समज-गैरसमज!

    दिनांक :11-Aug-2019
मानवी मन प्रत्येक घटनेमागचं कारण, मीमांसा शोधीत असते. अर्थातच, ही कारणमीमांसा काळाच्या कसोटीवर टिकणारी असतेच, असे नाही. असे असले तरी, असे समज त्याप्रमाणे एखाद्या घटनेची कारणमीमांसा शतकान्‌ शतके मानवी मनात घर करून असते. अशा अनेक घटनांचे वैज्ञानिक तत्त्वावर आधारित स्पष्टीकरण उपलब्ध आहे. तरी ते सर्वसामान्य माणसाने स्वीकारलेले असेलच, असे नाही. सूर्य आणि चंद्रग्रहण या घटनांबाबत अशी परिस्थिती आहे. नियमीत घडणार्‍या या खगोलशास्त्रीय घटनांबद्दल अद्यापही प्रचंड गैरसमज आहेत. या गैरसमजांचे मूळ मानवी आकलनात आहे. रोज सर्वसामान्य दिसणारे चंद्र आणि सूर्य झाकोळल्याने आश्चर्यचकित होणे सहाजिकच आहे. ज्या काळामध्ये मानवी आकलन तेवढे प्रगल्भ नव्हते, त्यावेळी प्रत्येक घटनेचा अन्वयार्थ शाप आणि वरदान, देव आणि दानव, शुभ आणि अशुभ या चौकटीत लावला जात असे. त्यातूनच राहू आणि केतू हे राक्षस चंद्र आणि सूर्याला गिळण्याची कथा रुढ झाली असावी. ग्रहणकाळात चंद्र आणि सूर्याचे तेज कमी होत जाते. खग्रास चंद्रग्रहण असेल, तर चंद्र काळवंडलेला दिसतो. हे दृष्य त्यामागची खगोलीय कारण माहीत नसल्यामुळे भीतिदायक आणि अशुभ वाटणे साहजिक आहे. खग्रास चंद्रग्रहणाच्या तुलनेत खग्रास सूर्यग्रहण अधिक परिणामकारक असते. एखाद्या भूभागात क्वचितच घडणारी ही घटना समाजमनावर दीर्घकाळ परिणाम करणारी असते. खग्रास सूर्यग्रहणात भर दिवसा सूर्यप्रकाश मंद होत जातो. सूर्य मावळताना जशी स्थिती असते, तशी स्थिती निर्माण होते. पक्षी रात्र होणार असे समजून घरट्याकडे परततात. गाई, म्हशी, शेळ्या यांनाही गोठ्याकडे परतण्याची ओढ लागते. अचानक कमी झालेल्या प्रकाशाने त्यांचा गोंधळ उडतो. वनस्पतीही पाने मिटून त्यास प्रतिसाद देतात. सूर्यिंबब पूर्णपणे झाकण्यापूर्वी काही सेकंद जमिनीवरून उन्ह सावल्यांचे पट्टे थरथरताना दिसतात. प्रकाशाची ही उघडझाप समजून घेतली तर नयनमनोहर नसता भीतिदायक वाटू शकते. सूर्यिंबब पूर्णपणे झाकले जात असताना ते अंगठीला चमकणारा हिरा लावल्याप्रमाणे दिसते. सूर्यबिंबाचा मध्यभाग झाकल्यामुळे त्याच्या कडा अधिक स्पष्ट आणि तेजस्वी दिसतात. हा सर्व नजराणा नजरेत साठविण्यासारखा असतो. मात्र मनात भीती असल्यामुळे लोक त्याकडे पाठ फिरवतात.
 

 
 
चंद्रगहण आणि सूर्यग्रहण का होते? हे आता माहीत झाले आहे, ही एक खगोलशास्त्रीय घटना असून ती सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आणि एक पातळीत आल्याने घडते. त्या घटना कधी घडणार याचे अचूक भाकित आता करता येते. त्यामुळे या घटनेमागची अनिश्चितता नाहीशी झाली आहे. पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे चंद्रग्रहण आणि चंद्राची सावली पृथ्वीवर पडल्यामुळे सूर्यग्रहण होते. असे असले तरी, ग्रहणाविषयी अनेक गैरसमज आहेत. नासा या अमेरिकन अंतरीक्ष संशोधन संस्थेने त्यातील काही गैरसमजातील योग्य ते स्पष्टीकरण देऊन त्यांच्यातील फोलपणा दाखवला आहे.
 
