'बधाई हो'चा सिक्वल येणार

    दिनांक :12-Aug-2019
मुंबई,
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत जंगली पिक्चर्स निर्मित 'बधाई हो' चित्रपटानं बाजी मारत असून २०१८ या वर्षातील सर्वात लोकप्रिय चित्रपट ठरला. चित्रपटात आयुष्मान खुरानाच्या आजीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुरेखा सिक्रीने सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावला. या यशानंतर 'बधाई हो'च्या टीमनं या चित्रपटाला पसंतीची पावती देणाऱ्या सिनेरसिकांचे आभार मानले आहेत. इतकचं नव्हे तर, या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच 'बधाई हो-२' देखील लवकर येणार अशी चर्चा सुरू आहे.
 

 
 
'बधाई हो'ला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर चित्रपटाचे निर्माते विनीत जैन यांनी 'बधाई हो'च्या संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं. प्रभावी आणि सशक्त कथानक तितक्याच ताकदीनं व आकर्षकपणं मोठ्या पडद्यावर मांडण्याचा जंगली पिक्चर्सचा नेहमीच प्रयत्न राहीला आहे. राष्ट्रीय पुरस्काराच्या रूपानं या चोखंदळपणाला एकप्रकारे पोचपावतीच मिळाली आहे. निश्चितच मला 'बधाई हो'च्या टीमचा खूप अभिमान वाटत आहे, अशा शब्दांत विनीत जैन यांनी आनंद व्यक्त केला.
अभिनेता आयुष्मान खुरानाची या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका होती. 'बधाई हो'च्या कथानकाचाच हा विजय असल्याचं तो म्हणाला. चित्रपटात आयुष्मानच्या आईची भूमिका साकारणाऱ्या नीना गुप्ता यांनीही 'बधाई हो'साठी हा पुरस्कार अपेक्षितच होता, अशा भावना व्यक्त केल्या. एखाद्या कलाकृतीवर टीका-टिपण्णी होत नाही असं क्वचितच घडतं आणि 'बधाई हो'च्या बाबतीत तसं घडलं. प्रेक्षकांकडून देखील चित्रपटाला प्रचंड प्रेम मिळालं होतं. त्यामुळं 'बधाई हो-२' हा चित्रपट तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड या भाषेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.