मजुरांच्या मदतीने शेतात झाली महीलेची प्रसुती.

    दिनांक :12-Aug-2019
राजुरा,
समाजात आजही मानवी संवेदना जिवंत असून त्याचे एक उदाहरण नोकारी ( खु.) येथे नुकतेच बघावयास मिळाले. उपसरपंच व त्यांच्या सोबत हाकेला धावून आलेल्या मानवीरूपी देवांनी एका अस्थायी महिला मातेसह तिच्या नवजात बाळाला एक प्रकारे जीवनदानच दिले.
कामाच्या शोधात अनेक शेतमजूर व अन्य मजूरवर्ग भटकंती करीत असतो. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना वणवण भटकावे लागते. जीवती तालुक्यातील लेन्डिगुडा गावातील नीर्मला संजय चव्हाण नामक अस्थायी महिला मजूराला प्रक्रुती अस्वस्थ वाटत असल्याने तिला काल जीवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचाराकरिता नेण्यात आले.यावेळी त्यांना भरती करून न घेता किंवा पुढील उपचारांसाठी पुढे न पाठवता गोळ्या औषध देऊन आल्या पावली परत पाठविले. अश्यातच पूर्व तयारी म्हणून तिच्या घरच्यांनी तिला नोकारी ( खु.) येथे शेतात कामावर असलेल्या आपल्या नातेवाईकांकडे आणले. सकाळी अचानक त्या महीलेला प्रसूती कळा सुरु झाल्याने उपचारासाठी नातेवाईकांची धावपळ सुरू झाली. ही माहिती नोकारी (खु. ) चे उपसरपंच वामन तूरानकर यांना कळताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आशा वर्कर , 108, आरोग्य सेविका , आरोग्य विभाग गडचांदुर रुग्नवाहीकेला पाचारण केले. दरम्यान शेतातच त्या महीलेची प्रसुती झाली. माता व तिचे नवजात बाळ यांची प्रक्रुती चिंताजनक असल्याने त्यांना तात्काळ गडचांदुर येथील आरोग्य केंद्रात हलविण्यात आले आहे. यासाठी रउफ खान पठाण यांच्या समवेत राठोड, गिरीजाबाई मडावि , संगीता ठाकरे , चव्हाण , धोटे आदिंनी महत्वपूर्ण सहकार्य केले. त्यामुळे या सर्वांच्या सहकार्याने आज त्या अस्थायी मजूरी करणाऱ्या मातेचे व तिच्या नवजात बालकाचे प्राण वाचले. यावेळी या मातेने व तिच्या कुटुंबीयांनी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. या मातेच्या मदतीला धावून येणाऱ्या सर्वांचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले.