अमरावतीच्या मेजर आनंद पाथरकर यांना शौर्य पुरस्कार

    दिनांक :15-Aug-2019
अमरावती, 
स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर अमरावतीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शहरातल्या गाडगेनगर भागातील मूळ रहिवाशी मेजर आनंद शरद पाथरकर यांना त्यांच्या शौर्य, साहस व विलक्षण नेतृत्वासाठी भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून ‘सेना मेडल’ हा शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

 
 
मेजर आनंद सध्या 50 राष्ट्रीय रायफल्स, पुलवामा, कश्मिरमध्ये कार्यरत आहे. तिथे काही महिन्यापूर्वी दोन आतंकवादी एका घरात घुसून बसल्याची बातमी मिळताच जिवाची पर्वा न करता आपल्या टीमसोबत मेजर आनंद यांनी तीव्र गोळीबार सुरु असताना तिथे जाऊन त्या दोन दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. भारतीय लष्कर बर्‍याच दिवसापासून त्यांच्या मागावर होते. मेजर आनंद यांच्या या पराक्रमाने बर्‍याच लोकांची जीव वाचले. त्यांचे हे जोखमीचे कर्तृत्व लक्षात घेत त्यांना हा शौर्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सदर पुरस्कार वर्षा अखेर लष्कर प्रमुखांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.
 
यापुर्वी मेजर आनंद यांना युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन ऑफ प्लेस किपींगच्या स्पेशल अप्रीसेशन हा आंतराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, अशी माहिती त्यांच्या पत्नी डॉ. मृणाल पाथरकर यांनी दिली. सध्या मेजर आनंद कश्मिर खोर्‍यात सेवा देत आहेत. त्यांच्या धाडसी पराक्रमाबद्दल व जाहीर झालेल्या पुरस्कारा बद्दल सर्व स्तरातून मेजर आनंद यांचे अभिनंदन होत आहे.