पावसाचे भेटणे आणि भरकटणे!

    दिनांक :14-Aug-2019
यथार्थ 
 
श्याम पेठकर  
 
पाऊस असा भेटतो आणि तसाही भेटतो. त्याच्या भेटण्याचे वैविध्य या पावसाळ्याइतके या आधी अनुभवलेले नाही. पावसाच्या बरसण्यात अनियमितता आहे. अगदी घराच्या समोर अंगणात पडणारा पाऊस अगदी घराच्या मागच्या मैदानात मात्र थेंबभरही पडत नाही. तिकडे पश्चिम महाराष्ट्रात धो धो कोसळून सारेच कसे वाहून नेणारा पाऊस, इकडे विदर्भात वाट पाहूनही येत नाही. विदर्भातही एका बाजूला पाऊस असतो, पूर येतात आणि दुसरीकडे अगदी आषाढातही वैशाखाचे वातावरण असते. तिकडे लोकांची आयुष्यं पाण्याखाली आलेली असताना इकडे विदर्भ आणि मराठवाड्यात आयुष्य असलेला पाऊस तुसड्यासारखा भेटीला येतो. पावसाच्या भेटींची ही चित्रे काळजीत पाडणारी आहेत. आता त्याची कारणे काहीही देता येत असली आणि दिली जात असली, तरीही एकाच प्रदेशात एकीकडे ओला दुष्काळ आणि दुसरीकडे कोरडा दुष्काळ... पाणीच पाणी सगळीकडे असताना तोंडचं पाणी पळालेलं आणि डोळ्यांत यायलाही पाणी नसल्याने तोंडचे पाणी पळालेले... पावसाची ही चित्रे आणि बहुरूपी पावसाची कधी ओळखीची वाटणारी आणि कधी एकदम अनोळखी अशी भेट मनात नव्या नोंदी निर्माण करणार्‍या या भेटींचा हा सिलसिला आपल्या सोबतच अर्धशतकी झाल्याचे नकळत लक्षात आले आणि मग त्यांच्या नोंदी आठवतात तशा मांडाव्या म्हटले वाहून जाण्याच्या आधी...
 
 
दिवसाची गात्रं थकून रात्रीच्या कुशीत विसावली असतात. शांत, उबदार घर... असं घर सुरक्षित असतंच. आपण अगदी गाढ निजलेलो. झोपेतही काही संवेदना जागृत राहात असाव्यात किंवा मग काही घडामोडीच इतक्या तरल असाव्यात की, त्या निद्रेचे मऊशार पांघरूण बाजूला सारून खोलवर मनात शिरत असाव्यात. गाढ... प्रगाढ निद्रा. मन अगदी काटसावरीच्या फुलागत हलकं होतं. आपण उंचच उंच डोंगरावर चहुबाजूंनी हिरवळ पांघरून उभे. ढगांमध्ये हालचाल होते. पर्वतरांगांच्या कानात ढग काहीसे कुजबुजतात आणि रेशमाच्या लगडी उलगडत जाव्यात तशा पावसाच्या सरी काजळकाळ्या डोंगरापलीकडून येतात. असा पाऊस भिजवतोय्‌, हेदेखील कळत नाही. चिंब भिजत आपण डोंगरपठाराहून धावत सुटतो अन्‌ जाग येते. खिडकीबाहेर पाऊस पहारा दिल्यागत निनादत असतो, अगदी स्वप्नातल्या पावसासारखा. खिडकीबाहेरच्या पावसानं स्वप्नात येऊन जाग आणलेली. भर गर्दीत पावसानं गाठलेल्या कुलीन स्त्रीसारखी कसनुशी झालेली खिडकीबाहेरच्या सज्जावर चढलेली बोगनवेल. जुईच्या मांडवावर बळजोरीनं चढलेला कृष्णकमळाचा वेल...
आता पूर्ण जाग आलेली. पावसानं आणलेली हुडहुडी अंगात भिनवून पाय पोटाशी गच्च आवळून लेकरं अन्‌ माय निजलेली. आपण हळूच उठतो. पावलांचा आवाजही होऊ देत नाही. चिल्यापिल्यांच्या अन्‌ सखीमायच्या अंगावर दुलई पांघरून देतो. तेव्हा हेलावलेल्या पावसाच्या डोळ्यांत नकळत पाणी येतं. पाऊस धीरगंभीर होतो. आपल्या घरावरच पांघरूण घातल्यागत पडत राहतो...
 
