सलमानच्या चित्रपटात शिवानीची वर्णी?

    दिनांक :13-Aug-2019
छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे अर्थात बिग बॉस मराठी. सध्या ‘बिग बॉस मराठीचं २’ पर्व सुरु असून या पर्वामध्ये काही लोकप्रिय सेलिब्रिटींनी सहभाग घेतला आहे. पहिल्यांदाच भेटणाऱ्या सदस्यांनी एकमेकांच्या सोबतीने घरात ७० दिवसांपेक्षा अधिक काळ एकत्र घालवला आहे. त्यातच घरातील वीणा जगताप, शिवानी सुर्वे आणि नेहा शितोळे या स्पर्धकांची सर्वत्र चर्चा आहे. त्यातच शिवानी सुर्वे ही लोकप्रिय स्पर्धक ठरत असून तिची भूरळ बॉलिवूडकरांनाही पडली आहे. विशेष म्हणजे सलमान खानदेखील शिवानीचा चाहता झाला असून त्याने मस्करीमध्ये शिवानीला त्याच्या आगामी चित्रपट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
 
 
 
काही दिवसापूर्वी रंगलेल्या बिग बॉसच्या विकेंडच्या डावामध्ये सलमान खानने हजेरी लावली होती. या शोमध्ये सलमानने घरातील प्रत्येक सदस्यासोबत वैयक्तिक संवाद साधला. तर अनेकांची फिरकीही घेतली. त्यातच शिवानी सुर्वेला पाहून त्याने थट्टा-मस्करी सुरु केली. सलमान आल्यानंतर महेश मांजरेकर यांनी शिवानीची ओळख अँग्री यंग वुमन अशी करुन दिली. विशेष म्हणजे शिवानी ओळख झाल्यानंतर ‘मी तुला माझ्या चित्रपटात घेणार होतो, पण तू बिग बॉसच्या घरात आहेस. मात्र येथून बाहेर पडायचा एक सल्ला देतो, असं म्हणतं, सलमानने शिवानीली हटके सल्ला दिला.
“खरं तर मी तुला माझ्या एका चित्रपटात घेणार होतो. मात्र आता तू बिग बॉसच्या घरात आहेस. पण माझ्याकडे एक सल्ला आहे. जर तुला चित्रपट करायचा असेल आणि त्यासाठी या घरातून बाहेर पडायचं असेल तर माझा सल्ला ऐक. घरातल्या कोणत्याही सदस्यांच्या कानशिलात लगाव आणि तेथून बाहेर ये. नियमांचं उल्लंघन केल्यानंतर तुला घरातून बाहेर येता येईल”, असा सल्ला सलमानने शिवानीला दिला.
दरम्यान, यावेळी शिवानीने देखील ती सलमानची मोठी चाहती असून ती सलमानसाठी काय काय करायची हेदेखील सांगितलं. विशेष म्हणजे सलमानने विकेंडच्या डावात शिवानीला चित्रपटाविषयी विचारणा केली. मात्र खरंच सलमान त्याच्या आगामी चित्रपटामध्ये शिवानीला घेणार का हे मात्र गुलदस्त्यात आहे.