अमेरिका अडकली अफगाणिस्तानात!

    दिनांक :13-Aug-2019
आंतरराष्ट्रीय  
 
वसंत गणेश काणे 
 
अमेरिकेला, अफगाणिस्तानमधील आपल्या फौजा शक्य तेवढ्या लवकर काढून घ्यायच्या आहेत. 2020 च्या नोव्हेंबर महिन्यात 3 तारखेला अमेरिकेत अध्यक्षपदासाठी सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या असून, त्या अगोदर अमेरिकन सैनिक स्वदेशी परत आणून मतदारांना प्रभावित करण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची योजना आहे. 2016 सालच्या निवडणुकीत तशा आशयाचे विधान त्यांनी अमेरिकन मतदारांसमोर केले होते. ते पूर्ण करून 2020 च्या निवडणुकांना डोनाल्ड ट्रम्प सामोरे जाऊ इच्छितात. पण, अमेरिकेला अफगाणिस्तानमधून फौजा मागे घेणे वाटते तेवढे सोपे नाही. ‘धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं,’ अशी अमेरिकेची स्थिती झाली आहे. फौजा अफगाणिस्तानमध्ये ठेवाव्यात, तर तालिबानी हल्लेखोरांबरोबर होणार्‍या चकमकीत काही अमेरिकन सैनिकही हताहत होतात. अशाप्रकारे अमेरिकन रक्त सांडले की त्याची प्रतिक्रिया अमेरिकेत उमटते. शिवाय फौजा अफगाणिस्तामनमध्ये ठेवायच्या म्हणजे खर्चही आलाच. बरे, अफगाणिस्तानमधून बाहेर पडावे, तर तालिबान्यांना मोकळे रान मिळणार, हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. पण हे विकतचे दुखणे नको, अशी भावना अमेरिकेत वाढीला लागली आहे.

 
 
