‘खिलाडी’समोर जेव्हा वाजतो पत्रकाराचा फोन

    दिनांक :14-Aug-2019
दमदार अभिनयासोबत अक्षय कुमार त्याच्या नम्र स्वभावासाठी ओळखला जातो. आगामी ‘मिशन मंगल’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याच्या याच स्वभावाची प्रचिती आली. दिल्लीत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अक्षयसमोर एका पत्रकाराचा मोबाइल फोन वाजतो आणि त्यानंतर तो जे काही करतो ते पाहून तुम्हीही अवाक् व्हाल!
 
‘मिशन मंगल’ची टीम तापसी पन्नू, नित्या मेनन, किर्ती कुल्हारी, सोनाक्षी सिन्हा, दिग्दर्शक जगन शक्ती यांच्यासोबत अक्षयने पत्रकार परिषदेत हजेरी लावली होती. भर पत्रकार परिषदेत किर्ती कुल्हारी बोलताना अक्षयसमोर ठेवलेल्या एका पत्रकाराचा फोन अचानक वाजतो. यावेळी अक्षय तो फोन उचलतो आणि समोरच्या व्यक्तीला म्हणतो, ”मी अक्षय कुमार बोलतोय. आम्ही एका पत्रकार परिषदेत आहोत. तुम्ही थोड्या वेळाने कॉल करा.” हे पाहून मंचावर त्याच्यासोबत उपस्थित असलेले कलाकारसुद्धा थक्क होतात आणि नंतर हसू लागतात.
पत्रकार परिषदेत अशाप्रकारे फोन वाजताच अनेकदा कलाकार चिडचिड करतात किंवा ज्या व्यक्तीचा फोन वाजतो त्या व्यक्तीला बाहेर जाण्यास सांगतात. मात्र अक्षय कुमारच्या या कृतीने त्याला सर्वांपेक्षा वेगळं ठरवलं आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.