पाकिस्तानकडून लाहोर-दिल्ली ‘मैत्री’ बससेवाही बंद

    दिनांक :11-Aug-2019
इस्लामाबाद,
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून पाकिस्तान चांगलाच सैरभैर झाला आहे. थर एक्स्प्रेस व समझौता एक्स्प्रेस या रेल्वेगाडय़ा बंद करण्याची घोषणा केल्यानंतर आता पाकिस्तानने लाहोर-दिल्ली मैत्री बससेवा बंद करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वीच पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंधही औपचारिकरीत्या संपुष्टात आणले आहेत. पाकिस्तानचे दूरसंचार व टपालसेवा मंत्री मुराद सईद यांनी याबाबत माहिती दिली. राष्ट्रीय सुरक्षा समितीची जी बैठक झाली होती त्यातील निर्णयांच्या अनुषंगाने लाहोर-दिल्ली बससेवा बंद करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले. 

 
लाहोर-दिल्ली बससेवा ही फेब्रुवारी १९९९ मध्ये सुरू करण्यात आली होती पण २००१ मध्ये संसदेवर झालेल्या हल्ल्यानंतर ती बंद करण्यात आली. नंतर जुलै २००३ मध्ये ती पुन्हा सुरू करण्यात आली होती.
लाहोर दिल्ली बससेवेत दर सोमवार, बुधवार व शुक्रवारी दिल्ली पर्यटन महामंडळाच्या बस दिल्ली गेट येथील आंबेडकर स्टेडियम येथून लाहोरला जातात. पाकिस्तान पर्यटन महामंडळाच्या बस मंगळवार, गुरूवार, शनिवारी दिल्लीहून लाहोरला जातात. परतीच्या प्रवासात दिल्ली पर्यटन महामंडळाच्या बस मंगळवार, गुरूवार, शनिवारी लाहोरहून सुटतात. पाकिस्तान पर्यटन महामंडळाच्या बस सोमवार, बुधवार व शुक्रवारी लाहोरहून सुटतात.
अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांत चपराक 
भारताने अनुच्छेद ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताविरोधात दबाव वाढवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. अमेरिका व संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानने भारताने घेतलेल्या निर्णयाविरोधात पाठिंबा मिळवण्याचे जे प्रयत्न केले त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने पाकिस्तानला जोरदार चपराक बसली आहे. 
पाकिस्तानने काश्मीरमधील सध्याच्या घडामोडींचा वापर करून सीमावर्ती भागात दहशतवादी कारवाया व घुसखोरी करू नये असा दम अमेरिकेने दिला आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला फार थोडा प्रतिसाद मिळाला आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा एकात्मिक भाग असून तो देशांचा अंतर्गत प्रश्न आहे असे भारताने म्हटले होते.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जगातील नेत्यांना भारताविरोधात कारवाई करण्याचे आवाहन करताना असे म्हटले होते की, जर अमेरिकेने मध्यस्थी केली नाही तर भारताबरोबरची परिस्थिती युद्धाच्या दिशेने जाईल. पाकिस्तानच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना देशोदेशीच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन भारताने घेतलेल्या निर्णयाची कल्पना दिली होती. पाकिस्तानला दहशतवादी कारवायांमुळे एफएटीएफ या आर्थिक कृती दलाकडून काळ्या यादीत टाकले जाण्याची शक्यता आहे. काहीही करा पण दहशतवादाचा वापर करू नका, असा कडक संदेश जागतिक नेत्यांनी यावेळी पाकिस्तानला दिला आहे. अफगाणिस्तानच्या तालिबाननेही त्यांच्याशी सुरू असलेली शांतता चर्चा काश्मीरच्या प्रश्नाशी जोडू नये असा इशारा दिला आहे.त्यामुळे पाकिस्तानला आणखी एक हादरा बसला आहे. अमेरिकेला अफगाणिस्तानातील युद्ध थांबवण्याची घाई आहे. अफगाणिस्तानातील शांततेचा मार्ग काश्मीरमधून जातो हा पाकिस्तानचा युक्तिवाद कुणीच मान्य करायला तयार नाही. अमेरिकेने काश्मीरमधील मानवी हक्क स्थितीबाबत चिंता व्यक्त केली असली तरी जम्मू-काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे.