कलम ३७० हटविणे लोकशाही विरोधी: प्रियांका गांधी

    दिनांक :13-Aug-2019
सोनभद्र,
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधून ३७० कलम हटवून, तसेच राज्याचे विभाजन करून दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले आहे. या निर्णयावर काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी पहिल्यांदाच भाष्य करताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'कलम ३७० लोकशाही मार्गाने हटविण्यात आले नाही. हे कलम हटविण्याची सरकारची पद्धत असंवैधानिक आहे,' अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. 

 
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथील उम्मा गावात जमिनीच्या वादातून झालेल्या हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी आल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कलम ३७० हटवण्यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला. सरकारने कलम ३७० हटविताना लोकशाही मार्गाचा अवलंब केला नाही. त्यामुळे सरकारचा हा निर्णय संविधान विरोधी आहे. अशा गोष्टी करताना नियम आणि कायद्यांचे पालन करावे लागते. नेमके तेच या सरकारने केलेले नाही, असे त्या म्हणाल्या. प्रियांका यांनी उम्मा गावातील मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. १९ जुलै रोजी प्रियांका गांधी यांना सोनभद्रला जाण्यापासून रोखण्यात आले होते. 
दरम्यान, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी प्रियांका यांची सोनभद्रमधील भेट ही राजकीय स्टंट असल्याचे म्हटले आहे. सोनभद्रमध्ये जे हत्याकांड झाले त्याला खऱ्या अर्थाने काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसच्या जुन्या नेत्यांच्या कर्मांमुळेच आज ही परिस्थिती पाह्यला मिळाली आहे. त्यामुळे प्रियांका यांनी सोनभद्रला जाऊन जुन्या काँग्रेस नेत्यांनी केलेल्या पापांचं प्रायश्चित केले पाहिजे, अशी टीका शर्मा यांनी केली.