शेअर बाजारात 623 अंकांची घसरण

    दिनांक :13-Aug-2019
मुंबई, 
जागतिक बाजारपेठेत गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यावर भर दिल्याने, त्याचे परिणाम भारतातही दिसून आले. मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारातही गुंतवणूकदारांनी बड्या कंपन्यांचे शेअर्स विक्रीला काढल्याने या दोन्ही बाजारांमध्ये मोठी घसरण झाली.
मुंबई शेअर बाजारात सकाळची सुरुवात 200 पेक्षा जास्त अंकांच्या घसरणीने झाली. त्यानंतर घसरणीचे प्रमाण सातत्याने वाढत गेली. यामुळे मोठ्या कंपन्यांचे शेअर्स अक्षरश: कोसळले. यातही रिलायन्सने मात्र टिकाव धरला होता. या कंपनीच्या शेअर्सला 10 टक्क्यांपेक्षा जास्त भाव मिळाला. आर्थिक विकासाची कमी झालेली गती आणि विविध क्षेत्रांमध्ये ग्राहकांकडून होणार्‍या मागणीत झालेली घट याचे परिणामही शेअर बाजारात दिसून आले.

 
 
दुपारपर्यंतच्या व्यवहारात या घसरणीने 700 अंकांचा टप्पा पार केला होता. सायंकाळच्या सत्रात काही प्रमाणात खरेदी झाल्याने घसरण किंचित कमी झाली. दिवसभराच्या उलाढालीनंतर 623.75 अंकांच्या घसरणीसह निर्देशांक 36,958.16 या स्तरावर बंद झाला. आजच्या व्यवहारात एचडीएफसी, इन्फोसिस, आयटीची आणि आयसीआसीआय बँकेला मोठे नुकसान सहन करावे लागले. याशिवाय, यस बँक, मिंहद्र ॲण्ड मिंहद्र, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, एचडीएफसी, मारुती, टाटा स्टिल या कंपन्यांचेही नुकसान झाले. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीमध्येही 183.80 अंकांची घसरण झाली. दिवसभराच्या व्यवहारानंतर निफ्टी 10,925.85 या स्तरावर बंद झाला.