सोनिया गांधी यांच्यासमोरील आव्हाने...

    दिनांक :15-Aug-2019
दिल्ली वार्तापत्र
श्यामकांत जहागीरदार  
 
मागील आठवड्यात काँग्रेसने दोन मोठ्या चुका केल्या. पहिली चूक म्हणजे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील 370 कलम रद्द करण्याच्या मोदी सरकारने घेतलेल्या ऐतिहासिक अशा निर्णयाला विरोध केला, तर दुसरी मोठी चूक िंकवा घोडचूक म्हणा, ती काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची केलेली निवड.
 
आपल्या आजेसासर्‍यांनी म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेली चूक दुरुस्त करण्याची चांगली संधी सोनिया गांधी यांना मिळाली होती, पण ती त्यांनी दवडत काँग्रेसचे मोठे नुकसान केले आहे. राजकीय पक्षांनी देशातील जनभावना लक्षात ठेवून निर्णय घ्यायचे असतात, देशातील जनभावना 370 कलम रद्द करण्याच्या बाजूने होती. त्यामुळे इतिहासात काय झाले, नेहरूंनी तो निर्णय का घेतला याचा विचार न करता त्यांनी 370 कलम रद्द करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिला असता, तर देशाने गांधी घराण्याच्या आधीच्या सगळ्‌या चुका विसरून त्यांना माफ केले असते.
 
पण, सोनिया गांधी यांनी असे न करता काँग्रेस पक्षातील मूठभर नेत्यांच्या मागे फरफटत जाणे पसंत केले. देशातील जनतेची नाडी सोनियांच्या लक्षात आली नाही, त्यामुळेच त्यांची उत्तरोत्तर घसरण होत आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याइतपतही जागा काँग्रेसला जिंकता आल्या नाहीत तरीही काँग्रेसच्या नेतृत्वाचे डोळे उघडत नाहीत, याचे आश्चर्य वाटते.
 

 
 
काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या राहुल गांधींकडून तर राजकीय शहाणपणाची अपेक्षाही करता येत नव्हती. मात्र, सोनिया गांधी यांच्याकडून अशी अपेक्षा करता येत होती. 370 कलम आणि काँग्रेसचे अंतरिम अध्यक्षपद या दोन मुद्यांवर श्रीमती गांधी यांनी तीच चूक केली. याची किंमत दीर्घकाळासाठी काँग्रेसला चुकवावी लागणार आहे. त्यांनी काँग्रेसचे अंतरिम अध्यक्षपद स्वीकारल्यामुळे काँग्रेसचा तात्पुरता फायदा होणार असला, तरी दीर्घकाळाचे नुकसानच होणार आहे.
 
काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी सोनियांची निवड करत घराणेशाहीच्या राजकारणातून सुटका करण्यासाठी चालत आलेली मोठी संधी काँग्रेसने गमावली आहे. काँग्रेसवर आतापर्यंत होत असलेले दोन मोठे आरोप म्हणजे, भ्रष्टाचार आणि घराणेशाही. यावेळी काँग्रेसचे अध्यक्षपद गांधी घराण्याच्या बाहेरच्या नेत्याकडे सोपवले असते, तर घराणेशाहीच्या आरोपातून काँग्रेसची आणि गांधी घराण्याचीही सुटका झाली असती.
 
श्रीमती गांधी यांनी जवळपास दीड वर्षापूर्वी प्रकृतीच्या कारणास्तव काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागेवर राहुल गांधी यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. मात्र, आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत राहुल गांधी यांना काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आणता आले नाहीत. उलट, होते त्यापेक्षा त्यांनी काँग्रेसला ‘बुरे दिन’ आणले. आपल्या पप्पूपणाच्या प्रतिमेतून ते बाहेर येऊ शकले नाहीत, उलट या प्रतिमेत ते आपल्या वागणुकीने जास्त अडकत गेले. परिणामी, त्याचा फटका त्यांना आणि पक्षालाही बसला.
 
लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देताना यापुढे गांधी घराण्यातील कोणीही काँग्रेसचा अध्यक्ष होणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली. कोणीही म्हणजे फक्त प्रियांका गांधी-वढेरा त्यांना अभिप्रेत होत्या. कारण श्रीमती गांधी यांनी 19 वर्षे काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवले होते.
आज नाहीतर उद्या काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरच्या नेत्याची अध्यक्ष म्हणून निवड करावीच लागणार आहे. काँग्रेस जास्त काळ गांधी घराण्याच्या प्रेमात राहू शकत नाही. श्रीमती गांधी यांचे वय झाले आहे, राहुल गांधी आता पुन्हा काँग्रेसचे अध्यक्ष होऊ शकणार नाहीत. राहुल गांधी यांनी लग्न न केल्यामुळे काँग्रेसच्या नव्या नेतृत्वाचा जन्म होण्याची शक्यताही आता मावळली आहे. प्रियांका गांधी-वढेरा या गांधी घराण्यातील काँग्रेसच्या शेवटच्या अध्यक्ष ठरू शकतात. त्यांच्यानंतर काँग्रेसला गांधी घराण्याच्या बाहेरच्या नेत्याची अध्यक्ष म्हणून निवड करावीच लागणार आहे. प्रियांका गांधी यांची मुलं उद्या राजकारणात आली, तरी ती गांधी घराण्यातील नाही तर वढेरा घराण्यातील राहणार आहेत. त्यामुळे त्यांना गांधी आडनावाच्या वलयाचा फायदा मिळणार नाही.
 
गांधी घराण्याच्या बाहेरच्या मल्लिकार्जुन खडगे, सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट या नेत्यांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत होती, मात्र यातील एकही या पदासाठी पात्र नव्हता. कारण यातील बहुतांश नेते हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले होते. पराभूत नेत्यांची अध्यक्षपदी कशी निवड करणार, हा प्रश्न होता. त्यामुळे जी नावे अध्यक्षपदाच्या स्पर्धेत टिकणार नाहीत, ती जाणीवपूर्वक आणली का, अशी शंका येते. 
 
राहुल गांधींच्या काळापासूनच पक्षात जुने अनुभवी नेते आणि तरुण नेते अशी उभी फूट पडली होती. त्यामुळे अध्यक्षपदासाठी जुन्या आणि अनुभवी नेत्याचे नाव आले की, तरुण नेते विरोध करणार आणि तरुण नेत्याचे नाव आले तर अनुभवी आणि ज्येष्ठ नेते ते हाणून पाडणार, असे आधीच या स्तंभात म्हटले होते.
 
राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात त्यांनी काही ज्येष्ठ नेत्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामुळे हे नेते दुखावले होते. राहुल यांनी म्हातारे अर्क बाजूला करत तरुण तुर्कांना महत्त्व देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काँग्रेस पक्षातील म्हातार्‍या अर्कांनी पक्षातील आपले महत्त्व पुन्हा वाढवण्यासाठी राहुल यांनाच पद्धतशीर बाजूला करत सोनिया गांधी यांना अंतरिम अध्यक्ष बनवले.
 
श्रीमती गांधी यांनी अध्यक्षपदाची अंतरिम का होईना सूत्रे स्वीकारल्यामुळे म्हातार्‍या अर्कांचे महत्त्व वाढले आहे. अहमद पटेल लॉबी पक्षात पुन्हा सक्रिय झाली आहे. गांधी घराण्यातील नेतृत्व पुढे करून आपले तुंबड्या भरण्याचे या नेत्यांचे जुने उद्योग पुन्हा सुरू होऊ शकतील. त्यामुळे यावेळी श्रीमती गांधी यांना अध्यक्ष म्हणून अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.
सोनिया गांधी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष झाल्यामुळे काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. काँग्रेसमध्ये आता राहुल गांधी यांचे स्थान काय राहणार? अध्यक्ष होण्याआधी राहुल गांधी पक्षात महासचिव तसेच उपाध्यक्ष होते. आता ही दोन्ही पदे त्यांना घेता येणार नाहीत. माजी अध्यक्ष म्हणून राहुल गांधी देशभर फिरू शकतात. दुसरा मुद्दा, राहुल गांधी यांनी पक्षात जी तरुण नेतृत्वाची फळी उभी करत त्यांना मोठ्या पदावर बसवले त्यांचे काय होणार? या लोकांना बाजूला केले जाणार का?
 
राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाच्या कार्यकाळात सर्वात मोठी चूक केली ती म्हणजे त्यांना पक्षातील ज्येष्ठ आणि अनुभवी नेते तसेच तरुण नेतृत्व यांच्यात समन्वय साधता आला नाही. तीच चूक श्रीमती गांधी करू शकतात. त्या ज्येष्ठ नेत्यांना महत्त्व देत तरुण नेत्यांकडे दुर्लक्ष करण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपल्या अध्यक्षपदाच्या आधीच्या कार्यकाळात सोनिया गांधी अहमद पटेल यांच्या राजकीय सल्ल्यानेच वागत होत्या, आताही त्या तशाच वागणार आणि निर्णय घेणार का, हा प्रश्न आहे.
 
काँग्रेस महासमितीच्या बैठकीत सोनियांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करून घ्यावे लागणार आहे. म्हणजे त्या अंतरिम अध्यक्ष होऊ शकतील. मात्र, त्यांची प्रकृती पाहता त्या किती काळ काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवू शकतील, हा प्रश्न आहे. त्यामुळे काँग्रेसला आपल्या नव्या अध्यक्षाची शोधमोहीम सुरू ठेवावी लागणार आहे.
 
काँग्रेसची सद्य:स्थिती पाहता, प्रियांका गांधी-वढेरा यांच्याशिवाय काँग्रेसला पर्याय नाही. गांधी घराण्यातील शेवटचा नेता म्हणून काँग्रेसवाले एकदा प्रियांका यांना अध्यक्षपदाची संधी देतील, त्यानंतरच गांधी घराण्यातील नेत्याची काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून असलेली परंपरा खंडित होईल.
 
9881717817