अमरावतीत बांधकाम मिस्त्रीची धारदार शस्त्राने हत्या

    दिनांक :14-Aug-2019
पोटे टाऊनशीप येथील थरारक घटना
 
नांदगाव पेठ,
पैसे घेऊनही घराचे बांधकाम न केल्याने त्रस्त झालेल्या एका युवकाने संतापाच्या भरात धारदार शस्त्राने मिस्त्रीची हत्या केल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान नांदगाव पेठ पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्‍या पोटे टाऊनशिपमध्ये घडली.
शरद रामराव भटकर असे मृतकाचे नाव असून सिद्धार्थ वानखडे असे आरोपीचे नाव आहे. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पोबारा केला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे. शरद भटकर हा मिस्त्री असून पोटे टाऊनशिप मधील सिद्धार्थ या युवकाच्या घराचे बांधकाम त्याने घेतले होते. काम सुरू करण्याच्या पुर्वीच भटकर यांनी सिद्धार्थकडून अनामत रक्कम घेतली होती. तरीही त्याने कामाला सुरुवात न केल्याने सिद्धार्थ संतापलेला होता. मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजताच्या दरम्यान शरद भटकर हे सिद्धार्थच्या घरी गेले आणि पुन्हा अनामत रक्कम देण्याची मागणी केली. त्यामुळे वादावादी होऊन संतप्त झालेल्या सिद्धार्थने जवळ असलेल्या धारदार शस्त्राने शरद यांच्यावर वार करून त्याला गंभीर जखमी केले व घटनास्थळावरून पोबारा केला.नागरिकांनी जखमी अवस्थेत शरदला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याबाबत नांदगाव पेठ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोरखनाथ गांगुर्डे यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास गोरगनथ गांगुर्डे हे करीत आहे.