कावडीया युवकाचा नदीत बुडून मृत्यू

    दिनांक :11-Aug-2019
गोंदिया,
महादेवाच्या पिंडीला जलाभिषेक करण्यासाठी पाणी घ्यायला वाघ नदीवर गेलेल्या कावडीया युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार, ११ ऑगस्ट रोजी सकाळी १० च्या सुमारास घडली. आकाश आसाराम मरसकोल्हे असे मृत युवकाचे नाव आहे.
शहरातील न्यू लक्ष्मीनगर येथील २५ युवक शिव पिंडीला जलाभिषेक करण्यासाठी वाघ नदीचे पाणी आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, आकाशला नदीत आंघोळ करण्याचा मोह झाला व तो पाण्यात उतरला. परंतु, पाण्याच्या खोलीचा व प्रवाहाच्या वेगाचा अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहत गेला व त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पथक, रावणवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक मच्छिमाराच्या सहकार्याने आकाशच्या मृतदेहाचा शोधकार्याला प्रारंभ केला. वृत्त लिहेपर्यंत आकाशचा मृतदेह मिळाला नव्हता. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, दरवर्षी शहरातील शिवभक्त श्रावण महिन्यात शिवqपडीला जलाभिषेक करण्यासाठी वाघ नदीचे पाणी आणण्यासाठी जत्थ्याने कावड यात्रा काढतात. या दिवसात नदीला मोठा प्रवाह राहत असल्याने प्रशासनातर्फे आवश्यक सुचनाही दिल्या जातात. परंतु, प्रशासनाकडूनच सुरक्षेच्या व्यवस्थेकडे दुर्लक्ष होत असल्याचे आजच्या घटनेवरुन दिसून येते.