…म्हणून 'या' संघटनेतही पाकिस्तानला नाही मिळाला भाव

    दिनांक :13-Aug-2019
इस्लामाबाद, 
काश्मीर मुद्यावरुन भारताविरोधात मोठया प्रमाणावर रान उठवूनही पाकिस्तानला अपयशाचा सामना करावा लागत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर कुठलाही देश ठामपणे पाकिस्तानच्या मागे उभा राहिलेला नाही. उलट ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनमध्ये पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. इस्लामबहुल देशांच्या ओआयसी संघटनेमध्ये पाकिस्तान एक वजनदार देश आहे. 

 
पाकिस्तानच्या विनंतीवरुन काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सहा ऑगस्टला ओआयसीने एक विशेष बैठकही बोलवली होती. या बैठकीत ओआयसीने काश्मीरमधल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्त केली व दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा सल्ला दिला. पण पाकिस्तानच्या सांगण्यावरुन भारताविरुद्ध राजनैतिक संघर्षाची भूमिका घेतली नाही. ओआयसीने काश्मीर मुद्दावर यापूर्वी सुद्धा अशीच भूमिका घेतली होती.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी पाकिस्तानची बाजू मांडूनही काहीही फरक पडला नाही. उलट त्यांचे प्रयत्न वाया गेले. ओआयसीमधील यूएई, सौदी अरेबिया आणि टर्की या प्रमुख देशांनी काश्मीर प्रश्नी पाकिस्तानला भारतासोबत द्विपक्षीय चर्चेचा सल्ला दिला. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करणे हा भारताचा अंतर्गत विषय आहे असे यूएईने आधीच म्हटले आहे.
पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात असून त्यांनी सौदी अरेबिया आणि चीनकडून प्रत्येकी दोन अब्ज डॉलरचे कर्ज घेतले आहे. ३.५ टक्क्यापेक्षा कमी वेगाने पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची वाढ होत आहे. दुसऱ्या बाजूला भारताने ओआयसीमधील सर्व देशांसोबत आर्थिक आणि रणनितीक संबंध बळकट केले आहेत. भारतात मंदी असली तरी अर्थव्यवस्था ६.५ ते ७ टक्के वेगाने वाढत आहे. पाकिस्तानच्या तुलनेत भारताची अर्थव्यवस्था बरीच मोठी आहे. त्यामुळे ओआयसी संघटनेमधील देशांनी आर्थिक आणि रणनितीक हित लक्षात घेऊन पाकिस्तानपेक्षा भारताला जास्त महत्व दिले.