एक सच्चा मराठी माणूस!

    दिनांक :11-Aug-2019
मराठीचा अभिमान असायला मराठी म्हणूनच जन्मायला हवं का? एका प्रसंगातून हा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला तो असा. एक दुर्मिळ वेदान्ताचे पुस्तक, आऊट ऑफ िंप्रट झाले होते. माझी कॉपी खिळखिळी झाल्याने बाईंड करून घ्यायला हवी होती. बुक बाईंिंडग हा विरत चाललेला व्यवसाय आहे. मी पुण्याला अनेक ठिकाणी चौकशी केली. काही निष्पन्न निघाले नाही. नागपूरला पुस्तकांच्या एका दुकानदाराने लक्ष्मी बाईंडरचा पत्ता दिला. तिथे जाऊन मी पुस्तक बाईंिंडगला टाकले.
 
 
 
पुस्तक तयार होणार त्या दिवशी मी निघाले. नागपूरचे ऑटोरिक्षाचे शोभेचे मीटर, रिक्षावाल्याची उपकार केल्यासारखी वृत्ती पाहून मी वैतागले होते. रिक्षावाला 100 रुपये मागत होता. शेवटी 80 वर तयार झाला. तिथे पोहोचल्यावर गल्लीत रिक्षा जात नाही म्हणून त्याने मला रस्त्यावर सोडलं. मी 100 ची नोट दिली तेव्हा चिल्लर नाही म्हणत तो रिक्षावाला निघून गेला. 20 रुपयांपेक्षा, आपल्याला फसवले म्हणून मला वाईट वाटलं. मनात चरफडत मी बाईंडरकडे पोहोचले. बहुतेक पुस्तक झालंच नसणार. हा उद्या या म्हणणार, झालं तरी हा जास्तीचे पैसे मागणार, अशा नकारघंटा मनात वाजू लागल्या. लक्ष्मी बाईंडर म्हणजे झेंडा चौकातून पुढे गेलं की, एका अरुंद गल्लीत एका छोट्याशा घरात हा उद्योग आहे. एका छोट्या खोलीत एक मशीन, पुस्तकांचे ढीग आणि त्यात बुडालेले काम करणारे एक गृहस्थ बसले होते. त्यांनी मान वर न करताच आतल्या दाराकडे बोट दाखवले. ते ऑफिस!
 
मी ऑफिस नामक दुसर्‍या छोट्या खोलीत गेले. तिथेही पुस्तकांचे ढीग, एम्बॉिंसगचे मशीन, यातून छोटी पायवाट. त्या पसार्‍यात एका छोट्या डेस्कपुढे एक वयस्क गृहस्थ बसले होते- ए. आर. वेंकटराव मुदलियार, या दुकानाचे मालक! मी पुस्तकाबद्दल विचारण्याआधीच त्यांनी पुस्तक काढलं. हे घ्या. कव्हर पाहूनच मी खुश झाले. तुमचे कव्हर तसेच ठेवून मजबूत केले आहे, ते म्हणाले. नंतर त्यातले अनेक बारकावे दाखवून किती काळजीपूर्वक काम केलं आहे, हे त्यांनी पटवून दिलं. आजोबांनी अतिशय जीव ओतून काम केलं होतं. काम बघून मजुरी भरपूर होईल, असं वाटायला लागलं. मी मनाशीच म्हटलं, किती पैसे घेणार हे आधी विचारायला हवं होतं. पुस्तक दुर्मिळ असल्याने कितीही पैसे देण्याची माझी तयारी होती, पण कितीहीची लांबी किती वाढणार, याची काळजी वाटू लागली.
 
किती झाले पैसे? मी श्वास रोखून विचारलं. रिक्षावाल्याचा अनुभव ताजाच होता.
20 रुपये. ते म्हणाले. किती? मी पुन्हा आश्चर्याने विचारलं.
20 रुपये. ते पुन्हा शांतपणे म्हणाले.
इतके कमी कसे? मी न राहवून विचारलं.
धार्मिक पुस्तकांचे आम्ही कमी घेतो. हे तर दुर्मिळ पुस्तक. तेव्हढीच सरस्वतीची सेवा. ते नम्रपणे म्हणाले. मी बघतच राहिले. आणखी 20 ची नोट पुढे करत मी म्हटलं, तुमच्या या सेवेबद्दल घ्या.
छे! त्यात काय. जेव्हढे झाले तेव्हढे द्या. जास्तीचे काय करायचे?
बापरे! आजोबा, अशी तत्त्वाची माणसं आजकाल दिसत नाही. मी म्हटलं. मी आजकालचा नाही. 15 फेब्रुवारीला मला 80 वर्षं होतील. मी तर उडालेच.
 
