एका मलिकेवर बोलू काही...

    दिनांक :11-Aug-2019
आता मलिकांवर काय बोलायचं असतं? म्हणजे बोलण्यासारखं काय असतं? भावनांचं पार लोणचं घातलेलं असतं. पुन्हा त्याला मेलोड्रामाची फोडणी दिली जाते दर एपिसोड. एखादा प्रसंग कितीही ताणला जातो आणि मग कधी तटकन्‌ तोडून लीप घेतला जातो... डोकं गरगरायलाच लागतं मालिकांमुळे. धार्मिक मालिका म्हटलं की, फिरूनफारून रामायण िंकवा महाभारतच दाखविलं जातं... एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीवरची मालिका असेल, तर त्यात त्या माणसाचे मोठेपण गडद करण्यासाठी मेलोड्रामा केला जातो िंकवा मग ती मालिका डॉक्युमेंट्री वाटते... स्टार प्रवाहवरच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत ते नीट सांभाळले जात आहे. या मालिकेची डॉक्युमेंट्री अद्याप तरी झालेली नाही िंकवा मग मेलोड्रामा होण्याची शक्यता असलेल्या प्रसंगातही तो तोल नीट सांभाळण्यात आला आहे. अगदी छोटा भिवा दहावी पास होतो, हा प्रसंग डोळ्यांतून पाणी काढतो; पण डोळ्यांतून निघणारं पाणी अदबेनं कडांपाशी थांबून राहावं याची दक्षता लेखक, दिग्दर्शकांनी घेतली आहे.
 

 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर या आधी चित्रपट येऊन गेला आहे. महानाट्य येऊन गेले आहे. मात्र, एका चित्रपटात मावेल असे हे विषयच नाहीत. तसे चरित्रही नाही. बाबासाहेब आंबेडकर ही व्यक्ती नव्हती, ती समष्टी होती आणि तो एक विचार होता. दीर्घ वंचनेनंतर एका समाजाच्या उत्थानाचा निसर्गालाचा सुचलेला तो एक विचार होता... मग आता हा विचार पडद्यावर कसा दाखविणार? नितीन वैद्य हे तसे व्यावसायिक निर्माता आहेत. या आधी त्यांनी मराठी चित्रपट, मालिकाही केल्या आहेत. सध्या िंहदीत त्यांची ‘साईबाबा’ ही मालिका सुरू आहे. त्यामुळे त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेच्या रूपात मांडावासा वाटणे हे थोडे ‘थॉटफुल’ वाटले. त्यांच्याशी बोलताना जाणवले की, ते या मालिकेकडे व्यावसायिक व्हेंचर म्हणून नाही बघत. बाबासाहेबांच्या आयुष्याकडे ते यथार्थ जाणिवेने बघतात. त्यांचे बालपण, चवदार तळे, काळाराम मंदिराचा लढा आणि दीक्षा... असा मोठा प्रवास आहे आणि बाबासाहेब हे कृतिशूर विचारवंत होते. नायक वाटावे असा प्रसंग घडवितानाही त्यामागे एक मोठा विचार होता. आजच्या काळाच्या भाषेत सांगायचे तर केवळ ‘सनसनी पैदा’ करण्याची ती कृती नव्हती... वैद्य म्हणाले की, ‘मेिंकग ऑफ महामानव’ हा प्रवास मांडायचा होता.
 
 
स्टार प्रवाहचे कंटेंट हेड सतीश राजवाडे यांनी ही कल्पना उचलून धरली. राजवाडे एक स्वयंसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी आतावर जे विषय चित्रपटांत मांडले तेही हटके होते आणि तरीही व्यावसायिक कोंदणात त्यांनी ते नीट बसविले. तसे करताना त्यांनी विषयाची आणि स्वत:चीदेखील घुसमट होऊ दिली नाही... दशमी क्रिएशनचे वैद्य हे पत्रकारितेतून या व्यवसायात आले असल्याने त्यांच्याही जाणिवा वेगळ्या आहेत. हे दोघे एकत्र आले आणि मग टीआरपीच्या मागे न लागता नेमक्या आणि नेटक्या पद्धतीने बाबासाहेब नावाच्या महामानवाची गोष्ट छोट्या पडद्यावर मांडण्याचा हा सिलसिला सुरू झाला.
 
 
200 भागांत ही कहाणी मांडायची. त्यात वाहावत जायचे नाही. पाणी टाकून कथानक पातळ करायचे नाही. फारच फार सवादोनशे भाग झाले तर, तर तिथवर ठीक... ही या दोघांचीही भूमिका आहे. जे घडलंय्‌ ते गाळायचं नाही आणि जे नाहीच घडलं ते घुसवायचं नाही, ही भूमिका आहे. बाबासाहेबांचे सहकारी चांगदेव भवानराव खैरमाडे यांनी लिहिलेले बारा खंड आणि प्रा. हरी नरके यांच्या सात कादंबर्‍यांची, ही मालिका मांडताना मदत झाली. ललित अंगानेच ही कहाणी मांडायची आहे आणि त्यात सत्याचा विपर्यास होऊ नये, संदर्भ चुकू नयेत; पण त्यांचा संकोचही होऊ नये, याची काळजी आम्ही घेतो आहोत, असे सतीश राजवाडे म्हणाले.
 
