राष्ट्रवादीकडून पूरग्रस्तांसाठी ५० लाखांची मदत

    दिनांक :13-Aug-2019
मुख्यमंत्र्यांना धनादेश सुपूर्त 
 
मुंबई, 
राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर ट्रस्टच्यावतीने पुरग्रस्तांच्या मदतीसाठी  ५० लाखांचा धनादेश आज मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आला. तसेच पुरग्रस्तांचे तत्काळ पुनर्वसन करण्यात यावे यासाठी विविध मागण्यांचे निवेदनही मुख्यमंत्र्यांना देण्यात आले. यामध्ये पूरग्रस्त भागात वाहनांना टोल माफी द्यावी तसेच विद्यार्थ्यांचे सर्व प्रकारे शैक्षणिक शुल्क माफ करावे या मागण्यांचा समावेश आहे.

सांगली, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांसह कोकण, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुराने हाहाकार माजवल्याने तिथे मदतीची आवश्यकता आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी आपला एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार असल्याची घोषणा केली होती. हीच एकत्रित ५० लाखांच्या रकमेची मदत आज मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आली. दरम्यान, पुढील दोन दिवस शरद पवार कोल्हापूर, सांगली, कराड याठिकाणी पुरग्रस्तांच्या भेटी घेणार आहेत.
दरम्यान, पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्र्यांकडे राष्ट्रवादीने काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये राज्यात, विशेषत: सांगली, कोल्हापूर, सातारा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणात महापूराची निर्माण झालेली परिस्थिती व युध्दपातळीवर करावयाच्या उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.