पावसाने आषाढात धरलेले मौन श्रावणात सुटते. पाऊस मग बोलका होतो. श्रावणातला पाऊस सगळ्यांनाच थेट बालपणात घेऊन जातो. सोमवारी उपवास असतो अन्‌ नेमकी शाळा लवकर सुटते. घर गाठताना पाऊस अधीर पावलांना अडवत नाही. तसं पावसाला बाळपावलांचं असलेलं वेड जुनंच, पौराणिकही, पण श्रावणात पाऊस अडवीत नाही. घरी आईने बेलपानांखाली पिंड झाकून टाकलेली. मग ती श्रावण सोमवारची कथा सांगते. आटपाट नगरातली पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण होतपर्यंत भूक पोटात विजेगत कडाडत असते; पण म्हणे सांजेला जेवायचं... डोळ्यांत भुकेचे ढग दाटून आले असताना पाऊस येतो. दाराबाहेरचा तगर पांढर्‍याफेक फुलांसह शहारतो. सरीला सर वाढत जाते. पाऊस अगदी घट्‌ट होतो. त्याची वीण दाट होते. पाऊस मग खूप काही सांगत बसतो. भुका विसरायला लावतो. अंगाई गात हळुवार निजवतो. पावसाच्या धारांमध्ये तेव्हा आईची माया ओथंबून वाहत असते. अशा पावसाची नदी होते म्हणतात.
 
एखादी रात्रच घालमेलीची, घामेजली असते. अगदी नकोशी वाटायला लागते. ती आपली खिडकीशी उभी आणि तो पडल्यापडल्या डोळ्यांचे वासे करून घेत. असेही संदर्भ काऊ-चिऊंच्या आयुष्यात नेहमीच येतात. जमीन कुठवर ओलावा धरून ठेवणार, यावर वरच्या हिरवळीचे नशीब ठरत असते. भूक प्रेमाचीही असते. असे असले तरी भुकेचे संदर्भ टाळता येत नसतात. एकमेकांच्या घट्‌ट मिठीतही फार काळ उपाशी राहता येत नाही. तहान-भूक हरपणे अन्‌ विवंचनांनी वाकुल्या दाखविणं थांबविणे काही क्षणांसाठी शक्य असतं. मग काऊ-चिऊ एकमेकांच्या भाकेत गुंतले असले, तरीही भुकांमध्ये अडकतात, विवंचनात फसतात. खरेतर त्यांना आभाळ होऊन परस्परांवर बरसून जायचे असते, पण काळ फरफटत नेतो. त्याने काऊ-चिऊंची निर्मिती केवळ उन्मत्त समर्पणासाठीच केलेली नसते. तगमग आणि अस्वस्थता वाढत जाणे स्वाभाविक असते. काळजाच्या तळाशी ती दाबून टाकून एकमेकांसाठी सुगंधी भावनांची फुलं फुलवीत राहणं, ही कसरत प्रत्येकच काऊ-चिऊला करावी लागते. पण, काळजाच्या तळाशी दाबून टाकल्याने साचलेल्या काळ्या काजळीचा कधीतरी कालिया होतो. डोह मग विषारी होतो. इतर भुका गिळणार्‍या, तहानलेल्या, हपापलेल्या हव्यासाच्या असतात. पण, मिलनाची भूक ही सृजनात्मक असते. तिच्या ओठी उमलणारे बीज असते नि तळाशी जीवनमुक्त समाधी असते. ज्याला जे हवं, त्याला ते मिळतं. मिलनाचा अर्थच तो आहे. देहच ओरबाडणार्‍यांना मुक्त, प्रासादिक समाधीची आस नसते. उत्तान लालसाच ठाई ठाई वसणार्‍यांची वखवख वाढवीत जाते अन्‌ मग आसक्तीची पिलावळ दुप्पट होत राहते. जे लावाल तेच परत मिळेल. त्यालाच समागम म्हणतात. हा सृजनाचा नियम आहे. पण मुळात ते सृजन आहे, ते अवगुंठित करून ठेवलं तर ते विकृत स्वरूपात बाहेर पडतं. वखवख शांत करतं. काऊ-चिऊचं नेमकं तेच होतं. जीवनाच्या तापात ते सृजनाची भूक विसरतात. मग काऊ-चिऊ चकमकीचे दगड होतात.
 