 
आता ललित अंगाने एखादी व्यक्तिरेखा मांडताना सत्याचे सौंदर्यीकरण करता येते, नव्हे, ते करावेच लागते. मात्र, हे स्वातंत्र्य किती घ्यायचे, हा प्रश्न असतो. आता बाबासाहेबांच्या आत्याचे कॅरेक्टर या मालिकेत उठावदार पद्धतीने आले आहे. तसा या पात्राचा उल्लेख त्यांच्या चरित्रांमध्ये फारसा नाही, मात्र मालिकेत भावना नीट पोहोचविण्यासाठी हे पात्र खूप जवळचे वाटते.
एक वेगळा सामाजिक लढा या निमित्ताने छोट्या पडद्यावर जागविला जातो आहे. आतावरचे ठीक आहे. आता भिवा मोठा होतो आहे. त्याचा भीमराव होण्याकडे प्रवास सुरू झाला आहे. मात्र, त्यानंतर बाबासाहेब हा एक विचार म्हणूनच प्रकट होत राहतो. म्हणजे भगवान कृष्णाच्या बाललीला आणि नंतर गीता सांगणारा कृष्ण हा दृश्य माध्यमात मांडताना गीतेचा विचार दृश्यात्मक पातळीवर कसा आणायचा, हा प्रश्न असतोच. तसेच आता बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीची वाटचाल दाखविताना त्यामागचे विचार कसे प्रकट करणार? मग बाबासाहेबांची भाषणेच दाखविली तर ते रटाळ होण्याची शक्यता आहे. आता दोन कोटीच्या वर प्रेक्षकवर्ग या मालिकेला लाभला आहे. छोटा भिवा आता शाळकरी मुलांना वाचनाची गोडी लावतो आहे. मालिकेतल्या भिवानं नेपोलियनचे पुस्तक मिळवून वाचले, हे पाहून अनेक मुलांनी तसे, त्यांना हवी ती पुस्तके मिळविली िंकवा तसा प्रयत्न केला, मागणी केली पुस्तकांची, अशा प्रतिक्रिया उमटल्यात... हे या मालिकेचे यश आहे, असे वैद्य म्हणाले.
या मालिकेमुळे वाचन, चर्चा, िंचतन आणि प्रबोधन होतंय्‌, असं एक वातावरण तयार होतंय्‌. शक्तिमान पाहून बिल्डिंगवरून उडी मारून मुलं मरण्यापेक्षा, बाबासाहेबांची मालिका पाहून त्यांनी पुस्तकं वाचायला सुरुवात केली, ही छान सुरुवात आहे. ‘वाचाल तर वाचाल,’ हे छोटा भिवा आमच्या घरातल्या ‘छोट्या भीम’ला सांगतो आहे. टेलिव्हिजन माध्यमातला हा सकारात्मक बदल आहे.
 
 
मालिकेतले संवादही खूप छान लिहिले आहेत. आत्याचे पात्र भिवावर संस्कार करणारे. ती दळून झाल्यावर जाते साफ करत असते. छोटा भिवा तिला विचारतो, ‘‘काय करते आहेस?’’ तर ती म्हणते, ‘‘जात्याचे अश्रू पुसती आहे..!’’
 
 
वर्तमान सामाजिक वास्तव हे पुन्हा एकदा आरक्षणाच्या भोवती फिरू लागले आहे. येते दशक हे आरक्षण हाच मुद्दा सामाजिक ढवळणीचा असणार आहे आणि आरक्षण म्हटलं की, बाबासाहेबांवर चर्चा पोहोचतेच. अशा वेळी ही मालिका तारुण्यात येते आहे. नव भारताची पायाभरणी करणारा हा महामानव सकल मानवांचा माणूस म्हणून विचार करणारा होता. जात आणि धर्म या आधारावर कुणालाच समाजात आणि कायद्याने विशेषाधिकार नसावा, यासाठी त्यांचा लढा होता. संविधान रचताना त्यांनी कायद्यासमोर सगळे समान, हे सूत्र मांडले. बाबासाहेबांच्या सामाजिक आणि क्रांतिकारक बुद्धिवादी विचारांचा आपापल्या सोयीनुसार अर्थ दोन्ही बाजूची माणसं लावत असतात. ही मालिका या दोन्ही तटावरच्या समुदायांना योग्य बाबासाहेब सांगेल, अशी आशा या मालिकेने किमान आतावरच्या वाटचालीत दाखविली आहे. पुढे मोहात न पडता ही वाटचाल अशीच सुरू राहिली, तर बाबासाहेबांबद्दलचे गैरसमज आणि त्यांचा, स्वार्थी समाजकारण आणि राजकारणासाठी होणारा गैरवापर रोखण्यासाठी नव्या पिढीवर ही मालिका संस्कार करेल, ही आशा ठेवायला काय हरकत आहे?
 
 
छोटा भिवाला खूप प्रश्न पडत. समोर जायचे असेल, नवे काही निर्माण करायचे असेल तर प्रश्न पडलेच पाहिजेत. वर्गात त्याचमुळे त्याचे बोट नेहमीच वर असायचे, गुर्जी एक प्रश्न... भीमरावांचे बोट नेहमी वर असतेच, कारण त्यांना समाजाला नेहमीच एक प्रश्न विचारायचा असतो... त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची कुवत समाजाने कमवायला हवी. ही मालिका त्या दृष्टीने त्यावर बोलण्यासारखी आहेच!
 
श्याम पेठकर