…तर टीम इंडिया गमावणार कसोटीतील अव्वल स्थान

    दिनांक :13-Aug-2019
नवी दिल्ली,
भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. भारत विरूद्ध विंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला २२ ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. त्याआधी बुधवारपासून म्हणजेच १४ ऑगस्टपासून न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यात २ सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत न्यूझीलंड संघाला कसोटी क्रमवारीत भारतीय संघाला मागे टाकत अव्वल स्थान मिळण्याची संधी आहे. 

 
सध्या भारतीय संघ ११३ गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर न्यूझीलंडचा संघ कसोटी क्रमवारीत भारताच्या पाठोपाठ १११ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. जर न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका ही कसोटी मालिका १४ ते २६ ऑगस्ट दरम्यान रंगणार आहे. या दोन्ही कसोटी सामन्यात जर न्यूझीलंडने विजय मिळवला, तर त्यांचे एकूण ११५ गुण होतील. त्यामुळे भारताला मागे टाकत कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचण्याची न्यूझीलंडला संधी आहे.
पण असे असले तरी त्यानंतर भारतीय संघालाही लगेचच अव्वल स्थान पुन्हा मिळवण्याची संधी आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील २ सामन्यांची कसोटी मालिका २२ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान होणार आहे. त्यामुळे भारतीय संघाने जर या मालिकेत २-० असा विजय मिळवला तर भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम राहिल. पण जर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध दोन्ही कसोटी सामन्यात विजय मिळवला आणि त्याबरोबरच भारताला विंडिजविरुद्ध केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला, तर भारताच्या कसोटी क्रमवारीतील अव्वल स्थानाला धक्का लागण्याची शक्यता आहे.
याशिवाय, न्यूझीलंडला जर एकच सामना जिंकता आला, तर मात्र त्यांना भारत-विंडिज मालिकेतील निकालावर अवलंबून रहावे लागेल. त्यातही जर भारतीय संघ विंडीज विरुद्ध दोन्ही सामने पराभूत झाले किंवा दोन्ही सामने अनिर्णित राहिले तर ती बाब न्यूझीलंडच्या पथ्यावर पडेल.
श्रीलंका विरुद्ध न्यूझीलंड आणि विंडिज विरुद्ध भारत या दोनही कसोटी मालिका या कसोटी अजिंक्यपदाचा भाग आहेत. त्यामुळे या अजिंक्यपदाच्या दृष्टीनेही ही कसोटी क्रमवारी महत्त्वाची ठरणार आहे.