आयुषमान बनला ‘ड्रीम गर्ल’

    दिनांक :12-Aug-2019
चौकटीबाहेरचे विषय निवडत विभिन्न भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता आयुषमान खुरानाचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ड्रीम गर्ल’ या आगामी चित्रपटातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते आणि त्यामध्ये आयुषमानने साडी नेसली होती. त्यामुळे रसिकप्रेक्षकांची चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
 
 
 
ट्रेलर पाहता आयुषमान चित्रपटात (लोकेश बिष्ट) एक अशा मुलाची भूमिका साकारणार आहे जो नाटकांमध्ये महिलांच्या भूमिका साकारत असतो. लोकेश मुलींच्या गोड आणि सुमधूर आवाजात देखील बोलताना दिसतो. परंतु लोकेशचे महिलांच्या भूमिका साकारणे त्याच्या वडिलांना फारसे आवडत नाही. वडिलांच्या बोलण्याचा मान राखत लोकेश नोकरीच्या शोधात असतो.
त्यानंतर लोकेश कॉल सेंटरमध्ये नोकरी करु लागतो आणि अनेक कस्टमर्सशी मुलीच्या आवाजात गप्पा मारु लागतो. त्याचा गोड आवाज ऐकून अनेक कस्टमर्स त्याला कॉल करु लागतात. पोलिस ऑफिसरपासून ते गुंडापर्यंत अनेकांवर लोकेशच्या आवाजाची जादू पाहायला मिळते. सर्वजण लोकेशच्या प्रेमात असतात. त्यानंतर आयुषमानवर ओढावणारी परिस्थीती पाहण्यासारखी आहे.
आयुषमानचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट १३ डिसेंबरला प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटानंतर आयुषमान ‘बाला’, ‘गुलाबो सिताबो’ आणि ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.