पाठीवर कौतुकाची थाप मारुन NSA डोवाल यांचा जवानांसोबत लंच

    दिनांक :13-Aug-2019
भारताने मागच्या आठवडयात जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यापासून अजित डोवाल काश्मीरमध्ये आहेत. भारताने हा निर्णय घेतला त्याचदिवशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल एअर फोर्सच्या विशेष विमानाने श्रीनगरला रवाना झाले. तेव्हापासून डोवाल काश्मीर खोऱ्यात असून प्रत्यक्ष जमिनीवर फिरुन परिस्थितीचा आढावा घेत आहेत.
 
 
 
कार्यालयात बसून अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याऐवजी प्रत्यक्ष काश्मिरी जनतेशी संवाद साधण्यावर डोवाल यांचा भर आहे. अजित डोवाल काश्मीरच्या वेगवेगळया भागांमध्ये फिरुन लोकांशी चर्चा करत असल्याचे व्हिडिओ समोर येत आहेत. ते पंतप्रधान मोदींना दररोज काश्मीरमधल्या परिस्थितीचा अहवाल पाठवत आहेत. काश्मीर खोऱ्यात काल बकरी ईद शांततेत साजरी होत असताना डोवाल यांनी सीआरपीएफचे जवान आणि पोलिसांसोबत दुपारचे भोजन घेतले.
 
डोवाल राज्य गुप्तचर खात्याच्या कार्यालयातून ऑपरेट करत आहेत. काश्मीर खोऱ्यात तैनात असलेल्या सैन्यदलांमध्ये समन्वय ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. काश्मीर खोऱ्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जवान ज्या निष्ठेने आपली डयुटी बजावत आहेत त्याबद्दल डोवाल यांनी त्यांचे कौतुक केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. डोवाल यांना काश्मीरला पाठवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्ट्रॅटजिक निर्णय होता. त्यामागे एक रणनिती आहे अशी माहिती गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली. अजित डोवाल १५ ऑगस्टपर्यंत काश्मीरमध्ये राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.