अमरावतीच्या एसआरपीएफ वसाहतीत बिबट्याची दहशत

    दिनांक :13-Aug-2019
घरात व गोठ्यात घुसून कुत्र्याची शिकार
 
अमरावती,
शहरालगत असणार्‍या वडाळी-पोहरा जंगलाला लागून असलेल्या राज्य राखीव पोलिस दल वसाहतीतील बिबट्याची दहशद वाढली आहे. या परिसरातल्या एका घरातून रविवारी रात्री आणि सोमवारी रात्री वैष्णवदेवी मंदिर पारिसरातल्या एका म्हशींच्या गोठ्यात असणार्‍या कुत्र्याची शिकार बिबट्याने केली. त्यामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
वडाळी, पोहरा, भानखेडा, मोगरा या एकमेकांना लागून असणार्‍या जंगलात 10 ते 12 बिबट्यांचा वावर आहे. या परिसरात घनदाट जंगल आहे. त्यामुळे हा परिसर बिबट्यांच्या वास्तव्यासाठी सुरक्षित आहे. या जंगलालगतच राज्य राखीव पोलिस दल कर्मचार्‍यांची वसाहत आहे. या वसाहतीमध्ये राहणारे पोलिस निरीक्षक मारोती नेवारे यांच्या बंगल्याच्या आवारात रविवारी मध्यरात्री बिबट शिरले. त्याने घराच्यासमोर बांधून असलेले लेब्राडॉर जातीचे कुत्र बंगल्याच्या मागच्या बाजूने घासत नेऊन त्याची शिकार केली. सोमवारी सकाळी नेवारे कुटुंब जागे झाले. त्यावेळी त्यांना दारात रक्त पडलेले दिसले. त्यानंतर नेवारे यांनी कुत्र्याचा शोध घेतला असता कुत्र्याला बिबट्याने घासत घराच्या मागे नेले असल्याचे त्यांना आढळून आले. घराच्या मागे जाऊन पाहिल्यावर कुत्रा मृतावस्थेत आढळून आला. त्याचे अनेक ठिकाणी लचके तोडले असल्याचेही दिसले. नेवारे यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिल्यावर सायंकाळी वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी पंचनामा करून कुत्र्याचा मृतदेह विच्छेदनासाठी नेला. दरम्यान, सायंकाळी साडेसात वाजता पुन्हा बिबट्या नेवारे यांच्या घरामागे आला. बिबट्या येताच परिसरात खळबळ उडाली. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी बिबट्या परिसरातून निघून गेला. राज्य राखीव दल वसाहतीपासून काही अंतरावर वैष्णवदेवी मंदिर पारिसर आहे. त्याने येथील अहमद फिरोज मोहमद हमीद यांच्या म्हशीच्या गोठ्यात असलेल्या कुत्र्याची शिकार केली. यावेळी इतर कुत्रे जोरात भुंकायला लागल्याने बिबट्या आला की, काय या शंकेने श्रीपाद खोरगडे, अहमद फिरोज मोहमद हमीद यांनी गोठ्याच्या मागे जाऊन पाहिले. त्यावेळी बिबट्या कुत्र्याला घेऊन जात असल्याचे त्यांना दिसले. या परिसरात बिबट्याचा वावर नित्याची बाब बनलेली आहे. त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे निर्माण झाले आहे. त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील रहीवासी करीत आहेत.