‘हेल्लारो’च्या निमित्ताने...

    दिनांक :12-Aug-2019
 
कुठल्याही पुरस्कारांवर चर्चा करण्याचा तो विषय असतो असे नाही. त्यातही ते सरकारी पुरस्कार असतील, तर त्याकडे फारशा गांभीर्याने पाहिले जात नाही. त्याचीही आपली कारणे आहेत. सरकार म्हटलं की, सत्ताधारी आलेत आणि मग कुठल्याही पुरस्कार, सत्कारात आपली माणसं लाभार्थी म्हणून बसविण्याची त्या क्षेत्राची निकड म्हणा किंवा सवय म्हणा असते. त्यातही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची नेहमीच वादळी चर्चा होत राहिली आहे. अमक्यालाच पुरस्कार द्या म्हणून कुणावर दबाव आल्याच्या बातम्याही येत राहिल्या आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत यात बदल झाला आहे. आपण ऑस्करची चर्चा करताना डोईवरची टोपी पडावी इतकी मान वर करून बोलत असतो. मात्र, राष्ट्रीय पुरस्कारांच्या बाबत तसे होत नाही. एखाद्दुसर्‍या वादाची काजळी उगाच सार्‍या धवल अशा कामाला काळे करून सोडत असते. यंदा निवडलेले सर्वच चित्रपट पुरस्कारासाठी चपखल बसणारे होते. भारतीय भाषांत होणार्‍या चित्रपटांमधून एका चित्रपटाची सुवर्णकमळासाठी निवड करणे हे तसे कठीण काम आहे. 2018 सालचे हे पुरस्कार आहेत. लोकसभा निवडणुकीमुळे या पुरस्कारांची घोषणा लांबणीवर पडली होती. आता ती करण्यात आली.
 
 
चित्रपटाची आपली एक दृश्यात्मक भाषा असते. व्यावसायिक चित्रपट येतात आणि जातात. त्यांच्या व्यवसायाच्या चर्चा होतात, घडवून आणल्या जातात. तिकीटबारीवर एखाद्या चित्रपटाने किती गल्ला जमविला, याची आजकाल चर्चा होते. आधी तो किती आठवडे चालला याची चर्चा व्हायची. आता कसोटी क्रिकेट एक दिवस झाले नि मग आता टी ट्वेंटी- टेनपर्यंत आलेय्‌... तसेच चित्रपटांचेही होते आहे. कमी कालावधीत शंभर कोटींचा गल्ला जमविला, हे यशाचे मापदंड झालेले आहे. हे चित्रपट येतात आणि जातातही. दीर्घकाळ मनांवर परिणाम, प्रभाव ते साधत नाहीत. म्हणून ते अभिजात असत नाहीत. खर्‍या अर्थाने सिनेमा मांडला गेला पाहिजे. त्यासाठी प्रतिष्ठा, पैसा आणि लोकप्रियतेच्या पलीकडे जाऊन तो मांडला गेला पाहिजे. मुळात सिनेमातून काही सांगण्याची तळमळ असली पाहिजे. भारतीय सिनेमावर कधीकाळी बंगाली चित्रपटसृष्टीचा प्रभाव होता. आशय, मांडणी आणि प्रतिपादनाच्या पातळीवर ते श्रेष्ठ होते. मराठी चित्रपटांचा प्रभाव तर अजूनही आहे. 2018 च्या घोषित पुरस्कारांवरही मराठी चित्रपटांचा दबदबा दिसतो, मात्र यंदा गुजराती चित्रपटाची सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड करण्यात आली. ‘हेल्लारो’ हा चित्रपट म्हणजे अप्रतिम कलाकृती आहे, असे ज्युरींपैकी एक अशोक राणे म्हणाले. समाज, संस्कृती, राजकारण यांचे प्रतििंबब सिनेमाच्या भाषेत अत्यंत नेमकेपणाने मांडण्यात आले आहे. एखादे नाटक बघितल्यावर भाषेच्या पलीकडे जाऊन, ‘याला म्हणतात नाटक’ असे म्हणावेसे वाटते, तसेच चित्रपटाच्या बाबतही होते. आशय, मांडणी, तंत्र आणि विशेष म्हणजे दिग्दर्शकाची आपली एक सिनेमाची भाषा जाणवत राहते. हृदय आणि मेंदूच्या संवेदन केंद्राचा ताबा ती कलाकृती घेते आणि या दोन्ही केंद्रांवर प्रभाव निर्माण करते. कुठल्याही प्रेक्षकाला तो चित्रपट आपला वाटतो आणि चित्रपटाच्या कर्त्यांना जे काय सांगायचे आहे, ते नेमकेपणाने कळलेले असते. क्लासचा आणि मासचा असे काही नसते. तो पूर्वग्रह चित्रपटाच्या निर्मात्यांनी बाळगल्यावर जे काय निर्माण होते ते आजचे चित्रपट आहेत. साखर सम्राटाच्या तोंडीही गोडच लागते आणि मजुराच्या तोंडीही... चित्रपट सर्वांसाठीच असतो आणि तो तमक्यांसाठी नाही, असे म्हणत त्यांच्यापर्यंत पोहोचवायचाच नाही, असेही नसते. हेल्लारोचा दिग्दर्शक अभिषेक शहा हा नवा आहे. त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे. प्रादेशिक चित्रपटांनी जागतिक उंची गाठणे, ही बाब फार दुर्मिळ असते. मराठी चित्रपट तिथवर पोहोचले, कारण मुळात साहित्य त्या दर्जाचे आहे आणि प्रयोग करण्याची भीड न ठेवता चित्रपटांची मांडणी केली जायला हवी. त्यासाठी चित्रपटकर्त्यांच्या मागे रसिक असले पाहिजे, व्यावसायिक असले पाहिजेत तसेच शासनही असले पाहिजे. गुजराती चित्रटांना अनुदानाच्या पद्धतीत गेल्या दशकात बदल करण्यात आला. त्यात वाढही करण्यात आली. चित्रपटांच्या अनुदानाचे निर्णय घेणार्‍यांमध्ये त्या क्षेत्रातील ‘दादां’ची गर्दी असते. ती गुजरातेत कमी करण्यात आली. म्हणून गेल्या काही वर्षांत गुजराती चित्रपटांनी कात टाकली आहे. नाहीतर गुजराती थिएटर आणि चित्रपट हे मराठीचे रीमेकच असायचे. मराठीतली जवळपास व्यावसायिक नाटके गुजराती रंगभूमीवर सादर झालेली आहेत. अगदी अलीकडे ‘या सुखांनो या’ किंवा ‘हसवा फसवी’ हे दिलीप प्रभावळकरांचे नाटक गुजरातीत भाषांतरित करून सादर करण्यात आले. अगदी ‘गांधी विरुद्ध गांधी’ हे नाटकदेखील गुजरातीत झाले. आता मुंबई आणि अहमदाबाद हे अंतर तसे कमी आहे. व्यवसायाची जोडणी तर मोठी आहेच आणि मग सांस्कृतिक सरमिसळही आहेच. चित्रपटांच्या बाबतही ते तसे होते. ग्रामीण सिनेमा आणि शहरी सिनेमा ही मराठी चित्रपटसृष्टीतली दरी फार आधी संपली होती. गुजराती चित्रपटांच्या बाबत अलीकडे ते दृूर होते आहे. म्हणजे भवई, गरबा या लोककलांच्या आणि तिथल्या ग्रामजीवनाच्या कक्षा ओलांडून गुजराती सिनेमा मांडणीपासून तर आशयापर्यंत बदलतो आहे, याचे हल्लारो हे उत्तम उदाहरण आहे. गुजराती रंगभूमीवरही मूळ असे काही मांडले जाते आणि ते वैश्विक असू शकते, याचा प्रत्यय चेतन मेहता, परेश रावल यांनी आणून दिला. मूळ गुजराती नाटकाचे मराठी भाषांतर ‘केशवा- माधवा’ मकरंद अनासपुरे यांनी केले आणि तो एक वेगळा प्रत्यय होता. त्याचा नंतर ‘ओ माय गॉड’ हा हिंदी चित्रपट झाला. अमिताभ बच्चन यांचा ‘आँखें’ हा चित्रपटही एका गुजराती नाटकावर बेतला होता. रंगभूमीवरची ही प्रायोगिकता आता गुजराती सिनेमातदेखील येऊ लागली आहे.
 