अफगाणिस्तानातून बाहेर पडण्याची घाई
म्हणूनच की काय, अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट (परराष्ट्र मंत्री) माईक पॉम्पिओ यांनी 2020 च्या निवडणुकीपूर्वी फौजा परत घ्यायच्या, अशी काही अंतिम मुदत आम्ही घालून घेतलेली नाही, असे जाहीर केले असावे. गेली 18 वर्षे अमेरिकन फौजा अफगाणिस्तानमध्ये आहेत. आमच्या आजवरच्या वक्तव्यांचा पत्रकारांनी चुकीचा अर्थ लावला आहे, अशी तक्रार व टीका करीत त्यांनी सर्व खापर पत्रकारांच्या डोक्यावर फोडले आहे. लवकरात लवकर फौजा कमी करू एवढेच आम्ही म्हटले होते, असे सांगून ते मोकळे झाले. खरी स्थिती अशी आहे की, तालिबान्यांनी या 18 वर्षांत अमेरिकेला चांगलेच रक्तबंबाळ केले असून, केव्हा एकदा अफगाणिस्तानातून आपला पाय मागे घेतो, असे अमेरिकेला झाले आहे. अमेरिकेने म्हटले आहे की, निरर्थक युद्ध थांबवा, थोडे पडते घ्या, निदान युद्धाची तीव्रता तरी कमी करा, याचा अर्थ एवढाच आहे की, अमेरिकेचे तोंड अफगाणिस्तानमध्ये चांगलेच भाजले आहे.
तुम्ही परत गेलात तर सर्वनाश अटळ!
आजमितीला 14 हजार अमेरिकन सैनिक अफगाणिस्तानमध्ये असून, त्यांची मुख्य भूमिका अफगाणिस्तानच्या फौजांना प्रशिक्षण व सल्ला देणे एवढ्यापुरतीच मर्यादित आहे; पण तरीही तालिबान्यांच्या हल्ल्यात म्हणा किंवा त्यांच्याशी दोन हात करताना अमेरिकेचे रक्त सांडतेच, ही वस्तुस्थिती आहे. तालिबान्यांची हानी तुलनेने कितीतरी जास्त होत असली, तरी एवढीही हानी अमेरिकेने का सहन करावी, असा प्रश्न अमेरिकन जनता विचारीत आहे. अमेरिकन फौजा जगभर पोलििंसग करण्यासाठी नाहीत, अशी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 च्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घेतली होती. पण, अमेरिकन सेनाधिकार्‍यांचे मत असे आहे की, ते काहीही असले तरी आता आज या क्षणी अमेरिकन फौजा अफगाणिस्तानातून परत बोलावणे शहाणपणाचे ठरणार नाही. तसे केल्यास अफगाणिस्तानवर तालिबान्यांचे वर्चस्व प्रस्थापित होईल. सर्वत्र हिंसा आणि अनागोंदी निर्माण होईल. यंदा जून 2019 पर्यंत 4000 लोक अल्लाला प्रिय झाले आहेत. अफगाणिस्तानचे नेतेही असेच म्हणत आहेत. तुम्ही परत गेलात तर आमचा सर्वनाश झालाच म्हणून समजा!, अशी त्यांची आर्त हाक आहे.
दहशतवादाचा पुरेपूर बंदोबस्त?
पॉम्पिओ यांनी ही भीती किंवा हा वैचारिक गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला. या प्रश्नी एवढा बाऊ करण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले. आम्ही दहशतवादाचा पुरेपूर बंदोबस्त करणार आहोत. सर्वसहमतीनेच हे आम्ही साध्य करणार आहोत. याचा अर्थ असा होतो की, बेभरवशाच्या पाकिस्तानवर विश्वास ठेवून अमेरिका अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याच्या विचारात आहे. इम्रान खान यांच्या अमेरिकन वारीनंतरचे त्यांचे हे बोल आहेत. म्हणूनच ते म्हणत आहेत की, या प्रश्नी लवकरच प्रगती झाल्याचे दिसेल. पण, पॉम्पिओ यांचे हे आश्वासक बोल जेमतेम विरतात न विरतात तोच दोन अमेरिकन सैनिकांची हत्या झाल्याचे वृत्त बाहेर आले. यांचा मृत्यू चकमकीत झालेला आहे, हेही लक्षात आले आहे. पेंटॅगॉननेसुद्धा या वृत्ताला दिजोरा दिला आहे.
मदर ऑफ ऑल बॉम्ब्ज!
