शिवाजीराजांचा आपद्धर्म!

    दिनांक :11-Aug-2019
संपूर्ण हिंदुस्थानवर आपली सत्ता असावी, अशी मोगलांची सुप्त आकांक्षा होती. अकबरापासूनच्या सर्व सुलतानांनी त्यासाठी आपली बरीच शक्ती पणालाही लावली होती. औरंगजेब तर दख्खनचा सुभेदार असतानाच हे स्वप्न पूर्ण करू इच्छित होता. पण पुढे दिल्लीचा सत्तासंघर्ष आणि त्यात स्थिरस्थावर व्हायला लागलेला वेळ, यामुळे त्याचे दक्षिणेकडे दुर्लक्ष झाले. याचाच फायदा घेत शिवाजीराजांनी झपाट्याने आपले पाय पसरायला सुरुवात केली. शिवाजी जर दख्खनमध्ये बलवत्तर झाला अन्‌ त्याने आदिलशाह व कुत्बशाहशी संधान बांधले, तर आवळलेली ही मूठ फोडायला आपल्याला बरीच शक्ती खर्च करावी लागेल, हे औरंगजेब जाणून होता. त्यामुळे शिवाजीचे समूळ उच्चाटन त्याच्यासाठी अत्यावश्यक होते. पण इथे तर मिर्झाराजा शिवाजीला प्राणसंरक्षणाचे वचन देऊन बसले होते. तहामध्ये सर्व प्रकारची अनुकूलता त्यांच्याकडे असताना त्यांनी शिवाजीला पूर्ण नामोहरम होऊ दिले नव्हते. अन्‌ इतकेच नव्हे, तर छावणीमध्ये नि:शस्त्र आलेल्या शिवाजीला त्यांनी जिवंत परत जाऊ दिले होते. त्यामुळे मिर्झाराजांच्या हातून हे राजकारण सुटू पाहतेय्‌ की काय, अशी शंका औरंगजेबाला यायला लागली होती. तिकडे आदिलशाही व कुत्बशाही यांची मोगलांच्या विशाल अन्‌ बलाढ्य साम्राज्याविरुद्ध उभी राहण्याची छाती नव्हती. त्यांनाही शिवाजी नावाचे संरक्षक कवच अत्यावश्यक वाटत होते. म्हणून त्यांनी मोगलांपुढे शिवाजीला संपविण्याचा कितीही कांगावा केला, तरी आतून शिवाजीला शक्यतोवर सारी मदत करण्याकडेच त्यांचा कल दिसून येतो. (स्वतः शिवाजीराजांनाही दक्षिणेतल्या सत्ता एकत्र असाव्या, असे वाटत होते का, हे सध्या लक्षात येत नसले, तरी भविष्यातील त्यांची राजकारणे याचे सुतोवाच करतात.)
 
 
 
शिवाजीराजे आणि मिर्झाराजा जयिंसह यांच्यामध्ये पुरंदरचा ऐतिहासिक तह झाला. त्या तहान्वये राजांनी काही किल्ले मोगलांना दिले आणि आता या तहाची निश्चिती करणारे औरंगजेब बादशहाचे शाही फर्मान येण्याची सगळे वाट पाहत होते. अपेक्षेप्रमाणे ते पंजाचे फर्मान आले. पंजाचे फर्मान याचा अर्थ बादशाहने आपला उजवा हात उगाळलेल्या चंदनामध्ये बुडवायचा व त्याचा ठसा शाही फर्मानावर उमटवायचा (एक प्रकारचे लेटर हेड!) अशा प्रकारच्या फर्मानाला अत्यंत दुर्मिळ मानले जात असे. हे फर्मान स्वीकारण्याचीही एक विशिष्ट पद्धत होती. ज्याच्या नावे हे फर्मान आलेले आहे, त्याला तीन ते चार कोस अनवाणी पावलांनी पायी जावे लागत असे. गुढघ्यावर बसून हे फर्मान स्वीकारून आपल्या शिरावर धारण करावे लागे. फर्मान स्वीकारण्याच्या जागी मोठा मंडप उभारण्यात येत असे. याला ‘फर्मानवाडी’ म्हणत. तेथे सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जात असे. त्यानंतर तसेच अनवाणी चालत छावणीमध्ये आल्यावर सामूहिक पद्धतीने फर्मानाचे वाचन होत असे. या सगळ्या पद्धती स्वतः मिर्झाराजांनीच शिवाजीराजांना सांगितल्याची नोंद आढळते. काळाचीही सीमा भेदून जाणारी ज्यांची दूरदृष्टी स्वतंत्र, स्वयंभू, सार्वभौम स्वराज्याची विशाल स्वप्ने बघत होती, नव्हे नव्हे घडवित होती. त्या शिवाजीराजांसाठी हे गुलामीचे सोपस्कार किती कडू ठरले असतील. पण राजांनी तो कटू आवंढा गिळला.
 
