राजकारणातील ‘सौंदर्य’ लोपले!

    दिनांक :12-Aug-2019
 दिल्ली दिनांक 
 
रवींद्र दाणी  
 
तुम्हे वफा याद नही,
हमे जफा याद नही!
जिंदगी और मौत के दो ही तराने है ,
एक तुम्हे याद नही, एक हमे याद नही!
लोकसभेत एका शांत दुपारी, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व विरोधी पक्षनेत्या श्रीमती सुषमा स्वराज यांच्यात झडलेली ही जुगलबंदी कायमची स्मरणात राहील.
मिर्झा गालिबच्या एका शेराने श्रीमती स्वराज यांनी आपले भाषण सुरू केले होते-
हमको उनसे वफा की है उम्मीद,
जो नही जानते वफा क्या है!
नंतर बशीर बद्रचा शेर ऐकविताना त्या म्हणाल्या,
कुछ तो मजबुरियां रही होंगी,
यूं ही कोई बेवफा नही होता!
याला डॉ. मनमोहन सिंग यांचे उत्तर होते,
माना की तेरी दीद के काबिल नही हूँ मै,
तु मेरा शौक देख, तू मेरा इंतजार देख!
श्रीमती स्वराज यांनी पुन्हा प्रतिटोला लगावला,
ना इधर उधर की तू बात न कर,
यह बता की काफिला क्यो लुटा!
हमे राहजनोेसे गिला नही,
तेरी राहबरी का सवाल है!
मनमोहन सिंग सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप लागत होते. त्या पार्श्वभूमीवर लोकसभेत चर्चा सुरू होती आणि पंतप्रधान व विरोधी नेत्यांमध्ये ही जुगलबंदी सुरू होती. यात त्यांनी मनमोहन सिंग यांना मात दिली होती.
मनमोहन सिंग-सुषमा स्वराज यांच्यात झडलेल्या जुगलबंदीचा दिवस 14 व्या लोकसभेचा शेवटचा दिवस होता, हे विशेष! एक दुर्दैव म्हणजे मागील पाच वर्षांत त्यांचे असे एकही भाषण संसदेत ऐकावयास मिळाले नाही.
 
 
 