अस्खलित मराठी बोलणारे मुदलियार आजोबा तामीळ घराण्यातले असले, तरी त्यांचं पूर्ण आयुष्य नागपुरात गेलं होतं. 1925 साली त्यांच्या वडिलांनी ठरवलं होतं की, आपण ज्या प्रांतात राहतो तीच मुलांची मातृभाषा समजायची. म्हणून सरस्वती विद्यालयासारख्या तामीळ शाळेत न घालता त्यांनी मुलांना मराठी शाळेत घातलं. मुदलियार आजोबांनी मराठीत खूप वाचन केलं आहे. भाषा कोणतीही असली तरी शेवटी सेवा सरस्वतीचीच आहे नं? ज्ञानाला भाषेच्या मर्यादा नसतात. ते म्हणतात.
लहानपणी मुदलियारांच्या घरची परिस्थिती अगदी हलाखीची होती. दर महिन्यात आईचे दागिने गहाण ठेवून वडील महिन्याचे शेवटचे दिवस भागवायचे. 2 भाऊ, 2 बहिणी असे कुटुंब. कष्टमय जीवन! मामांचा बाईंिंडगचा व्यवसाय होता. त्यांच्याकडे शिकायचं ठरवलं. मामा खूप कडक होते, पण शिस्तीचे. मुदलियारांना नीतिमूल्यं त्यांनीच शिकवली.
 
सचोटीने धंदा करायला मामांनी शिकवला. पण, शिकवताना भरपूर मारायचेही! एकदा तर इतके बदडले की, रागावून मुदलियार जीव द्यायला अंबाझरी तलावावर गेले. तेथे सायकल ठेवली, पाण्यात उतरले. पाणी खूपच गार होते. एक दोन तासांनी उतरावं म्हणून मागे फिरून एका झाडाखाली बसले. तिथे विचार करता करता झोप लागली. मनात अनंत काणेकरांची वाक्यं घोळू लागली, दुसर्‍यासाठी जगलास तर जगला, स्वत:साठी जगलास तर मेलास! त्यांच्या मनात आलं, म्हणजे आत्ताचं आयुष्य असून नसल्यासारखे आहे. खूप विचार केला. आत्महत्येने काही हाती लागणार नव्हते. स्वत:चा वेडेपणा लक्षात येऊन आत्महत्येचा विचार टाकून दिला. माझ्या मनात आलं, ज्या व्यक्तीला आत्महत्या करताना मराठी साहित्यातले वाक्यं आठवतात तिच्याइतकं मराठी कोणीच नाही.
 
पुढे स्वत:चा व्यवसाय सुरू केला. अंथरूण पाहून पाय पसरायचे हे तत्त्व. खाजगी आयुष्यात कधी लक्ष्मणरेषा ओलांडली नाही. तामीळ लोकांमध्ये मामेघरी सून करून देतात, पण त्यामुळे पुढच्या पिढीत शारीरिक प्रॉब्लेम येतात, असं कुठेतरी त्यांनी वाचलं होतं म्हणून नात्याबाहेरच्या मुलीशी लग्न करायचं ठरवलं. मुदलियार आजोबा सांगत होते, मी लक्ष्मीशी लग्न केलं आणि माझं भाग्य उजळलं. तिच्यामुळेच मी हा व्यवसाय यशस्वी केला. तिने उत्तम साथ दिली, ती सतत देवाधर्माचे करीत असे. तिच्या पुण्याईनेच शून्यातून सुरुवात करून आज स्वत:चं घर आहे, हा धंदा आहे. संसारातही 2 मुले व 1 मुलगी- सर्व आपापल्या जागी आनंदात आहेत. मोठा मुलगा व्यवसायात मदत करतो. आजोबा साठी उलटेपर्यंत पूर्णवेळ काम करीत असत. आता सकाळी 8.30 ते 1.30 पर्यंत काम करतात. पहाटे 3 ला उठणे, 1 तास चालणे, अर्धा तास व्यायाम. नियमित मोजका आहार, यामुळे त्यांची तब्येत उत्तम आहे. आपण मराठी दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम करतो, मराठीचा अभिमान दाखवणारे पोस्ट फॉरवर्ड करतो आणि नंतर पुढच्या वर्षी लवकर या म्हणावं तसं पुढच्या वर्षीपर्यंत सर्वसामान्यांना त्याची आठवणही येत नाही या पार्श्वभूमीवर मुदलियार आजोबांबद्दलचा आदर दुणावतो. अशा सच्चा मराठी लोकांचा मराठी दिनाला सत्कार करायला पाहिजे, असं मला वाटतं.
नीलिमा कुलकर्णी
रेस्टन, अमेरिका