इम्रान खान गुलाम काश्मिरात 'स्वातंत्र्य दिन' साजरा करणार

    दिनांक :13-Aug-2019
इस्लामाबाद,
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान गुलाम काश्मीरमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा कऱणार आहेत. १४ ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे. यावेळी इम्रान खान भारताने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० रद्द केल्याच्या निर्णयावर विधानसभेतही बोलणार आहेत.
 
 
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, “इम्रान खान इतर मंत्र्यांसोबत १४ ऑगस्ट रोजी मुझफ्फराबाद येथे जाणार आहेत. तिथे त्यांनी सर्वपक्षीय परिषद बोलावली आहे. गार्ड ऑफ ऑनर देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे”. “पंतप्रधान गुलाम काश्मीरच्या एक दिवसीय दौऱ्यावर असणार आहे. यासाठी ते हेलिकॉप्टरने प्रवास करतील. यावेळी त्यांच्यासोबत इतर मंत्रीही असतील”, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
याशिवाय इम्रान खान काही राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत. यामध्ये हुर्रियत कॉन्फरन्सचे सदस्य तसेच काश्मीरी नेत्यांचा समावेश आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी ईदच्या दिवशी मुझफ्फराबादचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी इम्रान खान यांच्या दौऱ्यासाठी सुरु असलेल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी बोलताना पाकिस्तान देश आणि राजकीय नेतृत्त्व काश्मीरच्या मुद्द्यावर एक असून काश्मिरींच्या समर्थनार्थ १४ ऑगस्टला एक आवाज ऐकू येईल असे त्यांनी सांगितले होते.