‘बिग बॉस मराठी’च्या सेटवर सलमानने सांगितला घरातील चोरीचा किस्सा

    दिनांक :12-Aug-2019
बिग बॉस मराठीचे पर्व दुसरे सुरु होऊन ७० दिवसांहून अधिक दिवस उलटले आहेत. आता सर्व स्पर्धकांनी आपापल्या परिने गेम खेळण्यास सुरुवात केली आहे. घरातील स्पर्धकांवर बिग बॉसची कायम नजर असते. त्यामुळेच या सदस्यांचे घरातील वागणे पाहून शनिवार आणि रविवारी रंगणाऱ्या विकेंडच्या डावामध्ये महेश मांजरेकर त्यांची कानउघडणी करतात. ही कान उघडणी करण्यासाठी हिंदी बिग बॉसचा सूत्रसंचालक, बॉलिवूडचा भाईजान सलमान खान बिग बॉस मराठीच्या सेटवर पोहोचला होता. दरम्यान सलमानने त्याच्या घरात झालेल्या चोरीचा किस्सा सांगितला आहे.


 
 
सलमान खानच्या घरातील एका सदस्याचा वाढदिवस होता. त्यामुळे घरात पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पार्टी संपल्यानंतर रात्री २- २:३० च्या सुमारास सगळे जण झोपी गेले. अचानक रात्री सलमानला कुणाच्या तरी पाऊलांची चाहूल लागते आणि तो झोपेतून जागा होतो. सलमानला तो व्यक्ती नक्की चोर आहे की भूत आहे हे कळेच ना. म्हणून सलमान बाजूला झोपलेल्या मोठ्या भावाला, अरबाज खानला उठवण्याचा प्रयत्न करतो. अरबाज तातडीने उठतो. सलमान त्याला इशारा करुन घरात कुणी तरी घुसले असल्याचे सांगतो.
अरबाज आणि सलमान त्या व्यक्तीला पकडतात. तो व्यक्ती त्यांच्या घरात चोरी करण्यासाठी आलेला कळताच सलमान लागलीच त्या व्यक्तीची झडती घेण्यास सुरुवात करतो. तेव्हा सलमानला त्या चोराकडे त्याचा वॉकमन आणि काही पैसे सापडतात. त्या चोरी केलेल्या पैशांमधील पाच रुपये त्या चोराचे असल्यामुळे सलमान त्याला ते परत करतो. तो चोर पहिल्यांदाच चोरी करत असल्याचे त्याने सलमानला सांगितले. त्यामुळे सलमान त्याला पोलिसांच्या तावडीत न देता समजावून सोडून देतो.
सलमानच्या घरात चोरी केलेला चोर तीन-चार वर्षांनंतर पुन्हा सलमानला भेटतो. सलमानच्या घरी चोरी करताना पकडला गेल्यामुळे पुन्हा कधीच चोरीचा विचारही डोक्यात आणला नसल्याचे त्याने सांगितले.