संयुक्त राष्ट्रात
लोकसभेचे व्यासपीठ आपल्या अमोघ वक्तृत्वाने गाजविणार्‍या सुषमा स्वराज यांचे एक वेगळे रूप संयुक्त राष्ट्रसंघात पाहावयास मिळाले. हरयाणाच्या एका गावात जन्मास आलेल्या या महिलेने, न्यूयॉर्कच्या संयुक्त राष्ट्राच्या व्यासपीठावर दिलेले भाषणही अजरामर राहील. ज्या सहजतेने त्या आपल्या गावातील सभेत बोलत होत्या, त्याच सहजतेने त्या संयुक्त राष्ट्राच्या सभेत बोलल्या. आपल्या भाषणात त्यांनी केवळ पाकिस्तानलाच सुनावले असे नाही, तर अमेरिकेलाही कानपिचक्या दिल्या आणि संयुक्त राष्ट्राचे कामकाज कसे चालावे हेही सांगितले. संयुक्त राष्ट्र ‘वसुधैव कुटुंबकम’च्या भावनेने चालले पाहिजे. संयुक्त राष्ट्र एक परिवार आहे असे चालावे, हे सांगत त्यांनी परिवार कसा चालतो, हेही सांगितले.
परिवारातील संबधात
प्यार असतो, व्यापार नाही
मोह असतो, लोभ नाही
संवेदना असते, ईर्ष्या नाही
सुलह असतो, कलह नाही.
केवळ मी, माझे, माझ्यासाठी, या भावनेने परिवार चालत नाही, असे सांगत त्यांनी अमेरिकेला कानपिचक्या दिल्या होत्या. राजकारणात त्यांनी आपल्या शालीन स्वभावाने आदर मिळविला तसाच आदर त्यांनी आपल्या कुटुंबात मिळविला होता. एक आदर्श स्नुषा या भूमिकेतून त्या वावरल्या. आपल्या निधनानंतर आपल्याला अग्नी मुलाने नव्हे तर सुनेने द्यावा, अशी त्यांच्या सासर्‍याची इच्छा होती. तसे त्यांनी केेले. यावरून, सुषमा स्वराज यांनी आपल्याबद्दल कुटुंबात किती आदर मिळविला होता, याची कल्पना येते. वयाच्या केवळ 25 व्या वर्षी हरयाणासारख्या पुरुषप्रधान राज्यात मंत्रिपद आणि वयाच्या 67 व्या वर्षी आयुष्याचा समारोप! मंत्रिपद त्यांना जसे लवकर मिळाले, तसेच मृत्यूनेही त्यांना लवकर गाठले.
संन्यास नव्हता
मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी अचानक, आपण लोकसभा निवडणुक लढविणार नाही, अशी घोषणा केली. त्यांनी राजकारणसंन्यास घेतला नव्हता. तसा त्यांचा विचारही नव्हता. मात्र, डॉक्टरांनी त्यांना धुळीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या धुराळ्यापासून दूर राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता. त्यांचा निर्णय एवढ्यापुरताच मर्यादित होता. त्यात राजकारण सोडण्याची जराही छटा नव्हती. त्यांनी राजकारण सोडण्याचे कारणही नव्हते. त्यांचे वय फक्त 67 होते आणि मोदी सरकारमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या पहिल्या दोन मंत्र्यांमध्ये त्या होत्या. पहिला क्रमांक, सडक परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या नावे होता, तर दुसरा क्रमांक सुषमा स्वराज यांच्या नावे होता. पाच वर्षांत मंत्र्यांच्या कामाचे मूल्यांकन करणार्‍या ज्या ज्या जनमत चाचण्या झाल्या, सुषमा स्वराज पहिल्या तीन क्रमाकांच्या खाली कधी घसरल्या नाहीत. विदेशात सुषमा स्वराज आणि देशात गडकरी, असे चित्र पाच वर्षे कायम राहिले. त्यांनी सारे लक्ष केवळ आपल्या कामावर केंद्रित केले होते. त्या पाच वर्षांत त्यांनी कोणतीही मुलाखत दिली नाही. संसदेत त्यांचे एखाद्या राजकीय विषयावर ना भाषण झाले, ना त्यांनी कोणतेही राजकीय विधान केेले. वास्तविक, ही दोन्ही मंत्रालये नाव मिळवावी अशी नव्हती. पण, गडकरी आणि सुषमा स्वराज यांनी आपल्या कामाने आपले नाव भारताच्या घराघरांत पोहोचविले. हरयाणाच्या कोपर्‍यात राहणारा एक जाटही गडकरी यांचे नाव घेतो, तर जगाच्या कानाकोपर्‍यात राहणारा भारतीय सुषमा स्वराज यांचे नाव घेत होता.
मंत्रालयावर ठसा
एखादा मंत्री आपल्या कर्तृत्वाने, आपल्या व्यक्तिमत्त्वाने मंत्रालयावर कशी आणि कोणती जादू करू शकतो, हे स्वराज यांनी पराराष्ट्र मंत्रालयात दाखवून दिले. वास्तविक, परराष्ट्र मंत्रालय हे रूक्ष मानले जाते. या मंत्रालयाचा संबध फक्त मुत्सद्देगिरीशी! त्याचा जनतेशी, मानवीयतेशी काय संबध, असा प्रश्न विचारला जात असे. सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या कामाची सारी व्याख्या बदलवून टाकली. युद्धस्थितीत अडकलेल्या हजारो भारतीयांना त्यांनी सोडवून आणले. सोबत 42 देशांच्या नागरिकांनाही सुखरूप आणले. बहुधा यामुळेच त्यांच्या निधनाने जगभरातील भारतीयांना पोरके झाल्यासारखे वाटले.
सरकारी घरही सोडले
श्रीमती स्वराज यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा जशी अचानक केली, मंत्रिपद गेल्यावर त्यांनी, सफदरजंग लेनमधील आपले सरकारी निवासस्थानही अचानक सोडले. राजकीय नेते सरकारी घर सोडण्यास तयार नसतात. कोणत्या ना कोणत्या कारणाने सरकारी घर कसे ठेवता येईल, याचे जुगाड करण्यातच त्यांना धन्यता वाटते. सुषमा स्वराज यांनी तडकाफडकी घर सोडण्याचा निर्णय घेतला. याचे कारण त्यांनाच माहीत असावे. केवळ एका महिन्यात त्या आपल्या खाजगी घरी राहावयास गेल्या. सुषमा स्वराज यांच्या मनातील वेदना कुणाच्याच कशी लक्षात आली नाही? नवे सरकार आल्यावर फक्त एका मंत्र्याने- गडकरी यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस केली. आणि मृत्यूनेही त्यांना अचानक गाठले. सारेच कसे अकल्पनीय-अनाकलनीय!
ब्रिटिश विचारवंत टी. एस. इलियट हा सुषमा स्वराज यांचा आवडता विचारवंत होता. त्यांच्या भाषणात इलियटचे एखादे वचन त्या वापरीत. इलियटचे एक सुप्रसिद्ध वचन आहे-
What we call the beginning
is often the end.
And to make an end,
is to make the beginning.
The end is where we start from.
जीवनाचे मर्म सांगणारे हे इलियटचे वचन. आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये त्यांनी कलम 370 बाबत म्हटले होते, ‘‘मी माझ्या आयुष्यभर याच दिवसाची प्रतीक्षा करीत होते.’’ त्यांचे हे वाक्य दुसर्‍या एका अर्थाने खरे ठरविले. जीवनात जो दिवस अटळ असतो, तोच हा दिवस ठरावा! त्यांच्या आयुष्याची शेवटची रात्र ठरावी!