सत्तेवर येण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचे मत असे होते की, अमेरिकेने अफगाणिस्तानमधून बाहेर पडावे. भारताने अफगाणिस्तानची जबाबदारी स्वीकारावी, असे त्यांचे म्हणणे होते. भारताने अफगाणिस्तानच्या पुनर्निर्माणात सहकार्य करण्यापुरतीच आपली भूमिका मर्यादित ठेवली आहे. पण, यालासुद्धा पाकिस्तान आणि चीनचा सक्त विरोध होता आणि आहे. अशाप्रकारे सहभागी होऊन भारताचे या भागात वर्चस्व वाढणे हे त्यांना चालण्यासारखे, आवडण्यासारखे, परवडण्यासारखे, पटण्यासारखे नाही, हे लक्षात आल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपले मत बदलले. अमेरिकेने आणखी कुमक पाठवून दहशतवादी आणि इसिसवरील दबाव वाढविण्याचा निर्णय घेतला. सर्वात शक्तिशाली अशा ‘मदर ऑफ ऑल बॉम्ब्ज’चा त्यांनी वापर करण्यास संमती दिली. मदर ऑफ ऑल बॉम्ब्ज हा अणुबॉम्बपेक्षा फक्त एकच पायरी खालचा आहे, असे मानले जाते तसेच सैन्यदलातही वाढ केली. पण, हा उपायही वायाच गेला. इसिसची शक्ती वाढतच गेली. तालिबान आणखी शिरजोर झाले. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये आत्मघातकी हल्ले पूर्वीपेक्षा कितीतरी वाढले. आता इसिसची सर्वत्र पीछेहाट झाली असल्यामुळे तालिबान्यांचा प्रश्नच मुख्य झाला आहे.
ट्रॅक टू डिप्लोमसी
हे असेच चालू राहिले असते, पण तालिबान्यांना वाटाघाटीसाठी तयार करण्यात अमेरिकेला यश आले असल्याचे वरवर दिसते आहे. तसे या दृष्टीने अमेरिका अगोदरपासूनच खटपट करीत होती. याला ‘ट्रॅक टू डिप्लोमसी’ असे नाव आहे. म्हणजे असे की, इकडे लढाई सुरू असताना राजकीय पातळीवर, सैनिक नसलेले घटक आडून शांततेसाठी प्रयत्न करीत होते, त्यांच्या बोलण्याला यश मिळत होते. निदान अमेरिकेला तसे वाटत तरी होते. हा दहशतवादी गट स्थानिक आणि पाकसमर्थित आहे, हे खरे असले तरी ते कट्‌टर सुन्नी आहेत, हे अमेरिका विसरली. अमेरिका अफगाणिस्तानमधून बाहेर पडेल, पण स्थानिक दहशतवाद्यांनी इसिससारख्यांना थारा देऊ नये, अशी अट अमेरिकेने घातली. तसेच त्यांनी हिंसेचा मार्ग सोडून अफगाणिस्तानातील शासनाशी तडजोड करावी आणि शासन व प्रशासन यात सहभागी व्हावे, असा अमेरिकेचा प्रयत्न होता. ट्रॅक टू डिप्लोमसीत नक्की काय घडते, ते कधीच बाहेर येत नसते. पण, तरीही वाटाघाटींची ही दिशा काहीशी समोर आलीच.
गुड टेररिस्ट आणि बॅड टेररिस्ट
अमेरिकेने आता दशतवाद्यांचे दोन प्रकार केले आहेत. गुड टेररिस्ट आणि बॅड टेररिस्ट. कतारमधील दोहा येथे गुड टेररिस्टशी सुरू असलेली बोलणी त्यांनी पुढे रेटली. हा दहशतवाद्यांमधील पाकसमर्थित गट आहे. म्हणूनच अमेरिका पाकिस्तानला चुचकारीत आहे. अमेरिकेने फौजा परत घ्यायच्या आणि त्या मोबदल्यात गुड टेररिस्टांनी अन्य दहशतवाद्यांशी संबंधविच्छेद करून अफगाण शासनाला सक्रिय व रचनात्मक सहकार्य द्यायचे, असा काहीसा हा करार आकाराला येतो आहे, असे कळते आहे. सध्या बहुतेक जण मौन पाळतील. कारण अमेरिकेनेही आपले सगळे पत्ते उघड केलेले नाहीत. पण, पंतप्रधान मोदींचे मत सुरुवातीपासूनच वेगळे होते आणि आजही आहे. दहशतवादी ते दहशतवादीच. त्यात चांगले किंवा वाईट असा फरक करता येणार नाही, हे आपले मत मोदींनी सुरुवातीपासून स्पष्ट शब्दांत मांडले आहे आणि त्यांची ही भूमिका आजही कायम आहे. पण, अमेरिकेला हे पटले नाही म्हणा किंवा दुसरा उपाय दिसत नव्हता म्हणून म्हणा, गुड टेररिस्ट आणि अफगाणिस्तान शासन यात तडजोड घडवून आणून आपण तिथून बाहेर पडावे, अशी योजना कायम ठेवून अमेरिकेने आपली खटपट सुरूच ठेवली आहे. ती यशस्वी होत आहे, असे वाटत असतानाच दोन अमेरिकन सैनिक तालिबान्यांशी चकमक होऊन मारले गेल्याचे वृत्त समोर आले आहे.
9422804430