शाहू ब्लड बँक करणार पूरग्रस्तांना मोफत रक्तपुरवठा

    दिनांक :13-Aug-2019
 
कोल्हापूर,
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वच स्तरातून मदतीचा हात समोर येत असतांना आता त्यांना मोफत रक्तपुरवठा करण्यासाठी कोल्हापूर येथील शाहू ब्लड बँक ही पुढे सरसावली आहे. परंतू त्यासाठी तरुणाईने रक्तदान करण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे येण्याचे आवाहन मंगळवारी येथे बँकेच्या पदाधिका-यांनी केले. महापुरानंतर मुख्यत: डेंग्यू, लेप्टोप्लायरेसीचे रुग्ण वाढू शकतात व त्या रुग्णांना रक्ताची गरज भासते हे लक्षात घेवून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी दिली.

रक्तातील पीसीव्ही, एफएफपी व आरडीपी या घटकांच्या रक्त पिशवीची किंमत प्रत्येकी १५०० रुपये आहे. रक्तावरील प्रक्रिया खर्चच ७०० रुपये असून तो खर्च ब्लड बँक स्वत: सोसणार आहे. हे रक्त मोफत पुरविले जाणार आहे. फक्त त्यासाठी संबंधित डॉक्टर्सनी रुग्ण पूरग्रस्त आहे असे पत्र देण्याची आवश्यकता आहे. ही सेवा ब्लड बँकेत २४ तास सुरु राहील.
मोफत रक्तपुरवठा करायचा असेल तर त्यासाठी रक्तसंकलनही होणे आवश्यक आहे. म्हणून गुरुवार १५ ऑगस्टपासून चंदूकाका सराफ दुकानाच्या मागील बाजूस रक्तदान शिबीरांचे सकाळी ११ ते ५ या वेळेत आयोजन केले आहे. कुणी मंडळांने पुढाकार घेतला तर तिथे जावून रक्तदान शिबीर घेतले जाईल. कोल्हापूरातील लोक जसे मदतीसाठी धावून आले तसेच रक्तदानासाठी पुढे आले तरच पूरग्रस्तांना मोफत रक्तपुरवठा करता येईल. त्यामुळे गणेशोत्सव मंडळे, विविध संस्था-संघटना,कार्यकर्ते यांनी रक्तदानासाठी पुढे यावे. असे आवाहन करण्यात आले आहे.