मोदींनी मोडला १०० वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड

    दिनांक :13-Aug-2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सहभाग असलेला डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’ या कार्यक्रम भाग सोमावारी प्रदर्शित झाला. साहसवीर बेअर ग्रिल्सबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंडमधील जीम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानामधील घनदाट जंगलांमध्ये भटकताना दिसले. या भटकंती दरम्यान मोदींनी बेअरला त्यांच्या आयुष्यातील अनेक किस्से सांगितले. त्यामध्ये त्यांनी आपण जंगलामध्ये वास्तव्य केल्याचे काही किस्से सांगिले. जंगलात राहताना आपण खूप कमी वस्तू वापरुन जगायला शिकल्याचे मोदी म्हणाले.
 
 
 
जंगलातील प्रवासादरम्यान एका टप्प्यावर मोदी आणि बेअरला एक नदी ओलांडावी लागली. नदी ओलांडण्यासाठी बेअरने गवत, बांबू आणि पॉलिथिन बॅगच्या मदतीने एक नाव तयार केली. मात्र ती किती काळ पाण्यात टिकून राहील याबद्दल बेअरला विश्वास नव्हता. तरी या दोघांनी या नावेतून नदी ओलांडण्याचा निर्णय घेतला. नाव नदीच्या मध्यमागी गेल्यानंतर अचानक तिचा वेग मंदावला. त्यावेळेस बेअरने मोदींकडे पाहत ‘ही नाव कोणत्याही पीएमच्या नावेच्या दर्जाची नाही. आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानाने अशाप्रकारे नावेतून प्रवास केला नाही,’ असं सांगितलं. ‘मला नाही वाटतं या आधी जगातील कोणत्याच पंतप्रधानाने अशाप्रकारच्या राफ्टमधून प्रवास केला असेल. मागील १०० वर्षांमध्ये कोणत्याच पंतप्रधानाने असं काही केलं नसेल,’ असं बेअर मोदींना म्हणाला. ‘माझे लहानपण असेच गेले आहे. त्यामुळे मला यामध्ये नवीन काहीच वाटत नाही,’ असं उत्तर मोदींनी बेअरला दिले. पाऊस आणि पाण्याचा प्रवाह यामुळे नावेची दिशा भरकटू लागली तेव्हा बेअरने पायांच्या सहाय्याने नाव दुसऱ्या तटावर नेली. तेथे उतरल्यावर बेअरने ‘तुम्ही खूप शांतपणे प्रसंगाला सामोरे गेलात,’ असं मोदींना सांगितले.
या कार्यक्रमामध्ये मोदींनी बेअरबरोबर अनेक गोष्टी शेअर केल्या. यात अगदी त्यांचे बालपण कसे गेले इथपासून ते त्यांचा जंगलात राहण्याचा अनुभव इथपर्यंत अनेक गोष्टींवर मोदींनी चर्चा केली. प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि वातावरणातील बदलाकडे लक्ष्य वेधण्यासाठी या विशेष भागाचे चित्रिकरण करण्यात आले होते. विशेष म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर देशाच्या प्रमुखपदी असताना ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मध्ये सहभागी होणारे पंतप्रधान मोदी हे केवळ दुसरे नेते ठरले आहेत.
या भागाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे ट्रेण्डींग हॅशटॅगवरुन दिसून आले. #ManVsWild हा हॅशटॅग भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर ट्रेण्ड होत होता. तर जगभरामध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर ट्रेण्ड होत होता. याशिवाय भारतामध्ये #ModionDiscovery हा हॅशटॅग दुसऱ्या क्रमांकावर ट्रेण्ड होताना दिसला.