बिग बॉससाठी अभिजीतने फसवले- पुष्कर

    दिनांक :13-Aug-2019
गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस मराठी २’च्या घरात ‘ये रे ये रे पैसा २’च्या चित्रपटातील कलाकारांनी हजेरी लावली होती. कलाकारांच्या उपस्थितीने बिग बॉसच्या घरात उत्साह व आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी अभिनेता पुष्कर श्रोत्रीने अभिजीत केळकरचा एक मजेशीर किस्सा सांगितला. बिग बॉसच्या घरात येण्यासाठी अभिजीतने त्याला कसे फसवले हे सांगतानाची क्लिप वूटच्या अनसीन अनदेखामध्ये पाहायला मिळतेय.
 
 
”मी एका वेब सीरीजच्या शूटिंगला जात आहे. त्यामुळे तीन महिने मी संपर्कात नसेल असं अभिजीतने मला सांगितलं होतं. त्यावेळी आमच्‍या एका नाटकाचा प्रयोग होता. त्या नाटकात अभिजीतऐवजी जो काम करणार होता त्याला काही कारणामुळे सुट्टी घ्यावी लागली. त्यामुळे ऐनवेळी केळकरला म्‍हणालो की तू कुठे शूट करतोयस, तू येऊ शकतोस का एका प्रयोगासाठी आणि हा लगेच म्हणाला की मी लंडनमध्‍ये आहे. हा लंडनमध्ये आहे म्हटल्यावर मला मला खात्री पटली की काहीतरी गडबड आहे,” पुष्कर हे सांगतानाच अभिजीतला हसू अनावर झालं.
वेब सीरिजच्या शूटिंगला जाण्यापूर्वी पुष्करने अभिजीतला पार्टी करण्यासाठी विचारले असता त्याने नकार दिला होता. याविषयी तो पुढे म्हणाला, ”याला पार्टीसाठी विचारलं तर नाही म्हणाला. साडेसातला प्रयोग संपल्यानंतर एकत्र जाऊ असं त्याला म्हटलं होतं. आम्ही बाकीजण मेकअप काढेपर्यंत हा गायब झाला.” यावर सर्वजण खळखळून हसू लागतात. यावर लाजराबुजरा होत अभिजीत म्‍हणतो, ”कारण मग तुम्‍ही माझ्याकडून माहिती काढून घेतली असती ना.” अभिजीत बिग बॉसच्या घरात गेल्याचं कळताच सर्व मित्रांनी व्हॉट्स अॅप ग्रुपवर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केल्याचं पुष्करने सांगितलं.