पुन्हा ‘गांधी’च!

    दिनांक :13-Aug-2019
दिल्लीत कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांची बैठक चाललेली. एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर सारे चिंतन करताहेत. मनन करताहेत. कुठल्याशा एका निर्णयाप्रत यायचं तर आहेच, पण काही केल्या अंतिम निर्णयापर्यंत पोहोचणे जिकिरीचे होते आहे. पर्याय तर अनेक आहेत, पण त्यातील एकाही नावाचा विचार होत नाही. जो तो 10, जनपथकडे आशाळभूत नजरेने बघतोय्‌. त्यांची ही लाचारी बघून ‘दयावान’ मॅडम शेवटी निर्वाणीचा इशारा देतात. स्वत: बैठकीत उपस्थित होतात. त्यांच्या केवळ उपस्थितीनेच मेंढरांच्या कळपाला हुरूप येतो. आपल्याला हाकणारे ताकदवान ‘हाथ’ अजून शाबूत असल्याची ग्वाही मिळताच त्यांचा जीव भांड्यात पडतो. पक्षाला राष्ट्रीय अध्यक्ष देण्याची तोवर रेंगाळलेली प्रक्रिया आता वेगाने सुरू होते. कुणी थेट सोनियांचे नाव सुचवतो. कुणाला वाटते, पक्षाध्यक्षपदाची धुरा खरंतर राहुल यांच्या मातोश्रीनेच सांभाळली पाहिजे. इतक्यात तिकडनं सूचना येते, स्व. राजीव यांच्या पत्नीला ही जबाबदारी सोपवण्याची. गर्दीतून अजून एक आवाज येतो. प्रस्ताव असतो प्रियांकाच्या आईला पक्षाध्यक्ष करण्याचा. त्याला छेद देत दुसरा कुणीतरी, त्यापेक्षा रॉबर्ट वॉड्रा यांच्या सासूबाई या पदासाठी अधिक योग्य ठरतील असे अनुभवयुक्त, अभ्यासपूर्ण मत व्यक्त करतो! सभागृहात जमलेली गर्दी अतिशय मोठी असल्याने अशा भरपूर सूचना येतच राहणार. अजून अशा किती लोकांना सूचना करण्याची संधी देत राहायचे अन्‌ निर्णयासाठी कशाला इतक्या लोकांना ताटकळत ठेवायचे? शेवटी पक्षाच्या धुरीणांनी कुठल्याशा एका निर्णयाप्रत यायचं ठरवलं. आणि मग शेवटी इंदिराजींच्या एका सुनेला पक्षाध्यक्ष करण्याचा फैसला जाहीर केला. ही घोषणा होताच पक्षात आनंदाला उधाण आले. कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर हास्य फुलले. या नवनेतृत्वामुळे पक्षाला नव्याने उभारी येईल, असा विश्वास व्यक्त करीत सर्वांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला...
 
1885 मध्ये स्थापन झालेल्या, शतकाहून अधिक काळाचा इतिहास लाभलेल्या, स्वातंत्र्याच्या त्र्याहत्तर वर्षांत साठ वर्षे सत्तेचा उपभोग घेतलेल्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस नामक एका राजकीय पक्षाला, त्याचा अध्यक्ष निवडण्यासाठी गांधी घराण्याच्या पलीकडे दुसरा कुणी उमेदवार गवसत नाही हे वास्तव लाजिरवाणे आहे. सुरुवातीच्या काळात कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा कालावधी एका वर्षाचा असायचा. त्यातही नेहरूंनी 1929 ते 54 च्या काळात तब्बल सात वेळा पक्षाध्यक्षपद ‘स्वीकारले!’ 1959 मध्ये इंदिराजींच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली. नंतर 78 ते 84 पर्यंतच्या काळातही त्यांनी हे पद स्वत:कडे राखले. नंतर ते पद त्यांचे पुत्र राजीव यांच्या खिशात गेले. त्यांनी 91 पर्यंत पक्षावर राज्य केले. मध्यंतरी केवळ सातच वर्षांचा खंड पडला. नंतर तीच परिपाठी सुरू झाली. पुन्हा हे पद गांधी घराण्यातील स्नुषा सोनिया यांच्याकडे चालून आले. राजघराण्याच्या परंपरेने ते, दोन वर्षांपूर्वी त्यांचे पुत्र राहुल यांच्या पदरी पडले. त्या पदावरून कार्य करताना त्यांनी व्यवस्थितपणे पक्षाचे खोबरे केले. त्यानंतर लोकानुग्रहाच्या नावाखाली पुन्हा ही जबाबदारी सोनिया यांच्याकडे हस्तांतरित झाली आहे. खरंतर गेल्या निवडणुकीपूर्वी गांधी घराण्याने कर्तृत्वाच्या चिंधड्या उडवत या देशावर, कॉंग्रेस पक्षावर, नॅशनल हेरॉल्ड नावाच्या दैनिकाच्या कारभारावर, इथल्या एकूणच व्यवस्थेवर जे अधिराज्य गाजवले, लोकशाही व्यवस्थेचा गवगवा करीत या देशातील लोकांनीही ते घराणे सत्तर वर्षे या ना त्या रूपात सत्तेत ठेवण्याची जी किमया केली, त्याचा स्वाभाविक परिणाम हा आहे की, आज या पक्षावरची सत्ता सोडण्याची इच्छा ना गांधी घराण्यातील कुणाची आहे, ना त्यांना सत्तेतून हद्दपार करण्याची हिंमत इतर कुणी करू धजत! तरीही पक्षात लोकशाही गुण्यागोिंवदाने नांदत असल्याचा छद्मी दावा निर्लज्जपणे केला जातोय्‌.
 