नव्या दमाचे काही चित्रपट दिग्दर्शक मजबुतीने त्यांना म्हणायचे ते सिनेमाच्या भाषेत मांडू लागले आहेत. ‘रेवा’ हा सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट ठरला आहे. नर्मदा परिक्रमेवर हा चित्रपट करण्यात आला आहे. हॉलिवूडच्या काही चित्रपटकर्त्यांना या विषयावर चित्रपट करायचा होता, मात्र त्यांना तो नाही साधला, ते गुजराती दिग्दर्शकाने करून दाखविले. हेल्लारोत स्त्रीमुक्तीची भाषा ती नायिका अत्यंत वेगळ्या पातळीवर जाऊन मांडते. व्ही. शांताराम यांच्या ‘कुंकू’पासून सुरू झालेला हा प्रवाह इतक्या प्रगल्भपणे समोर सरकला आहे. कांतिलाल राठोड यांच्या ‘कंको’ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर गुजराती सिनेमा हा गरबा आणि गुजराती संस्कृती याच्या पलीकडे गेलाच नाही. नंतर चेतन मेहता यांनी ‘भवनी भवाई’च्या माध्यमातून गुजराती सिनेमाला एक वेगळी उंची मिळवून दिली. नंतर त्यांनी हिंदीत केलेले चित्रपटही (मिर्च मसाला) वेगळ्या दर्जाचे होते. त्यानंतर पुन्हा एकदा गुजराती सिनेमा विनोद आणि भाषिक गमती यात अडकला होता. नाट्यतंत्रांत चित्रपट अडकला होता. आता नव्याने तो सिनेमाची भाषा बोलू लागला आहे. बॉलिवूड आणि गुजराती चित्रपटसृष्टीत तसे अंतर नाही. मराठीशी जास्त जवळीक आहे. मराठीचे अनुकरण करता करता मराठीशी ते स्पर्धाही करू लागले आहेत. दोन्ही चित्रपटसृष्टी एकत्रपणे प्रकट झाल्या तर कमाल होऊ शकेल!