नाईट वॉचमन!

    दिनांक :11-Aug-2019
नरेश माझा वर्गमित्र! लई-भारी हुशार गडी! पण कायम अस्थिर आणि चंचल. अखंड धावता जीव. मी त्याला ‘निवांतपण हरवलेला प्राणी’ असं नाव दिलं होतं. शाळा सुटल्यापासून आमची गाठभेट नाहीच, म्हणून शेवटी मी फेसबुकला विचारलं- ‘‘आपण यांना पाहिलंत का?’’ आणि हुडकला पठ्‌ठ्याला एकदाचा. व्हॉट्‌स नंबर घेतला. ऑडिओ, व्हिडिओे झाला. आता तसं खास काम काहीच उरलं नव्हतं. बस्स! समोरा-समोर बसून हातात हात गुंफून शिळोप्याच्या गप्पा लावायच्या होत्या ! पण प्रत्यक्ष भेटीचा योग जुळून येत नव्हता.
 
 
 
वर्षे येत होती, जात होती. दरम्यान नरू इकडेच बदलून आल्याचं कळलं. त्यानं एका अतिविशाल संकुलात सदनिका घेतली होती. एकदा फोन केला, तर म्हणला- ‘‘पोस्टिंग जवळच्या गावी आहे. अप-डाऊन असल्यानं पहाटे लवकर निघतो. उशीर होतो यायला’’ वगैरे. प्राणी घाईत होता. अधिक बोलणं झालं नाही. असंच फोनाफोनी करत एक वर्ष उलटून गेलं. पण भेट नाही ती नाहीच. तसं त्याचं घर जवळच होतं. म्हणून एकदा मुद्दाम प्रभाफेरीला त्याला अवचित गाठावं, या हेतूनं वाट वाकडी केली. कुणालाही गाठायची परफेक्ट वेळ म्हणजे पहाटेची नाहीतर भोजनमची !
 
सातवा मजला! बेल दाबली! बराच वेळ कुणी आलंच नाही. आता बेलचा आवाजही काहीसा त्रासिक वाटला. कुणीतरी आतून पाय घासत येण्याची चाहूल लागली. नंतर खिडकीचा पडदा सरकवून ‘‘कोण आहे?’’ असा अस्पष्ट ध्वनी उमटला.
‘‘मी नरूचा मित्र ! आहे का घरी ?’’
 
नरूच्या पिताश्रीनी दार उघडलं. एक शिडशिडीत बांध्याचे उंच-नीच म्हातारबुवा! निवृत्त उप-जिल्हाधिकारी! ढगळ सुती पायजामा. िंपगट खादीची बंडी, राखडी रंगाचा चष्मा. हातात जपमाळ. मला वर-खाली बघत ओळखीचं हसले. बसायला खूण केली.
 
‘‘नरेश सक्काळीच निघाला आज. शिफ्ट ड्युटी असते.’’
‘‘छान छान! रविवारी सुट्टी असेल की!’’
 
‘‘छे! रविवारी डबल-पे ड्युटी! फेस्टिवल हॉलिडेला तर ट्रिपल-पे ड्युटी. सीएल संपवायच्या मिषाने संचित-झोप, विकेंड-आऊिंटग, नाहीतर मार्केिंटग वगैरे आटोपायचं. आनंद आहे.’’ म्हातारबुवा पुन्हा माळ ओवू लागले.
‘‘वहिनी कुठाय ? पोरं दिसत नाहीत?’’
 
‘‘ती शिक्षिका आहे. शाळा दूर आहे. गावाबाहेर. तशी या नोकरीची गरज नाहीये, पण मग शिक्षणाचा काय उपयोग? पोरं जितू आणि जुई त्यांना बघितलंच नाही का? तो बघा फोटो लावलाय्‌. पण पाच वर्षांपूर्वीचा! आता ओळखू येणार नाही. जितू तर ताडमाड उंच झालाय्‌. दोघांचेही शाळेच्या आधी दोन ट्युशन्स आणि शाळा सुटल्यावर पुन्हा दोन ट्युशन्स- ऑल-बिझी फुल-टाईम!’’ आजोबांचं कौतुक ओसंडून वाहू लागलं होतं.
 
