शिर्डी संस्थानकडून पूरग्रस्तांना बारा कोटींची मदत

    दिनांक :13-Aug-2019
अहमदनगर,
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून दहा ऐवजी आता बारा कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. संस्थान देत असलेल्या दहा कोटींच्या निधीला मंजुरी देताना उच्च न्यायालयाने स्वच्छता साहित्य खरेदीसाठी आणखी दोन कोटी रुपये थेट दोन्ही जिल्ह्यांना द्यावेत, असा आदेश दिला.
पूरग्रस्तांसाठी साईबाबा संस्थानने दहा कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेतला. यासाठी उच्च न्यायालयाची परवानगी आवश्यक असते. त्यामुळे संस्थानतर्फे मंजुरीसाठी उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला. शिर्डी संस्थानने सांगली व कोल्हापूरच्या जिल्हाधिकार्‍यांना प्रत्येकी एक कोटी रुपये या कामासाठी थेट द्यावेत, असा आदेश न्यायालयाने दिला. 17 ऑगस्टपर्यंत ही रक्कम द्यायची असून, त्यातून केवळ स्वच्छता आणि आरोग्याची कामे करायची आहेत. याशिवाय दहा लाख रुपयांची औषधे आणि वैद्यकीय पथक पाठविण्यासही न्यायालयाने मंजुरी दिली आहे.