हाँगकाँग विमानतळावर आंदोलकांचा हल्लाबोल

    दिनांक :13-Aug-2019
अनेक विमाने रद्द, सर्वत्र गोंधळाची स्थिती 
 
हाँगकाँग, 
चीनच्या हुकुमशाहीविरोधात गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाचा मंगळवारी आणखी भडका उडाला. शांतता भंग करणार्‍यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, हा चीनसमर्थित नेत्या कॅरी लाम यांचा इशारा दुर्लक्षित करून, शेकडो आंदोलकांनी हाँगकाँगच्या नव्या विमानतळावर हल्लाबोल केला. यामुळे विमानतळावर प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती आणि यामुळे अनेक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले.
 
शहरातील अस्थिरता तातडीने दूर करा, असा कडक संदेश चीनमधील राज्यकर्त्यांनी लाम यांना दिला आहे. हा व्हिडीओ संदेश समोर आल्यानंतर नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला आणि हजारो लोक हाँगकाँगच्या विविध रस्त्यांवर उतरले. तत्पूर्वी, लाम यांनी पत्रपरिषद घेऊन, नागरिकांना शांत राहण्याचे आणि आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. सोबतच, कठोर कारवाईचा इशाराही दिला. आंदोलनाला आमचा विरोध नाही, पण हिंसाचारामुळे हाँगकाँगमधील शांतता खंडित होत असेल, तर ते मान्य करता येणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. यामुळे लोक अधिकच संतापले होते. 1997 मध्ये ब्रिटनने हाँगकाँगची प्रशासकीय सूत्रे चीनकडे सोपवली, तेव्हापासूनच या देशात आंदेलनाचा भडका उडत आला आहे.
 
लाम यांच्या पत्रपरिषदेनंतर काही तासातच शहरातील रस्त्यांवर आंदोलक जमा झाले होते. अनेकांनी विमानतळ गाठले आणि मुख्य प्रवेशद्वार ताब्यात घेतले. लोकांनी तिथे धरणेही दिली. यामुळे सुरक्षा यंत्रणेचीही तारांबळ उडाली. शनिवारी आणि रविवारचे आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला, असा आरोप या आंदोलकांनी केला आहे.
 
सोमवारीही हजारो नागरिकांनी विमानतळाला घेराव घातला होता. आज सकाळी शांतता प्रस्थापित झाल्यानंतर काही विमानांनी उड्डाण घेतले. मात्र, पुन्हा एकदा आंदोलनाचा भडका उडाल्याने विमानसेवा ठप्प झाली आहे.