स्पर्धास्थळी पोहोचण्यासाठी 'तो' पुरातून 2.5 किमी अंतर पोहला

    दिनांक :13-Aug-2019
बंगळुरू, 
खेळाप्रती कटिबद्धता, जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्ती कशी हवी, हे बॉक्सर निशान मनोहर कदम याने दाखविलेल्या साहसात प्रकर्षाने दिसते. सध्या महाराष्ट्र, कर्नाटक व केरळ राज्यांवर पुराचे संकट ओढावले आहे. अनेक गावच्या गावे पुरात बुडालीत. बेळगावचा बॉक्सर निशान मनोहर कदम याच्या मन्नूर गावालाही पुराच्या पाण्याने वेढले होते. अशा परिस्थितीत निशानला बंगळुरूमध्ये राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेण्यासाठी जायचे होते. एकीकडे गावाला पुराच्या पाण्याने वेढले आणि तिकडे स्पर्धास्थळी पोहोचण्याची निशानची धडपड सुरु होती. निशानने कुठल्याही साधन-साहित्याची पर्वा न करता पुराच्या पाण्यात तब्बल 2.5 कि.मी. अंतर 45 मिनिटात पोहत पार केले आणि स्पर्धास्थळ गाठले. एवढी दमछाक होऊनही निशानचे मनोधैर्य खचले नाही आणि त्याने तेवढ्या स्फूर्तीने प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करत रौप्यपदक जिंकले. 
 
 
 
19 वर्षीय निशान हा बारावीचा विद्यार्थी आहे. प्रदीर्घ काळापासून त्याची बॉक्सिंग स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा होती. तशी त्याने तयारीही केली व स्पर्धेचा दिवसही येऊन ठेपला, परंतु ऐनवेळी त्याच्या गावावर पुराचे संकट ओढावले. निशानकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता, परंतु अशा प्रतिकूल परिस्थितीतून त्याने मार्ग शोधून काढला. या युवा बॉक्सरने आपले बॉक्सिंगचे किट एका प्लास्टिकमध्ये गुंडाळले आणि त्याने पुराच्या पाण्यात पोहत मेन रोड गाठण्याचा निर्णय घेतला. निशानने निर्भयपणे तब्बल 45 मिनिटा 2.5 कि.मी.अंतर पोहत पार केले आणि मेनरोड गाठले. तिथून निशान बेळगाव जिल्हा संघासोबत दाखल होत पुढच्या प्रवासाला निघाला. 
 
 
 
मी खूप दिवसांपासून या स्पर्धेची वाट बघत होतो आणि कोणत्याही किंमतीत ही स्पर्धा सोडू इच्छित नव्हतो. मात्र आमच्या गावाला पुराच्या पाण्याने वेढले. कोणतेही साधन-वाहन नव्हते, तेव्हा पोहण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता, असे निशानने सांगितले.
 
प्रवास जोखमीचा झाल्यामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्याला स्पर्धेसाठी पाठविण्यास नकार दिला व ते घरीच थांबले. मात्र निशानने मला सांगितले की, मी गावाजवळील मेनरोडपर्यंत पोहत येत आहे, तिथून मला घ्या आणि तो पोहत आला, असे संघाचे व्यवस्थापक गजेंद्र त्रिपाठी यांनी सांगितले.