सूर्यग्रहणाच्या काळात सूर्याकडून अनष्ठी प्रारणे उत्सर्जित केली जातात. त्यामुळे सूर्यग्रहण पाहणे धोक्याचे असते, हा समज चुकीचा आहे. कारण सूर्यग्रहणाच्या काळात सूर्याच्या अंतर्भागात घडणार्‍या प्रक्रियांवर काहीच परिणाम होत नाही. दिव्यापुढे अपारदर्शक वस्तू धरल्यामुळे दिवा दिसत नाही. मात्र त्याचा दिव्यातून बाहेर पडणार्‍या प्रकाशावर काहीच परिणाम होत नाही. सूर्याच्या बाबतीत नेमके हेच घडते. त्यामुळे ग्रहण काळात सूर्य आणि चंद्राव्दारे अपायकारक प्रारणे बाहेर फेकली जातात, हा समज चुकीचा आहे. ग्रहण पाहिल्याने अंधत्व येते, हा आणखी एक गैरसमज! सूर्यग्रहणाच्या वेळी सूर्याकडे थेट पाहू नये कारण त्यामुळे डोळ्यांना इजा होण्याचा संभव असतो. मात्र योग्य ती काळजी घेऊन विशेषतः सूर्यग्रहण पाहिल्यास डोळ्यांना इजा होत नाही. यासाठी काळा गडद चष्म्याचा किंवा जाड रंगीत कागदापासून बनविलेल्या चष्म्याचा वापर करावा. ग्रहणकाळात अन्न पदार्थात विषारी पदार्थ निर्माण होतात, हा आणखी एक गैरसमज! ग्रहणकाळात कुठलेही नवीन जीवाणू आणि विषाणू तयार होत नाहीत. इतर वेळी आपण अन्नाची जशी काळजी घेतो, तशीच ग्रहणकाळात घेतल्यास अन्नावर कोणताही परिणाम होत नाही. गर्भवती महिलेने ग्रहण पाहिल्यास गर्भावर अनिष्ठ परिणाम होतो, असा समज आहे. गर्भवती महिला इतरांप्रमाणेच डोळ्यांची योग्य काळजी घेऊन ग्रहण पाहू शकतात. यात कोणतेही मानसिक दडपण असता कामा नये. ग्रहण काळात जन्म झाल्यास, जन्मलेल्या बालकावर अनिष्ठ परिणाम होतो, अशा बालकाच्या जीवनात अनिष्ठ घटना घडतात, हा एक गैरसमज आहे. खग्रास ग्रहणानंतर अनिष्ठ घटना घडतात असा सर्वसाधारण समज आहे. ज्यावेळी दोन घटनांचा परस्पर संबंध लावला जातो, त्यावेळी वैज्ञानिक पद्धतीचा क्वचितच आधार घेतला जातो. ज्यावेळी दोन घटनांचा परस्पर संबंध जुळतो, तीच बाब ध्यानात घेतली जाते. इतर वेळी अनेक वेळा तसा संबंध जुळलेला नसतो. मात्र त्या घटनांचा विचार केला जात नाही. उदाहरणार्थ खग्रास सूर्यग्रहण आणि अनिष्ठ घटना पाठोपाठ घडल्यास त्यांचा संबंध असल्याचा गवगवा केला जातो, ही बाब शंभरापैकी एकदाच घडलेली असते. 99 वेळा तसा संबंध जुळलेला नसतो. मानवी मन ही बाब स्वीकारण्यास तयार नसते. विज्ञान युगात असा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.
 