एकाच घरट्यात राहिल्यानंतर कधी ना कधी घासणारच. मग ठिणगी पडते. कधीकधी घरटेही पेट घेते. अशा ठिणगीनंतरच ती खिडकीजवळ उभी आहे. तो बिछाना जाळत आहे. पावसाला याच्याशी काहीच घेणं-देणं नाही. पण तो येतो. अगदी निष्पाप, निरागस, नि:स्पृहपणे पडत राहतो. पावसाच्या धारांमध्ये सृजनाचा ओलावा असतो म्हणून कोरड्या जमिनीवरही तो पडला की, जमिनीला हिरवळीच्या कविता सुचतात. पावसाचा शिडकावा अंगावर बसला की, मग ती भानावर येते. हे भांडण सृजनासाठी आहे, याचे भान तिला येते. ती मग त्याला पाऊसवेड्या खिडकीशी बोलावते. पाऊस त्या दोघांनाही काऊ-चिऊची पुढची गोष्ट सांगतो. त्यालाच ती गोष्ट माहिती असते, कारण कुठलाच ऋतू कायम नसतो, हे त्याला माहिती असतं. पावसाळा गेला की हिवाळा अन्‌ मग उन्हाळा हे ऋतूंइतकं इतर कुणाला ठाऊक असणार? काऊचं शेणाचं घरटं वाहून नेणारा पावसाळाही कधीतरी सरतो. हिवाळ्यात काऊ परत आपलं घरटं उभं करतो. मग उन्हाळा येतो. ऋतू असे बदलले तरी सगळे संदर्भ तेच असतात. काऊचं घरटं शेणाचं अन्‌ चिऊचं मेणाचं. मग ऊन तापतं. वैशाख वणवाच पेटतो. होरपळवून टाकतो. चिऊचं मेणाचं घर वितळतं. वाहून जातं. काऊ आपल्या शेणाच्या थंड घरात शांतपणे बसला असतो. पावसात थंडी-वार्‍यात उघड्यावर फिरल्याने कुठलाच ऋतू कायम नसतो, हे काऊला कळायला लागते. उन्हाच्या चटक्यांनी चिऊदेखील शहाणी होते अन्‌ मग ऋतूंचे हल्ले समर्थपणे झेलणारे घरटे निर्माण करण्याच्या कामी लागतात... पावसाची ही कहाणी मात्र साठा उत्तरी सुफळ संपूर्ण होते. तिला सृजन आणि भूक यातील फरक कळलेला अन्‌ पावसाचा आशीर्वाद त्यालाही फळलेला. त्यांच्या भांडणावर पाऊस पाणी फेरतो. पाऊस असा ताटकळत उभा असल्याचं भान त्यांना येतं. ते मग आपल्या देहात त्याला वाट करून देतात...
हस्तातला पाऊस म्हणजे संपन्न माणसाचा आधाशीपणाच. अगदी अघोरीच. रानातल्या रोपट्यांनी श्रावणात धरलेल्या मुळांवरच हा घाव घालणार... मात्र, असा हटवाद्यासारखा अडून बसलेला पाऊस आतावर भेटला नव्हता आणि जगबुडी आणणारा क्रूर पाऊसही गाठीला नव्हता आतावर... बाळकृष्णाच्या पाऊलस्पर्शाने वसुदेवाला गोकुळाची वाट प्रशस्त करून देणार्‍याच पावसाचा वारसा आतावर जोजवत आलो आपण!