‘‘तुम्हाला करमत नसेल एकट्याला !’’ मी उगाच जखमेची खिपली काढली असं नंतर वाटत राहीलं!
‘‘आताशा सवय झालीय. सगळे अंतर्धान पावल्यावर मी हा असा सडा उरतो दिवसा जरा. झोपेशी जुगलबंदी होते. पण मग रात्री झोपेशी उभा दावा असतो. घराची रखवालदारी आपोआपच होते. नाईट-वॉचमन जसा चहा घेणार का ?’’
‘‘नको! असू देत, नंतर कधी!’’ म्हातारबुवा बोळकं हलवत रिलॅक्स हसले. ‘‘खरं सांगू! विचारण्याचा उपचार केला खरा. चहा वगैरे करणे जमत नाही रे मला! बस हे तेरा कोटी जपाचं अनुष्ठान येथे निर्वेध सुरू आहे. दोन कोटी झालेत, बरं का ?’’
पुन्हा तीन वर्षांनी असंच सहज पहाटे गेलो. म्हातारबुवा आरामखुर्चीत डुलत स्वागताला उपस्थित. ‘‘अरे ये ये! गुड न्यूज आहे! नरूचं प्रमोशन झालं. त्यानं कार घेतलीय्‌. येताना पार्किंगमध्ये नव्या मॉडेलची कार दिसली ना तीच ती. आता घरासोबत कारचे हप्ते आणि सुनबाई हेड-मास्तरीण झाली. जितू बारावी पास आणि जुई दहावी मेट्रिक प्रावीण्य-पास़! दोघेही पुण्याला ग्रॅज्युएशनसाठी रवाना. मी इथे आहे, अंशी वर्षाचा नाईट वॉचमन! पण शांत-निवांत! फार कुणी आपल्याकडे बघत नाही, हा म्हातारपणचा मोठ्ठा फायदा! त्यामुळेच तर पण चार कोटी जप उद्दिष्ट पुरं होतंय्‌ ! बाकी आनंद आहे.’’
 
पुन्हा तीन वर्षांनी एकदा पहाटे फिरकलो. म्हातारबुवा ‘जैसे-थे!’ फक्त उशाशी बामची शिशी आणि पारदर्शी बरणीत खारी-गोड बिस्किटे! ‘‘अरे ये ये, गुड न्यूज आहे तुझ्यासाठी! अरे नरूने अंबाझरी रोडवर मोक्याच्या जागी प्लॉट घेतलाय बरं का आणि हो! सुनबाई निवृत्त होणार म्हणाली पण काय आता मुख्याध्यापिका झालीय्‌, साहजिकच बेसिक-पे वाढणार तर त्याचा फायदा वाढीव पेन्शन होणार! असं सगळं साधं सोप्प गणित आहे! आणिक काय नाईट-वॉचमन तस्साच आहे अजूनही! नाऊ एटी-सेवन क्रॉस्ड! डे टाळी... बाकी जप-अनुष्ठान चढत्या भाजणीत!’’
 
नरुभाऊ फेसबुकवर लाईक करायचा. व्हॉट्‌स अॅपवर मेसेज करायचा. मी घरी येऊन गेलो म्हणताच फोनवर ‘‘सॉरी!’’ म्हणायचा. प्रत्यक्ष भेट होऊ न शकल्या बद्दल ऑनलाईन-दिलगिरी पण व्यक्त करायचा. पुन्हा अंदाजे अडीच वर्षांनी पहाटे म्हतारबुवांना भेटायला म्हणून गेलो. नरूशी भेट होण्याची आशा पार सोडून दिली होती. मला बघताच म्हातारबुवा उत्तेजित होत म्हणाले, ‘‘अरे ये ये, गुड न्यूज आहे! आता मी एकटा नाही बरं का! हा सोबती आणला आहे’’ असं म्हणताच एक जाडजूड, लंबा-चवडा, अक्राळ-विक्राळ जर्मन-शेफर्ड कुत्रा जीभ वेल्हाळत जवळ आला. आजोबांनी त्याला बळेच आत पिटाळला. ‘‘अरे गुड न्यूज म्हणजे दोन्ही नातवांना जॉब लागला. त्यांचे लव्ह-मेरेज झालं. मी इथूनच सुलग्न लावलं. जितू अमेरिकेत तर जुई जर्मनीला. तेथेच स्थायिक झालेत. आनंद आहे.
 
