श्वेता तिवारीच्या पतीला जामीन मंजूर

    दिनांक :14-Aug-2019
घरगुती हिंसाचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनव कोहलीची जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. अभिनव कोहली हा अभिनेत्री श्वेता तिवारीचा दुसरा पती असून त्याच्यावर पत्नीला मारहाण करणे आणि मुलीसाठी अश्लील भाषेचा वापर करणे असं आरोप करण्यात आले होते. या आरोपानंतर त्याला अटक करत मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. त्यानंतर न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याचा जामीन मंजूर केला आहे.
 
 
 
सूत्रांच्या माहितीनुसार, कांदिवली येथील समतानगर पोलीस ठाण्यामध्ये श्वेताने अभिनव कोहलीविरोधात तक्रार दाखल केली होती. मुलीला अश्लील फोटो दाखवणे आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी श्वेताने अभिनवविरोधात तक्रार दाखल केली होती. श्वेताने केलेल्या तक्रारीनंतर कलम ५०९, ३५४ (अ), ३२३, ५०४, ५०६ या कलमाअंतर्गंत आणि आयटी कायद्याअंतर्गत ६७- अ अंतर्गत अभिनवला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
दरम्यान, या प्रकरणी सध्या तपास सुरु आहे. त्यातच श्वेताच्या मुलीने पलकनेही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत संबंधीत प्रकाराचं कथन केलं होतं. ‘काही गोष्टी मला स्वत:ला स्पष्ट करून सांगायच्या होत्या, म्हणून मी ही पोस्ट लिहितेय. फक्त बातम्या वाचून एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कमेंट करणं खूप सोपं असतं पण त्यांच्या आयुष्यात खरं काय घडलंय हे कोणालाच जाणून घ्यायचं नसतं. माझ्या आईने काय सहन केलं आहे हे माझ्यापेक्षा चांगलं कोणालाच माहित नाही. त्यामुळे या घटनांबाबत माझं मत सर्वांत अधिक महत्त्वाचं ठरतं,’ असं तिने लिहिलं होतं.