इकडे अदिलशाहीने मोगलांना थकीत खंडणी देण्याचे मंजूर केले, पण मिर्झाराजे त्यांच्यावर आक्रमणाची तयारी करू लागले. याचे कारण उघड होते की मोगलांना आता खंडणीमध्ये रस नव्हता, तर त्यांना अखिल हिंदुस्थानचे राजकारण आपल्या हातात खेळवायचे होते. त्यामुळे अदिलशाहीवर मोगली आक्रमणाचे ढग जमू लागले. 22 जमादिलावर (मुसलमानी कालगणना) म्हणजेच 20 नोव्हेंबरला 1665 ला मिर्झाराजांनी अदिलशाहीविरुद्ध उघड उघड कूच केले. तहामध्ये मंजूर केल्याप्रमाणे आता शिवाजीराजांना मोगलांच्या मदतीला यावे लागले. सात हजार सेना व प्रतिशिवाजी नेतोजी पालकरांना घेऊन राजे मिर्झाराजांना सामील झाले. आणि आता मिर्झाराजे, शिवाजीराजे, नेतोजी पालकर, दिलेरखान असे अतिरथी, महारथी विजापूराकडे दौडत सुटले. आघाडी दिलेरखानाकडे होती, मागे स्वतः मिर्झाराजे तर त्यांच्या डाव्या अंगाला शिवाजीराजे होते. जयिंसहाच्या सूचनेवरून शिवाजीराजांना पुढे करण्यात आले. महाराजांनी मुसंडी मारली आणि एकाच झटक्यात फलटण, ताथवडे, खटाव, मंगळवेढे इत्यादी मुलुख िंजकून घेतला. जिंकला म्हणजे काय, शिवाजी येतोय्‌ हे ऐकल्याबरोबर तिथले आदिलशाही लोक केवळ दहशतीने किल्ले सोडून पळत सुटले. असा होता शिवाजीराजांचा दरारा! महाराजांचा हा वादळी पराक्रम पाहून मिर्झाराजांना संपूर्ण भारतावर मोगली छत्र दिसू लागले, किंबहुना तो दिवस आता दूर नाही, हा आभास होऊ लागला. अदिलशाहीपर्यंत या वार्ता पोहोचल्या, चार मातब्बर सरदार एकत्र आपल्यावर तुटून पडणार, हे निश्चित झाले होते. आदिलशाही शेवटच्या घटक मोजत होती. पण अचानक पारडे फिरले, आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी अस्मितेसाठी लढण्याचे ठरवून कंबर कसली. सर्व आदिलशाही सरदार एकत्र आले, विजापूरची सामरिक शक्ती वाढविण्यासाठी तीसहजार सैनिकांची भरती करण्यात आली. लांडा कसाब, मुलुखमैदान, कडक बिजली अशा आग ओकणार्‍या प्रसिद्ध आदिलशाही तोफा सज्ज झाल्या. विजापूरकरांनी आसपासचा संपूर्ण प्रदेश उद्ध्वस्त करून टाकला, जलाशये अन्‌ विहिरी विषमिश्रित करून टाकल्या की जेणेकरून मोगली सेनेला सातत्याने अडचणी निर्माण होतील.
 
