तरिही भरावा लागेल कर!

    दिनांक :12-Aug-2019
 
 
करपात्र उत्पन्न असणार्‍या प्रत्येक भारतीय नागरिकाला आयकर कायद्यानुसार कर भरावा लागतो. मात्र काही परिस्थितीत करदात्याला इतरांच्या उत्पन्नावर स्वत:च्या खिशातून कर भरावा लागतो. अशा उत्पन्नाविषयी जाणून घेऊ या. 
 
 
एखाद्या मालमत्तेची मालकी करदात्याकडे असेल आणि त्या मालमत्तेतून मिळणारं उत्पन्न करदाता एखादं करारपत्र करून किंवा अन्य मार्गाने दुसर्‍या व्यक्तीच्या नावे करत असेल तर त्या उत्पन्नावर संबंधित करदात्याला कर भरावा लागतो. उदाहरणार्थ अंकितचं पुण्यात एक घर आहे. त्याला या घरापोटी दरमहा 25 हजार रुपये भाडं मिळतं. मात्र हे भाडं वडिलांच्या बँक खात्यात भरण्याची विनंती त्याने भाडेकरूला केली आहे. हे पैसे अंकितच्या वडिलांना मिळत असले तरी मालमत्तेचा मालक म्हणून त्यावर लागू होणारा कर अंकितला भरावा लागेल.
 
अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाचं उत्पन्न त्याच्या पालकांच्या उत्पन्नात वर्ग करावं लागतं. ज्या पालकाचं उत्पन्न जास्त असेल त्याच्या उत्पन्नात मुलाचं उत्पन्न वर्ग केलं जातं. या उत्पन्नावर पालकाला कर भरावा लागतो. पालक विभक्त झाले असल्यास मुलाचा ताबा असणार्‍या पालकाच्या उत्पन्नात मुलाचं उत्पन्न वर्ग करण्याची तरतूद आहे. समजा, रोहितला दोन मुली आहेत. त्यांच्या नावे त्याने दोन मुदत ठेवी ठेवल्या आहेत. प्रत्येक मुदत ठेवीवर वर्षाला पाच हजार रुपये व्याज मिळालं.
  
अशा परिस्थितीत रोहितला मुदत ठेवींवरच्या व्याजस्वरूपात मिळालेलं दहा हजार रुपये उत्पन्न स्वत:चं उत्पन्न म्हणून दाखवावं लागेल. आयकर कायद्यातल्या अशा काही तरतुदींचा करदात्याने नीट अभ्यास करणं गरजेचं असतं. हे उत्पन्न न दाखवल्यास करदात्याला दंड म्हणून व्याज भरावं लागेल. तसंच त्याच्यावर कायदेशीर कारवाईही केली जाईल. आयकर विभागाच्या ‘कारणे दाखवा’ नोटिशीलाही त्याला उत्तर द्यावं लागेल.