संततधार पावसाने गडचिरोलीत अनेक मार्ग बंद

    दिनांक :14-Aug-2019
गडचिरोली,
जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले असून सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आष्टी येथील वैनगंगा नदीला पूर आल्याने आष्टी चंद्रपूर मार्गावरील रहदारी ठप्प झाली आहे. 
 
 
मागील दोन दिवसापासून गडचिरोली जिल्ह्यात संततधार पावसाने कहर केल्यामुळे नदी नाले तुडुंब भरले आहेत. भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीला चौथ्यांदा पूर आल्याने पुन्हा एकदा भामरागड तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे. गडचिरोली मुख्यालयात विविध ठिकाणी पाणी शिरल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली होती. पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे आहे. नदी-नाल्यावरून पाणी वाहत असल्याने जिल्ह्यात अनेकठिकाणचे मार्ग बंद आहेत.  यात आष्टी-गोंड पिपरी, डुंमे -जवेली, गडचिरोली-धानोरा, गडचिरोली-चामोर्शी, आलापल्ली-भामरागड, खरफुंडी-दिभना, मार्कंडा-मुडझा-वाकडी, मौशिखांब-वडधा, कुरखेडा-वैरागड, मानापूर-पिसेवडधा, आरमोरी-वैरागड-रांगीं, गडचिरोली-कारवाफा, फरी-अरततोंडी, विश्रारामपूर-उसेगाव, तळोधी-आमगाव हे मार्ग बंद आहेत.
सतत मुसळधार पावसाने आज वैनगंगा नदीला पूर आल्याने आष्टी चंद्रपूर मार्गावरील रहदारी ठप्प झालेली आहे. विशेष म्हणजे या मोसमात वैनगंगा नदीला दुसऱ्यांदा पूर आला आहे. मात्र पूर ओसरल्याशिवाय सदर मार्ग सुरू होणार नाही.