एकात्मिक किड व्यवस्थापन

    दिनांक :14-Aug-2019
अलिकडेे एकात्मिक किड व्यवस्थापनाबाबत बरीच चर्चा होताना दिसते. मात्र, या संदर्भातील माहिती तळागाळातील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. त्यामुळे या पध्दतीद्वारे योग्य रित्या किड व्यवस्थापन केलं जाऊन अपेक्षित उत्पादन घेणं शक्य होईल. त्यादृष्टीने काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी देत आहोत. 
 
 
मुख्यत्वे मशागतीच्या विशिष्ट पध्दतीचा अवलंब करून एकात्मिक किड व्यवस्थापन करता येऊ शकतं. त्यात जमिनीच्या खोल नांगरटीचा समावेश होतो. जमिनीत खोलवर किडींच्या अंडी, अळी, कोष, पतंग इत्यादी अवस्था असतात. वरवरची नांगरट केल्यास जमिनीतील या अवस्था तशाच राहून त्याद्वारे पिकांच्या मुळांना नुकसान पोहोचतं आणि उत्पादनात मोठी घट येते. यासाठी जमिनीची खोलवर नांगरट करावी. यामुळे विविध अवस्थांमधील किडी जमिनीवर येतात आणि तीव्र सूर्यप्रकाश, पक्षी यामुळे किडींचा नायनाट करणं शक्य होतं.
 
एकात्मिक किड व्यवस्थापनाच्या दृष्टीने पिकांची फेरपालटही महत्त्वाची ठरते. कारण एकाच प्रकारची पिकं सतत घेतल्यास त्यातील विशिष्ट अन्नघटक किडींसाठी पोषक ठरतात आणि त्यांचा प्रादुर्भाव वाढतो. उदाहरण द्यायचं तर तूर, हरभरा, टोमॅटो आदी पिकांवर घाटे अळीचा प्रादुर्भाव होत असतो. या अळी सदर पिकांवर उपजिविका करतात. अशा स्थितीत त्याच जमिनीत नंतर कपाशीचं पीक घेणं सोयिस्कर ठरत नाही. कारण कपाशीवर घाटे अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भात होण्याची शक्यता असते. या शिवाय पेरणीच्या वेळांमध्येही बदल करावा. शेतात आधीची किडग्रस्त पीकं काढून केवळ बांधावर वा शेताच्या कडेला काढून फेकून देऊ नयेत. त्यांचा व्यवस्थित नायनाट करावा. अन्यथा त्या किडींचा नंतरचया पिकांवर प्रादुर्भात होण्याची शक्यता असते. अशा काही उपाययोजनांद्वारे एकात्मिक किड व्यवस्थापन करणं शक्य होतं.