भारतीय टेनिसपटू पाकिस्तानात खेळू शकणार नाही

    दिनांक :13-Aug-2019
नवी दिल्ली, 
सद्यस्थितीत भारतीय टेनिसपटू पाकिस्तानमध्ये खेळूच शकणार नाहीत. आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाने (आयटीएफक) वास्तविकता समजून घ्यायला हवी, असे अखिल भारतीय टेनिस महासंघाचे सचिव हिरोन्मोय चॅटर्जी म्हणाले. इस्लामाबाद येथे होणारे डेव्हिस चषक टेनिस सामने इतरत्र हलविण्याची विनंती करण्यासंदर्भात संवाद साधण्यासाठी आम्ही आयटीएफकडे वेळ मागितला आहे, जेणेकरून आम्हाला त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगता येईल, असेही ते म्हणाले. 

 
 
इस्लामाबादमधील सुरक्षा व्यवस्थेचा फेरविचार करण्यासंदर्भात आम्ही आयटीएफला पत्र लिहिले आहे. शिवाय या आठवड्यातच आम्ही दूरध्वनीने संपर्क साधून सविस्तर चर्चेसाठी वेळ मागितला आहे. जेणेकरून आम्ही भारत आणि पाकिस्तानदरम्यानची सद्यपरिस्थितीत समजावून सांगता येईल, असे ते म्हणाले.
 
आयटीएफला वस्तुस्थितीची जाणीव नाही. अशा परिस्थितीत आपल्या देशाचे कोणतेही खेळाडू पाकिस्तानमध्ये जाऊ शकत नाही आणि खेळू शकत नाही. आम्ही आयटीएफच्या प्रत्युत्तराची प्रतीक्षा करत असून त्यानुसार पुढील कार्यवाही करू, असेही ते म्हणाले.
जम्मू-काश्मीरवरील कलम 370 रद्द केल्यानंतर भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे संबंध अधिकच चिघळले आहेत.
 
अलिकडेच पाकिस्तान टेनिस महासंघाचे अध्यक्ष सलीम सैफुल्लाह खान म्हणाले होते की, दोन देशांदरम्यानचा तणाव वाढला आहे आणि आयटीएफ जे निर्णय घेईल, ते आम्हाला मान्य राहील. जर स्पर्धा नियोजित कार्यक्रमानुसार झाला, तर भारतीय संघाला 55 वर्षांनंतर पाकिस्तान दौरा करावा लागेल व तिथे डेव्हिस चषक सामने खेळावे लागेल.