अशातच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात युद्धाला तोंड फुटले, प्रचंड रणधुमाळी माजली. आदिलशाही सैन्याची पहिलीच धडक बसली, ती शिवाजीराजांच्या सैन्याला! आणि अहो आश्चर्य! शिवाजीराजांची फळी फुटली, राजांचा दारुण पराभव झाला आणि ते पळत सुटले. इकडे मिर्झाराजांवरही झडप पडली आणि त्यांचाही पराभव झाला. आदिलशाहीने पहिलाच तडाखा असा जबरदस्त दिला की सारेच हादरले, सर्वांना हे अकल्पित होते. पुरंदर विजयाचे श्रेय न मिळाल्यामुळे डिवचलेला दिलेरखान मिर्झाराज्यांच्या शिवाजीकडे झुकत्या. मापाने जळफळत होता. त्याला हा पराभव स्वाभाविक न वाटता शिवाजीने हेतुपुरस्सर घडवून आल्यासारखा वाटत होता. मोगली सेनेचा झालेला अपमान शिवाजीमुळेच झाल्याचा अन्‌ हा शिवाजी आतून विजापूरकरांना मिळाला असल्याचा ठपका त्याने ठेवला. आणि आता या शिवाजीचाच काटा काढायचा, या हेतूने त्याने जयिंसहामागे तकादा लावला. जयिंसहाचे सगळे राजकारणच फसण्याची वेळ येऊन ठेपली. कदाचित राजांनाही याची कल्पना आलेलीच असावी, म्हणून ते मिर्झाराजांना म्हणालेत की विजापूरची आघाडी कठीण जात असतांना मी पन्हाळ्यावर तुटून पडतो. जेणेकरून तिथे तरी विजय मिळेल आणि तिथे उडालेल्या धुमाकुळामुळे आदिलशाहीला आपली एक फौज तिकडे पाठवावी लागेल. मिर्झाराजांना विचार पसंत पडला कारण यामुळे पन्हाळगड मिळण्याचा संभव होता व शिवाजीराजांचे प्राणही वाचणार होते. विजापूर आघाडीवर युद्ध सुरू असल्याने पन्हाळा बेसावध असणार असे मानून राजे निघाले. नेतोजी पालकर मागाहून येऊन राजांना सामील होणार होते. पण राजांचा अंदाज चुकला, ऐन मध्यरात्रीही पन्हाळा सावध होता, महाराजांवरच प्रतिहल्ला झाला अन्‌ शेकडो मावळे कापले गेले. पुन्हा एक पराभव, पुन्हा एक पाठलाग, पुन्हा एकदा विशाळगड! या वेळेलाही राजे विशाळगडाच्या आश्रयाला सुखरूप पोहोचले. नेतोजी वेळेवर आलेच नाही, ते थेट पन्हाळ्यालाच आले. अन्‌ महाराजांनी शिस्तभंगाचा ठपका ठेवत सेनापतींना स्वराज्यातून हाकलून दिले. आणि काय सांगावे, स्वराज्याचे सरनौबत राजांना सोडून आदिलशाहीला सामील झाले. मिर्झाराजे जयिंसह तर पूर्णपणे हादरले, कारण त्यांना कळून चुकले की दख्खनमध्ये जराही चूक झाली तर शिवाजीपण अदिलशाहीकडे जाईल अन्‌ मग मोगलांची काही खैर नाही. सगळ्या राजकारणानेच अकल्पित वळण घेतले होते.
 