‘‘आता तुमचं सांगा, कसं सुरू आहे एकंदरित?’’
‘‘मला काय धाड भरलीय्‌. मस्त मजेत. दिवसभर झोपायचं. रात्रभर जागायचं, नाईट-वॉचमन! सगळेच रस्त्यावर धावणार मग घरी कुणी हवं की नको ? बाकी जप सुरू आहे. आनंद आहे!’’
 
पुन्हा दोन वर्षांनी पहाटे नरूच्या निवासस्थानाला सहज सदिच्छा भेट दिली. मला बघताच म्हातारबुवा अत्यानंदाने उसळून म्हणाले- ‘‘अरे, ये ये, गुड न्यूज अगेन डीअर, अरे तुझा नरू आजोबा झालाय्‌ आणि मी पणजोबा! हा अल्बम बघ. त्यात शिशूसोबत जितू जुईचेही बालपणीचे, किशोरवयीन, कुमारवयीन आणि तारुण्याचे सगळे फोटो क्रमवार होते. तुला छाकुल्याचे व्हिडीओ दाखवले असते पण ते सर्व सुनबाईच्या मोबाईलवर आहेत. आता पुढच्यावेळी रात्री साडे-दहा नंतर ये म्हणजे भेट होईल!’’ आजोबा खो खो हसत म्हणाले. मला वाटलं मी उगाचच वेड्यासारख्या चकरा मारतोय्‌.
 
‘‘अहो, हे नातू आणि पणतू प्रत्यक्ष कधी येणार आहेत तुम्हाला भेटायला ? जरा वाचन वगैरे तरी करत जा.’’ माझी मैत्री आता या म्हातरबुवांशीच अधिक होऊ लाग्गली होती.
 
‘‘छे! पुस्तक-वाचन, टीव्ही बघणं बंद केलंय्‌. डोळ्यांना ताण येतोय रे. फोनवर बोलत नाही. गाणी ऐकत नाही. कानांना झेपत नाही रे. काय म्हणालास नातवंडे ? ती येवोत, न-येवोत! त्यांना एव्हाना मराठी बोलताही येत नसेल. येऊन काय बोलणार डोमलं? तू ये पुन्हा असाच कधीतरी! बाकी आनंद आहे!’’
 
यापुढे तिथे जायचं नाही असं मनोमन ठरवलं. पण एकदा वेळ होता म्हणून तेथून जाताना पुन्हा बर्‍याच वर्षांनी गेलो. नव्वदीच्या घरातील आजोबा विमनस्क बसले होते. मला बघताच क्षीण स्वरात म्हणाले, ‘‘अरे ये ये, बॅड-न्यूज आहे रे! सुनबाईला वाढीव बेसिकची पेन्शन लागू झाली म्हणून किती आनंद झाला होता म्हणून सांगू, पण शाळेत बाईकने जाताना दुर्दैवी अपघात होऊन निधन झाले. नरूची फार धावपळ झाली. त्या दगदगीने हार्ट-फेल होऊन तोही सहा महिन्याने गेला. त्याहून दुःखद घटना म्हणजे जुई कुठल्याशा ब्ल्यू-व्हेल नामक आत्महत्या करू या! या खेळात आत्महत्या करून बसली. तिकडे जितू अमली पदार्थाच्या विळख्यात सापडून जीव गमावून बसला! प्रारब्धाने घटना घडतात का रे...सुख-साधने गोळा करता-करता सुख मिळवणं राहूनच जातं!’’
 
आजोबा यापुढे फार बोलू शकले नाही. त्यांना खोकल्याची विलक्षण ढास लागली होती. मी दिग्मूढ झालो होतो. आजोबांच्या पाठीवर हात ठेवून परत फिरलो. किमान आजोबांची जपाचं अनुष्ठान पूर्ण होण्याचं समाधान त्यांना याजान्मी मिळो, अशी मनोमन प्रार्थना करत होतो.
 
•मो. बा. देशपांडे
9850599307
(लेखक साहित्यिक आहेत.)
••