"धाडस करू नका, पश्चाताप होईल!"

    दिनांक :13-Aug-2019
लष्कर प्रमुखांचा पाकिस्तानला इशारा 
 
 
नवी दिल्ली,
जम्मू-काश्मीरचे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर, लडाखच्या सीमेजवळ पाकिस्तानकडून लढाऊ विमाने तैनात करण्यात आली असली, तरी भारताने या घडामोडीला विशेष महत्त्व देण्याचे टाळले आहे. तुमच्या भूमीत तुम्ही काहीही करा, पण भारताविरोधात कुठलेच धाडस करू नका. तुम्हालाच त्याचा पश्चाताप होईल, असा स्पष्ट इशारा लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज मंगळवारी पाकिस्तानला दिला आहे.
 
आम्हाला इतकेच सांगायचे आहे की, तुमच्याकडून लढाऊ विमाने तैनात करण्याची घटना आमच्यासाठी विशेष महत्त्वाची नाही. तुमच्या दैनंदिन प्रक्रियेचा तो भाग असू शकतो. आम्हीही इकडे पूर्णपणे सतर्क आणि सज्ज आहोत, हे लक्षात ठेवा, असे लष्कर प्रमुखांनी एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 
पाकिस्तान त्यांच्या सीमेच्या आत काय करतो, हा आपल्यासाठी चिंतेचा विषय असूच शकत नाही. फक्त त्यांनी नको ते धाडस करून, स्वत:वर संकट ओढवून घेऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
काश्मीर खोर्‍यातील जनतेशी आमची चर्चा सुरू आहे. खोर्‍यात आता पहिल्यासारखी स्थिती निर्माण होत आहे. पहिले तेथील जनतेच्या भेटी घेताना आमच्या हातात बंदूक असायची, आता बंदुकीविना भेटत आहोत, याकडे रावत यांनी लक्ष वेधले.