पद सरकारमधील असो की मग पक्षातले, ते गांधी घराकडेच असले पाहिजे, यासाठीचा इंदिराजींपासून तर सोनियाजींपर्यंतच्या मंडळींचा आजवरचा आटापिटा लपून राहिला नाही कधीच. स्वत:च्या हातून पदं गेली की जीव कसा कासावीस होतो, हे त्यांनी त्यांच्या वर्तणुकीतून सिद्ध केले आहे. इंदिराजींनी कामराजांना दिलेली वागणूक असो की, नरिंसह राव, सीताराम केसरी यांचा त्यांच्या अध्यक्षपदाच्या काळात या घरातील सदस्यांनी केलेला अपमान असो; पदं हातून निसटली की, या घराण्यातली माणसं कशी अस्वस्थ होतात, याची ही उदाहरणं आहेत. ज्यांनी उभी हयात कॉंग्रेसची सेवा केली, त्या नरिंसह रावांच्या पार्थिवालाही कॉंग्रेसचे कार्यालय पारखे करण्यात आल्याचा इतिहास फार जुना नाही.
 
एक काळ होता, लोकांवर या कुटुंबाचा प्रभाव होता. त्यातील माणसंही राजघराण्यागत जगली. वागली. नेहरूंचे पूर्वज कोण होते, या प्रश्नाच्या भानगडीत न पडता लोकांनी त्यांची ‘पंडित’ उपाधी स्वीकारली. फिरोज नामक युवकाशी लग्न केलेल्या इंदिरेचे ‘गांधी’ आडनावही जनतेने मान्य केले. मुद्दा भारताच्या फळणीचा असो की काश्मीर प्रश्नाचे घोंगडे भिजत ठेवण्याचा, देशावर आणिबाणी लादण्याचा असो की मग पक्षाचा कारभार मन मानेल तसा चालवण्याचा, लोकांनी सारेकाही सहन केले. इंदिरानंतर राजीव यांनी पंतप्रधान व्हायला या देशात राजेशाही अस्तित्वात आहे का, असा सवालदेखील कुणी उपस्थित केला नाही. इतकेच कशाला, एका क्षणी तर सोनियांनीही तयारी केली होती ‘राजतिलकाची!’ आता मात्र काळ बदलतोय्‌. कालौघात, लोकांची भूमिका बदलली. या घराण्यातील लोकांवर, त्यांच्या वर्तणुकीवर टीकेची झोड उठू लागली. कॉंग्रेसविरोधी पक्ष आणि विचाराला जनसमर्थन मिळू लागले. पण, सत्तेचा माज इतका टिपेला पोहोचला होता की, सभोवतालच्या कार्यकर्त्यांना कस्पटासमान वागवण्याची तर्‍हा तशीच कायम राहिली. इंदिरा गांधी खुर्चीवर बसलेल्या अन्‌ बडेबडे कार्यकर्ते उभे असलेले, सोनिया गांधी खुर्चीवर बसलेल्या अन्‌ ‘पंतप्रधान’ डॉ. मनमोहन सिंगांसह सारे नेते उभे असलेले... हे दृश्य अनेकदा बघितले कार्यकर्त्यांनी. या कहाण्या लपून राहिल्या नाही. गांधी घराण्याचा करिश्मा उरला नसल्याची बाब निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होऊ लागली. हा पक्ष पुढील काळात सत्तेवर राहणार नाही म्हटल्यावर, तिथून बाहेर पडणार्‍या स्वार्थी राजकारण्यांची अक्षरश: रांग लागली. या पक्षाला आलेली अवकळा आता गांधी घराणेही सावरू शकत नसल्याची बाब पुरेशी स्पष्ट झाल्यावर, पक्षाचे अपयशी अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाध्यक्षपदाची धुरा या घराबाहेरील कुणालातरी सोपविण्याचा प्रस्ताव मांडला. त्यावर ते अडूनही राहिलेत. पण, त्यांचा बाणेदारपणा स्वत: त्या पदावरून बाजूला होण्यापर्यंतच मर्यादित होता बहुधा. आई अध्यक्ष होतेय्‌ म्हटल्यावर कालपर्यंतची, गांधी घराण्याबाबतची अट कधी, केव्हा, कशी शिथिल झाली त्यांचं त्यांनाही कळलं नाही! इतर सारे पात्र उमेदवार केराच्या टोपलीत टाकून हे पद आणि पक्ष पुन्हा एकदा गांधी घराण्याच्या दावणीला बांधण्याचा फार्स आडमार्गाने पूर्ण झाला. मुळात या घराण्याला इतर कुणाच्या हातात पक्षाची सूत्रे गेलेली चालत नाही, हीच वास्तविकता आहे. उद्या प्रियांका अन्‌ परवा त्यांची पोरं या पक्षाची धुरा सांभाळायला सिद्ध झाली तरी आश्चर्य असणार नाही. सारा तमाशा मूकपणे बघणार्‍या षंढांच्या गर्दीला हेच मंजूर आहे म्हटल्यावर, कॉंग्रेसचे भवितव्य बदलण्याची शक्यता गृहीत कोण धरणार?