‘बर्म्युडा त्रिकोण’ हे असे आणखी एक प्रकरण! या त्रिकोणाविषयी असणार्‍या अशक्यप्राय घटना तेवढ्याच उत्साहाने चर्चिल्या जातात. उत्तर अटलांटिक महासागरातील हा त्रिकोणी प्रदेश. प्यूर्टो रिको, बर्म्युडा आणि प्लोरिडाचे शेवटचे टोक यांनी सिमित केलेला! दुसर्‍या महायुद्धानंतर बर्म्युडा त्रिकोणात घडणार्‍या घटनांबाबत जोरदार चर्चा सुुरू झाली. या प्रदेशावरून जाणारी विमाने अचानक नाहीशी होतात. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात विमानाची पलटणच येथे गायब झाली. या भागातून जाणारी जहाजे अचानक गायब होतात. त्यांचा पुन्हा थांगपत्ता लागत नाही, असे का घडते? याविषयी अनेक तर्क-वितर्क पुढे येऊ लागले. काहींच्या मते, या ठिकाणी तीव्र चुंबकक्षेत्र असल्याने विमाने खेचली जातात. जहाजांचीही तशीच अवस्था होते. काहींनी परग्रहावरील अतिप्रगत प्राणी हे घडवून आणतात असाही दावा केला. यावर अनेक पुस्तके लिहिली गेली. यात ज्याचा काही पुरावा नाही अशा ऐकीव गोष्टींचाही समावेश केला गेला. हा भाग जहाजे टाळू लागली. काही शास्त्रज्ञांनी या घटनांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून पुढे आलेले निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत. बर्म्युडा त्रिकोणात नाहीशी झालेल्या जहाजांची संख्या समुद्रात इतर ठिकाणी बुडालेल्या जहाजाच्या संख्येपेक्षा अधिक नाही. याठिकाणी निर्माण होणारी वादळे आणि त्यात बुडणारी जहाजे यांची संख्या खूपच जास्त नव्हती. शिवाय हे सामान्य परिस्थितीत झालेले अपघात होते. त्यात गूढ असे काहीच नव्हते. अशा घटना चित्रित करणार्‍या लेखकांनी ज्यावेळी या त्रिकोणात वादळे निर्माण झाली, असा दावा केला आहे. त्यावेळी हवामान खात्याच्या अहवालानुसार समुद्र शांत होता. या ठिकाणी बुडालेल्या जहाजांची संख्या फुगवून सांगण्यात आली आहे. बेपत्ता झालेले जहाज सुखरूप परत आलेले असतानाही त्याची दखल घेतली गेली नाही. जगामध्ये सर्वात जास्त धोकादायक अशा महासागरातील ठिकाणात बर्म्युडा त्रिकोणाचा समावेश नाही. सायक्लोप्स नावाची मालवाहू नौका अपघातग्रस्त झाली. ही नौका मँगनिजचे खनिज वाहून नेत होती. या नौकेवर 309 खलाशी होते. ही नौका बुडण्याची अनेक कारणे सांगितली जातात. त्यात वादळात सापडल्याने आणि अतिभारामुळे नौका बुडाल्याचे सांगितले जाते. डिसेंबर 1945 साली 19 क्रमांकाचा विमानाचा ताफा समुद्रावरून उड्डाण करीत होता. यात बॉम्बफेक करणारी पाच विमाने होती. उड्डाण केलेली ही विमाने परतली नाहीत. नौकादलाने ही विमाने अपघातग्रस्त होण्याची कारणे रस्ता भरकटणे आणि इंधन संपणे ही दिली आहेत. मरिनर हे त्यांचा शोध घेण्यासाठी गेलेले विमानही अपघातग्रस्त झाले. विमानाचा झालेला स्फोट हे त्याचे कारण होते. असेच अपघात डगलस डीसी-3 या विमानाचा आणि कॉनेमेरा-4 या बोटीचे झाले आहेत. या अपघातांची कारणे अस्पष्ट असली, तरी असेच अपघात जगात इतरत्रही घडत असतात. कित्येक वेळा अशा अपघातांची कारणे अस्पष्ट असतात. बर्म्युडा त्रिकोणाच्या आसपासही जर चुकून असा अपघात झाला तर पुन्हा बर्म्युडा त्रिकोणाबद्दल असणारे रहस्य उचल खाते. पुन्हा घडलेल्या आणि न घडलेल्या घटनांची उजळणी होते. त्यात भरही घातली जाते. त्यामुळे हे रहस्य आणखीच गडद होते. लहान मुलांच्या मनात याविषयी प्रचंड कुतूहल या त्रिकोणाबाबत असते. त्यांना अशा घटनांकडे अधिक चिकित्सेने पहायला शिकवले पाहिजे. स्वप्नाबाबतही असेच गैरसमज आढळतात. खर तर स्वप्न हे झोपेचा एक नैसर्गिक भाग आहे. मेंदू त्याचा उपयोग अनुभवाचे सुसूत्रीकरण करण्यासाठी करतो. पहाटे पडणारी स्वप्ने खरी होतात, असा समज आहे. त्याला शास्त्रीय आधार नाही. रात्रभर स्वप्न पडत असतात. स्वप्नातून जाग आल्यास ते स्वप्न आपल्याला आठवते. पुढे घडणार्‍या घटनांची चाहून स्वप्नामध्ये लागते असाही समज आहे. मनात चाललेल्या विचारांचे प्रतििंबब स्वप्नात पडते. कधी कधी घटना जुळून येतात. मात्र ठामपणे असे घडेलच असे सांगता येत नाही. स्वप्नात दिसणार्‍या गोष्टींचे विश्लेषण काहीजण करतात मात्र त्याला ठोस असा आधार नाही, हे तेवढेच खरे!
• डॉ. पंडित विद्यासागर 
(लेखक हे स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा
विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)
••