आता गुन्हेगारांची ओळख पटविणार ‘अ‍ॅम्बीस’

    दिनांक :13-Aug-2019
राज्य भरातील गुन्हेगारांचा डाटा एकाच ठिकाणी
बोटांचे ठसे, डोळ्यांच्या संरचनेहून पटणार गुन्हेगारांची ओळख
अकोला,
राज्यातील विविध जिल्ह्यात गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांचा एकत्रित डाटा शासनाने गोळा करायला सुरूवात केली आहे. यातून गुन्हेगारांवरील आरोप सिद्धतेसाठी आवश्यक असणारे पुरावे डिजिटल करून ते न्यायालयात सादर होणार आहेत. यासाठी पोलिस प्रशासनाने ’अ‍ॅम्बीस’ प्रणाली सुरू करून याची यंत्रणा मुख्य ‘सर्व्हर’शी जोडण्यात आली आहे. बोटांचे ठसे आणि डोळ्यांच्या संरचनेहून गुन्हेगारांची ओळख या प्रणालीच्या माध्यमातून तात्काळ पटणार आहे. दरम्यान, या विषयीची सर्व यंत्रणा पोलिस स्टेशन पातळीवर निर्माण केल्याची माहिती पोलिस अधीक्षक अमोघ गावकर यांनी तभाशी सोबत बोलताना दिली.
 

 
 
सद्य:स्थितीत राज्यातील जवळपास 7 लाखांच्या गुन्हेगारांची माहिती या प्रणालीत सेव्ह केली आहे. अ‍ॅम्बीस प्रणालीत अनोळखी मृतदेहाच्या हाता-पायाचे ठसे, डोळ्यांची संरचना आणि सर्व्हरमधील सेव्ह डाट्यातून त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटणार आहे. आगामी काळात सर्व्हरची साठवणूक क्षमता वाढल्यानंतर प्रत्येक आधार कार्डचीही यात नोंद केली जाईल.सध्या जिल्ह्यात वर्षाकाठी साधारणतः 4 ते 5 हजार गुन्हे घडतात. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिस दलाला मोठी मेहनत घ्यावी लागते. अनेकदा परराज्यातून, परजिल्ह्यातून या ठिकाणी येऊन गुन्हेगार गुन्हे करतात. हे गुन्हे घडल्यानंतर फिंगर प्रिंटच्या सहाय्याने जुन्या पद्धतीने ठसे, नमुने घेतल्या जातात. परराज्यातील असलेला आरोपी सीसीटीव्हीत कैद असतानाही तो बाहेरचा असल्यामुळे त्याला शोधतांना पोलिसांना त्रासदायक ठरते. परंतु, आता अ‍ॅम्बीस प्रणालीत त्यांचे कुठल्याही बोटाचे ठसे टाकल्यास त्या गुन्हेगाराचा तात्काळ ऑनलाइन बायोडाटाच समोर येणार आहे. यामुळे तपासासाठी ही प्रणाली महत्त्वाची ठरणार आहे. ही प्रणाली अकोल्यात कार्यान्वित करण्यासाठी सर्व पोलिस स्टेशन अद्ययावत करण्यात आले आहेत. यासाठी आवश्यक डाटा जमा करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. अकोल्यातील गुन्हेगारांचा देखील डाटा या प्रणालीत जमा करण्यात येत आहे.
गुन्हा घडल्यानंतर त्याची उकल होऊन गुन्हा सिद्ध करण्याकरिता गुन्ह्याशी संबंधित पुरावे गोळा करणे महत्त्वाचे असते. आरोपीच्या बोटांचे ठसे, सीसीटीव्हीच्या माध्यमातून कॅमेर्‍यात कैद झालेली चित्रे हे प्रमुख पुरावे पोलिसांना मिळतात. या प्रणालीत सध्या यापूर्वी घेण्यात आलेल्या बोटांचे ठसे, आरोपींची छायाचित्रे हे डिजिटल पद्धतीने साठवणूक करून त्याचा गुन्ह्यांची उकल करण्याकरिता, कोर्टात पुरावा सादर करताना उपयोग केला जाईल.
 
पोलिस आधुनिकीकरण योजनेतून अ‍ॅम्बीस प्रणाली सध्या पुणे येथून हाताळल्या जात आहे. राज्यभरातील प्रत्येक पोलिस स्टेशनला या यंत्रणेचे जाळे निर्माण करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. ही प्रणाली नंतर सीसीटीएनएस प्रकल्पाशी जोडली जाईल. महाराष्ट्र पोलिस अकादमीतर्फे अ‍ॅम्बीस अर्थात ठसेतज्ज्ञ प्रणालीचे शिक्षण देण्यासाठी पोलिसांनाही प्रशिक्षण मिळेल. गुन्हा दाखल व्यक्तीच्या हात, पायाचे ठसे स्कॅन केल्यानंतर संबंधित व्यक्तीवर किती गुन्हे दाखल आहेत. याची माहिती कशी मिळवायची, याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. अकोल्यात अ‍ॅम्बीस यंत्रणा सुरू होण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यासाठी कार्यालयात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली. या यंत्रणेमुळे जिल्ह्यातील गुन्हे सिद्धी होण्यास चांगली मदत होईल, असा विश्वास पोलिस अधीक्षक अमोल गावकर यांनी व्यक्त केला.