इथे दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात. एक म्हणजे- शिवाजीराजांचे पराभव, नेतोजी पालकरांचे अचानक अदिलशाहीमध्ये जाणे, विजापूरची अचानक ताकद वाढणे यात काही राजकारण होते का? याची चर्चा आपण पुढील लेखात करू या. पण दुसरी गोष्ट म्हणजे- सुलतानी सत्तांचे समूळ उच्चाटन करण्याची शपथ घेतलेले आणि आजपर्यंत स्वतंत्र स्वराज्याचा ध्यास घेतलेले शिवाजीराजे असे अचानक मोगलांच्या वतीने का लढले? राजांना प्रतिज्ञेचा विसर तर पडला नव्हता ना? अजिबात नाही, याला आपल्याकडे ‘आपद्धर्म’ म्हटल्या गेले आहे. आपद्धर्म म्हणजे संकटकाळी अवलंबन करण्याचा धर्म, हा नियमित धर्म नाही. महाभारताच्या शांतिपर्वामध्ये आपद्धर्म नावानेच एक उपपर्वसुद्धा आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये ‘उषस्तीची कथा’ म्हणून एक प्रसंग येतो. उषस्ती नावाच्या एका माणसाच्या गावात प्रचंड दुष्काळ पडतो, लोक मारायला लागतात. भुकेला उषस्ती अन्नाच्या शोधात भटकताना त्याला एक मनुष्य पानावर काही चाटताना दिसतो. उषस्ती म्हणतो- ‘‘मी उपाशी आहे मला पण काही दे!’’ तर माणूस म्हणतो- ‘‘मी उडदाची डाळ खातोय्‌ पण ती आता उष्टी झाली आहे.’’ उषस्ती म्हणतो- ‘‘मला चालेल!’’ म्हणून तो काही दाणे खातो. तो मनुष्य आपल्याजवळचे पाणी पितो व उषस्तीला देतो. यावर उषस्ती म्हणतो- की, ‘‘मला नको ते पाणी कारण ते उष्टे आहे.’’ मनुष्य आश्चर्याने विचारतो- की, ‘‘तुला उष्टी डाळ कशी चालली?’’ उषस्ती म्हणतो- की, ‘‘मी डाळ नसती खाल्ली तर मरून गेलो असतो, डाळ खाणे माझा आपद्धर्म होता. आता माझ्यात त्राण आलेत, मी एखादा झरा शोधून पाणी पितो, आपद्धर्माला मला नियमित धर्म करायचा नाही.’’ मोगलांकडून लढणे हा शिवाजीराजांसाठी आपद्धर्म होता. त्याही आधी बादशहाचे फर्मान येण्याअगोदर महाराजांना औरंगजेबाला देण्यासाठी शरणागतीचे पत्र लिहावे लागलेच होते. उदयराज मुन्शीकरवी राजांनी हे पत्र लिहून घेतले होते. त्याचा मराठी तर्जुमा असा होता की- ‘मी बादशाही किल्ले अन्‌ मुलुख घेऊन चूक केली आहे. मी शरण यायला तयार आहे, मी आपला हुकूम पाळेन, बंडाळी करणार नाही, इत्यादी.’ ज्या लोकांना सावरकर काय हे कधी कळलेच नाही त्यांना सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली, हा राजकारणाचा मुद्दा वाटतो. या लोकांनी श्रीकृष्ण, चाणक्य, शिवाजी वाचावे म्हणजे यांच्या बुद्धिमत्तेमध्ये जरा भर पडेल. माफी मागितली असेल तरी तो सावरकरांचा आपद्धर्मच होता. आपल्यालाही आपल्या आयुष्यात अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागतेच. अनेकवेळा आपला नाईलाज होतो, नियती दुसरा कुठलाच मार्ग आपल्यापुढे ठेवत नाही. अशावेळी नाईलाजाने का होईना, आयुष्य जगावे लागते. चोर सिग्नल तोडून पळत असेल तर कायद्याचे पुजारी म्हटल्या जाणार्‍या पोलिसाला सिग्नल तोडून चोराला पकडावेच लागते. अिंहसक म्हटल्या जाणार्‍या सामान्य माणसाला स्वतःच्या घरात चोर शिरले तर स्वसंरक्षणासाठी िंहसा करावीच लागते. घरात खायला एकच भाकर असेल तर ‘‘माझे जेवण झालेले आहे बाळांनो! तुम्ही भाकरतुकडा खाऊन घ्या’’ असे आईला म्हणावे लागते. या अन्‌ अशा सर्व प्रसंगांमध्ये सिग्नल तोडणे, हिंसा करणे, खोटे बोलणे हे लौकिकामध्ये जरी चूक असले तरी हा आपद्धर्म असतो. बस काळजी ही घ्यावी तो आपला स्थायिभाव म्हणजे नियमित धर्म होऊ नये. मोगलांकडून लढणे हा प्राप्त परिस्थितीमध्ये जरी आपद्धर्म असला तरी त्यांच्या सत्तांचे पाश तोडून त्यांच्या सिंहासनाच्या चिरफाकळ्या उडविणे हाच शिवाजीराजांचा नियमित धर्म होता. आपद्धर्माचे पाप लागत नसते पण चुकीच्या नियमितधर्माचे पाप मात्र नक्कीच लागते. याचे भान आपण सतत ठेवावे. पण एक लक्षात ठेवावे, आपद्धर्म म्हणून आपण जे करतो ते माणसाला सहसा झोपू देत नाही. कारण ते आपले नित्यकर्म नसते. अशा वेळी आपल्याला स्वतःला समजाविता आले पाहिजे की जे करावे लागले तो नाईलाज होता. त्याच्यामुळे पुन्हा निराशा येता कामा नये. असो!
 
शिवाजीराजांना दख्खनपासून, पर्यायाने आदिलशाहीपासून दूर ठेवण्याची शक्कल शोधून काढण्यात मिर्झाराजे रात्रंदिवस आकंठ बुडाले होते. आणि एक जबरदस्त कल्पना त्यांच्या अचाट बुद्धिमत्तेतून बाहेर पडली आणि ती म्हणजे शिवाजी औरंगजेब भेट व तीसुद्धा दिल्ली खालोखालच्या एका महत्त्वाच्या शहरामध्ये ज्याचे नाव होते- मुस्तकिर-उल-खिलाफत-अकबराबाद म्हणजेच आग्रा!
•डॉ. सुमंत दत्ता टेकाडे
9923839490 
(लेखक कार्पोरेट आणि
व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षक आहेत.)
••