केरळ, कर्नाटकात पुरामुळे ६ लाख लोकांचे स्थलांतर, ५0 लोक बेपत्ता

    दिनांक :13-Aug-2019
तिरुवनंतपुरम/बंगळुरू,
केरळच्या काही भागांतील पुराचे पाणी ओसरू लागले आहे. मलप्पुरम तथा वायनाडमध्ये भूस्खलनामुळे कवलप्परा आणि पुथुमाला भागात मदतकार्य सुरूच आहे. केरळ, कर्नाटकात मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या वाढून १२३ झाली आहे, तर ६ लाख लोकांनी मदत शिबिरात आश्रय घेतलेला आहे.
 
 
 
केरळात ५८ व्यक्ती अद्यापही बेपत्ता आहेत. यातील ५० लोक मलप्पुरमचे आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांंधी हे पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी केरळमध्ये आलेले आहेत. सोमवारी सकाळी त्यांनी वायनाडच्या तिरुवम्बाडीमध्ये एका शिबिरात पाहणी केली. या ठिकाणी लोकांशी संवाद साधताना ते म्हणाले की, संकटाच्या काळात आम्ही तुमच्यासोबत आहोत. पूरग्रस्त लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन त्यांनी काँग्रेस आणि यूडीएफच्या कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले की, आज सण असूनही आनंदाचे वातावरण नाही. तरीही मी आपणास ईदच्या शुभेच्छा देतो.
मध्य भारत, केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
बंगालच्या उत्तर पश्चिम उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे मध्य भारतात आणि केरळच्या काही भागांत आगामी दोन दिवसांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राहुल गांधी यांचे मदत साहित्य देण्याचे आवाहन
वायनाड,
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सोमवारी नागरिकांना आवाहन केले की, वायनाडमधील पूरग्रस्त लोकांना जीवनावश्यक साहित्याची मदत करावी. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली असून, यात म्हटले आहे की, वायनाडमध्ये पुराने मोठे नुकसान झाले आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. त्यांना शिबिरात स्थलांतरित करण्यात आले आहे. या लोकांना तात्काळ पाणी बॉटल, चटई, चादरी, कपडे, चप्पल, साबण, टूथब्रश, ब्लिचिंग पावडर आदींची गरज आहे. लोकांनी बिस्किट, साखर, मूग डाळ, हरभरा डाळ, नारळाचे तेल, भाज्या, ब्रेड आणि मुलांसाठी खाण्याचे पदार्थ द्यावेत, असे आवाहन केले आहे.