क्रेडिट कार्ड अपग्रेड करताय?

    दिनांक :11-Aug-2019
  
उत्पन्न वाढलं की उच्च प्रतीचं क्रेडिट कार्ड घेण्यावर भर दिला जातो. तुमच्याकडे असणारं क्रेडिट कार्ड अपग्रेड करता येतं. ही प्रक्रिया सुलभ करण्याच्या या काही टिप्स... 
 
 
प्रत्येक क्रेडिट कार्ड ग्राहकांच्या विशिष्ट समूहाला समोर ठेऊन तयार केलं जातं. विशिष्ट व्यवहारानंतर ग्राहकांना रिवॉर्ड पॉईंट्‌स किंवा सवलती दिल्या जातात. फ्युएल कार्डस इंधनाशी संबंधित व्यवहारांवर लाभ मिळवून देतात. शॉपिंग कार्डस किराणा सामान, कपडेे, गृहोपयोगी वस्तू तसंच इतर काही प्रकारच्या खरेदीवर कॅश बॅक किंवा इतर सवलती देतात. ट्रॅव्हल कार्डस प्रवासाशी संबंधित खर्चांवर सवलती देतात. काही कार्डस ठराविक व्यवहारांवर पाच टक्के कॅशबॅकची सवलत देतात. त्यामुळे क्रेडिट कार्ड अपग्रेड करताना आपल्या खर्चाच्या पद्धतीचा विचार करा. कार्ड अपग्रेड केल्याने तुमच्या नेहमीच्या व्यवहारांवर काही लाभ मिळत असतील तर नक्की पुढे जा.
 
तुमचं आधीचं क्रेडिट कार्ड अधिक मर्यादा असणार्‍या किंवा लाभ देणार्‍या क्रेडिट कार्डमध्ये वर्ग करताना त्याच्याशी संबंधित शुल्कांचाही विचार करा. यामुळे तुमची काही शुल्कं वाढू शकतात.
 
क्रेडिट कार्ड अपग्रेड केल्यामुळे कॅशबॅक, रिवॉर्ड पॉईंट्‌स, भविष्यातल्या खरेदीवर सवलती असे अतिरिक्त लाभ मिळू शकतात. या लाभांचा वापर कसा करायचा हे तुम्ही ठरवायला हवं. रिवॉर्ड पॉर्ईट्‌स जमवून एकत्रितपणे वापरता येतील.
 
क्रेडिट कार्ड अपग्रेड केल्याने तुमचं क्रेडिट लिमिट म्हणजे खर्चाची मर्यादा वाढते. यामुळे तुम्ही मोठी खरेदी करू शकता. त्यातच क्रेडिट कार्डची बिलं वेळेत भरणार्‍या ग्राहकांना भविष्यात कर्जही मिळू शकतं. ही कर्जं प्री-अप्रूव्हड असतात. ही अगदी झटपट उपलब्ध होणारी कर्ज असतात. यामुळे तुमची तातडीची आर्थिक निकड भागू शकते. अगदी एका दिवसात ही कर्जं मंजूर केली जातात. क्रेडिट कार्ड अपग्रेड करण्याआधी या सर्व बाबींचा नक्की विचार करा.