्ष डॉलर्सच्या वस्तूंची होती; तर त्या देशाकडून केलेली आयात 7.13 दशलक्ष डॉलर्सच्या मालाची. दिवसाकाठी 2000 टन बटाट्यांचा पुरवठा करतो भारत त्या देशाला. याशिवाय त्यानं नाकारलं तर रसायनं, कापूस, प्लॅस्टिक, डाय यांसारख्या उत्पादनांना जगात भरपूर मागणी आहे. दक्षिण आशिया आणि मध्यपूर्वेकडील देशांकडे वळवता येईल भारताला तो माल. पाकिस्तानला हे ठाऊक नसेल? आपल्या भूमिकेचा, धमक्यांचा काडीचाही परिणाम होणार नाही, याची जाणीव असतानाही भारताला धमक्या देण्याच्या त्या देशाच्या भूमिकेला स्वाभिमानाची जराही किनार असती ना, तरीही त्याचे स्वागत झाले असते जगभरात. पण, तसे नसल्यानेच त्याचे हसे होत आहे...
 
राजकीय गरज म्हणून असेल कदाचित, पण आज चीनपासून रशियापर्यंत, युरोप-इस्रायलपासून अमेरिकेपर्यंत, कुणालाच भारताविरुद्ध उभे राहायचे नाही. काश्मिरी जनतेच्या विकासासोबतच भारताने 370चा मुद्दा दहशतवादाशीही जोडला आहे. आज अर्धे जग दहशतवादाला बळी पडले असताना कोण विरोध करेल त्या विषयाला? अगदी भारतातसुद्धा सरकारच्या या निर्णयाला विरोध झाल्याचे, कुठे त्याविरुद्ध मोर्चे निघाल्याचे चित्र नाही. शेजारच्या देशात मात्र सुतक लागल्यागत चेहरे झालेत सर्वांचे. ज्याचा जन्मच भारतद्वेषातून झालाय्‌, बांगलादेशच्या रूपात भारताने आपले तुकडे केले असल्याची सल ज्याच्या मनात आहे, त्या पाकिस्तानच्या डरकाळ्या अन्‌ थयथयाटाला म्हणूनच अर्थ उरत नाही जराही...
9881717833